Current Affairs of 25 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 एप्रिल 2018)

चालू घडामोडी (25 एप्रिल 2018)

सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची गरज :

 • संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षा परिषद सध्याची सुरक्षा आव्हाने पेलण्यास असमर्थ ठरत असून काही वेळा त्यांची ही आव्हाने पेलण्याची इच्छा आहे असेही दिसत नाही, त्यामुळे बदलत्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची फेररचना करण्याची गरज आहे, असे मत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्र मंत्री पातळीवरील बैठकीत व्यक्त केले.
 • परराष्ट्र मंत्री स्वराज यांनी सांगितले, की जागतिक दहशतवाद व व्यापार धोरणांमधील संकुचितता हे दोन महत्त्वाचे मुद्दे सध्या जगासमोर आहेत.
 • सुरक्षा परिषदेच्या स्थायी व अस्थायी सदस्य देशांच्या संख्येचा विस्तार करण्याची मागणी भारत, ब्राझील, जर्मन व जपान यांनी वेळोवेळी केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षा परिषद जास्त प्रातिनिधिक असावे, तसेच त्यात बदलत्या जागतिक व्यवस्थेचे प्रतिबिंब असावे असे या देशांचे म्हणणे आहे. 

राज्यात नवीन निसर्ग पर्यटन केंद्रे उभारणार :

 • लोकसहभागातून राज्यात 320 निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठीच्या पहिल्या टप्प्यातील 106 जागांवर काम सुरू करण्यात आले असून, पुढील पाच वर्षांसाठी 120 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
 • सध्याच्या प्रसिद्ध निसर्ग पर्यटन केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यामुळे स्थानिक पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहेत.
 • तसेच याचा विचार करून राज्यात नवीन निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी राज्य शासनाने 2015 मध्ये स्वतंत्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना केली.
 • स्थानिक वन संरक्षण समित्यांद्वारे ही केंद्रे संचालित असतील, अशी माहिती अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठीही टोकन पध्दत लागू होणार :

 • श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी तिरुपती व शिर्डीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड) सुरू केले जाणार असल्याचे मागील कार्तिकी यात्रेच्या वेळी सांगितले गेले होते.
 • आता येत्या आषाढी यात्रेपासून अशी व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी जाहीर केले.
 • टोकन देण्यासाठी पंढरपूरमध्ये तीस ठिकाणी काउंटर सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनेतून ही व्यवस्था सुरू केली जाणार असल्याने समितीला त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही, असे सांगण्यात आले.

टाटा सन्सच्या प्रमुखपदी एस. जयशंकर :

 • टाटा सन्सच्या वैश्विक आणि कार्पोरेट विभागाच्या अध्यक्षपदी माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • टाटाच्या जागतिक कार्पोरेट कामकाजाच्या जबाबदारीसह टाटाची जागतिक धोरणं ठरवण्याची जबाबदारीही जयशंकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
 • जयशंकर हे जानेवारी 2015 ते जानेवारी 2018 दरम्यान देशाच्या परराष्ट्र सचिवपदी होते. आता ते नवी जबाबदारी पार पाडणार आहेत.
 • टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून जयशंकर यांना टाटाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना रिपोर्ट द्यावा लागणार आहे.

मनी ट्रान्स्फरमध्ये भारत आघाडीवर :

 • नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम प्राप्त करण्यात भारत आघाडीवर आहे.
 • जागतिक बँकेने सोमवारी जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार परदेशांत स्थायिक झालेल्या भारतीयांनी 2017मध्ये 69 अब्ज डॉलर (4 हजार 485 अब्ज रुपये) भारतात पाठविल्याचे समोर आले आहे. ही रक्कम 2016मध्ये देशात पाठविलेल्या रकमेच्या तुलनेत 9.9 टक्के अधिक आहे.
 • जागतिक बँकेच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे युरोप, रशिया आणि अमेरिकेतून पाठ‌विण्यात येणाऱ्या रकमेचे प्रमाण वाढले आहे.
 • जगभरातील गरीब देशांना अशापद्धतीने पाठवण्यात येणाऱ्या रकमेचा मोठा आधार असतो. अहवालात नमूद केल्याप्रमाणे कच्च्या तेलाचे वाढलेले दर, तसेच युरो आणि रुबल मजबूत झाल्यामुळे पाठविण्यात येणाऱ्या रकमेचे प्रमाण वाढले आहे.

महत्त्वाकांक्षी योजनेला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी :

 • देशभरातील कामगार व मजुरांना सामाजिक सुरक्षेचे कवच देणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेला पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिली आहे.
 • कामगार मंत्रालयाने या योजनेचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाला सादर केला होता. देशभरातील सुमारे 50 कोटी कामगार, मजुरांना या योजनेचा लाभ होईल. एका सरकारी उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
 • केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाचे मंत्री व सचिवांची नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत कामगार मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या योजनेचे सादरीकरण केले. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखविला.
 • या योजनेचा लाभ प्रामुख्याने शेतमजुरांना होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळाल्याने कामगार व अर्थ मंत्रालय या योजनेची तपशीलवार आखणी करणार आहेत.

दिनविशेष :

 • सन 1859 मध्ये सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.
 • रेडिओचे संशोधक ‘गुग्लिएल्मो मार्कोनी’ यांचा जन्म 25 एप्रिल 1874 मध्ये झाला.
 • 25 एप्रिल 1983 रोजी पायोनिअर-10 हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.
 • श्रीलंकेच्या संसदेने 25 एप्रिल 1989 रोजी भारतीय वंशाच्या 3,30,000 तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 एप्रिल 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.