Current Affairs of 25 January 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (25 जानेवारी 2018)
संरक्षण उत्पादनात बीएईची गुंतवणूक :
- संरक्षणविषयक उत्पादनांची महाराष्ट्रात निर्मिती करण्यास बीएई सिस्टीम्स ही ब्रिटिश कंपनी उत्सुक असून, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार आहे.
- बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली.
- दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 48 व्या वार्षिक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे शिष्टमंडळ जागतिक पातळीवरील विविध प्रतिष्ठित आर्थिक-औद्योगिक संस्थांशी संवाद साधत आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष कार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
- बीएई सिस्टीम्स ही संरक्षण, सुरक्षा आणि एरोस्पेस क्षेत्रातील बहुराष्ट्रीय ब्रिटिश कंपनी आहे. या कंपनीने महाराष्ट्रात संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखविली आहे. त्यासाठी राज्य सरकार त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
राज्यात 28 जानेवारीला पल्स पोलिओ मोहीम आयोजित :
- पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी राज्यात या वर्षी 28 जानेवारी व 11 मार्च रोजी पोलिओ लसीकरणाची विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
- शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक कोटी 21 लाख 29 हजार बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्यभरात 85 हजार बूथ उभारण्यात येणार आहेत.
- पोलिओ निर्मूलन विशेष मोहीम 1995 पासून सुरू करण्यात आली. तेव्हापासून राज्यात दोन वेळा विशेष पल्स पोलिओ मोहीम राबविली जाते.
- तसेच या वर्षी रविवार 28 जानेवारीला ही मोहीम घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन बालकांना डोस पाजण्यात येणार आहेत.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर :
- पोलिस दलात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर उपायुक्त संजीवकुमार पाटील आणि बिंदू चौक सबजेलचे पोलिस हवालदार संजीव घाणेकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले.
- पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रजासत्ताकदिनी गौरव केला जातो.
- कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी गुप्तवार्ता विभागात अपर उपायुक्त म्हणून सेवा बजावणारे संजीवकुमार विश्वास पाटील आणि बिंदू चौक सबजेलमध्ये पोलिस हवालदार म्हणून सेवा बजावणारे संजीव सखाराम घाणेकर यांना राष्ट्रपदी पोलिस पदक जाहीर झाले.
पद्मावत चित्रपटाला चार मोठ्या राज्यांत नो एन्ट्री :
- संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमाला होणारा विरोध पाहता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- देशातील अनेक भागांमध्ये राजपूत संघटना आणि करणी सेनेकडून हिंसक आंदोलने सुरू आहेत.
- खरंतर हा सिनेमा डिसेंबर 2017मध्ये रिलीज होणार होता, मात्र करणी सेनेचा तीव्र विरोध आणि सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यानं सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
- तसेच यानंतर सेन्सॉर बोर्डच्या सूचनेनुसार ‘पद्मावती’ सिनेमाच्या नावात ‘पद्मावत‘ असा बदल करण्यात आला.
चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यांना आणखी पाच वर्षाची शिक्षा :
- कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याशी संबंधित तिस-या खटल्यातही बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
- तसेच आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही 5 वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे.
- चैबासा कोषागारातून 1990 मध्ये बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये 37.62 कोटी परस्पर काढल्याप्रकरणी यादव व मिश्रा यांना 5 वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा, तसेच लालू प्रसादना 10 लाख रुपये, तर मिश्रा यांना 5 लाख रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे.
- आधीच्या चारा घोटाळ्यात शिक्षा सुनावल्यापासून लालू 23 डिसेंबरपासून तुरुंगात आहेत. दंड न भरल्यास लालू व मिश्रा यांना आणखी एक वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल.
दिनविशेष :
- सन 1755मध्ये 25 जानेवारी रोजी मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.
- थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी 25 जानेवारी 1881 मध्ये ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.
- हिमाचल प्रदेशला 25 जानेवारी 1971 मध्ये पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे 18 वे राज्य बनले.
- स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना सन 2001 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा