Current Affairs of 22 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (22 नोव्हेंबर 2017)
प्रधानमंत्री मातृवंदना योजना 1 जानेवारी पासून लागू होणार :
- मातांना पहिल्या प्रसूतीवेळी पाच हजार रुपयांचे अनुदान देणारी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ 1 जानेवारी 2018 पासून महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे.
- केंद्र आणि राज्याच्या शासकीय व निमशासकीय सेवेत असणा-या महिला वगळता सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहतील.
- विशेष म्हणजे 2017 मध्ये पहिली प्रसूती झालेल्या माताही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
- गेल्याच वर्षी भारतातील अन्य राज्यांमध्ये केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची ही योजना सुरू करण्यात आली. मात्र महाराष्ट्रामध्ये ही योजना महिला व बालकल्याण विभागाने राबवायची की आरोग्य विभागाने राबवायची याचा निर्णय लवकर झाला नाही. अखेर ही योजना आरोग्य विभागाने राबविण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यानुसार नियोजनही सुरू झाले आहे.
- अधिकाधिक गरोदर मातांनी शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी नोंद करावी. त्यानिमित्ताने त्या महिलेचे आरोग्य कार्ड तयार व्हावे आणि प्रसूतीनंतर बाळाला आवश्यक त्या सर्व लसी दिल्या जाव्यात, हे उद्देश ठेवून ही योजना भारतभर लागू करण्यात आली आहे. तिची अंमलबजावणी आता महाराष्ट्रात होणार आहे.
- अगदी खासगी रुग्णालयातही प्रसूती झाली तरी त्या मातेला हे अनुदान मिळणार आहे. मात्र पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात नोंद करून आरोग्य कार्ड तयार करून घेणे बंधनकारक राहणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
इंडियन पॅनोरमाचे श्रीदेवीच्या हस्ते उद्घाटन :
- 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमाचे चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते 21 नोव्हेंबर रोजी उद्घाटन झाले.
- इंडियन पॅनोरमा 2017 अंतर्गत 26 कथापट आणि 16 कथाबाह्य चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यावेळी इंडियन पॅनोरमा 2017 मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रथितयश आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना श्रीदेवी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.इंडियन पॅनोरमाच्या उद्घाटन कार्यक्रमात सर्वांसमवेत उपस्थित राहणे, हा माझा सन्मान असल्याची भावना श्रीदेवी यांनी व्यक्त केली.
- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला हा एक उत्कंठावर्धक विभाग आहे. इंडियन पॅनोरमामध्ये विविध भागातल्या बहुभाषिक कथापट आणि कथाबाह्य चित्रपटांची सन्माननीय ज्युरींकडून विशेष निवड झाली आहे.
- इंडियन पॅनोरमाच्या उद्घाटन समारंभात प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे आनंदाचे असल्याचे इफ्फी महोत्सव संचालक सुनित टंडन यांनी सांगितले. हा महोत्सव इफ्फीचा अविभाज्य भाग असल्याचे ते म्हणाले. सर्वोत्कृष्ट कथापट आणि कथाबाह्य चित्रपटांना देश-विदेशात प्रोत्साहन देणे हा या मागचा हेतु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेली अनेक वर्ष इंडियन पॅनोरमाद्वारे सर्वोत्कृष्ट चित्रकृतींचे दर्शन घडत असून, या वर्षीही ही परंपरा अबाधित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- तसेच गोव्यात सुरु झालेला 48वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 28 तारखेपर्यंत रंगणार आहे.
सुजित गुंजाळ बॅटन ऑफ ऑनर डायरेक्टर ट्रॉफीचे मानकरी :
- टाणा जिल्हा. नाशिक येथील सुजित पंढरीनाथ गुंजाळ हे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर बॅटन ऑफ ऑनर डायरेक्टर ट्रॉफीचे मानकरी ठरले आहेत.
- देशात महाराष्ट्राचा एकमेव प्रतिनिधी म्हणून सुजित गुंजाळ यांनी हा बहुमान मिळविल्यामुळे बागलाण तालुक्याचे नाव उंचावले आहे.
- स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे सन 2015-16 मध्ये केंद्रीय पोलिस सेवा परीक्षेमार्फत घेण्यात आलेल्या सीमा सुरक्षा दलात सुजित गुंजाळ यांची उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली होती. ग्वाल्हेर येथे 52 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 8 नोव्हेंबर 2017 रोजी भारतातील एकूण 408 प्रशिक्षनार्थीना पद व कर्तव्यनिष्ठेची शपथ देण्यात आली. त्यामध्ये गुंजाळ हे देशातून एकमेव महाराष्ट्राचे प्रतिनिधी होते.
- कायदा, अंतर्गत सुरक्षा, नेतृत्व क्षमता या निकषांवर देण्यात येणाऱ्या बॅटन ऑफ ऑनर डायरेक्टर ट्रॉफी देऊन गुंजाळ यांना गौरविण्यात आले.
- मध्यप्रदेशचे गृह व वाहतूकमंत्री भूपेंद्रसिंग, पोलिस अकादमीचे संचालक एस.के. वर्मा व इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या हस्ते झालेल्या दीक्षांत समारंभात गुंजाळ यांनी 7 क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना गौरविण्यात आले.
29 नोव्हेंबरला मराठा आरक्षणासाठी पहिली बैठक :
- आर्थिक मागास समाजातील तरुणांना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत आखलेल्या कर्ज व्याज परताव्याच्या तीन योजनांना राज्य सरकारने मान्यता दिली असून, त्याचा शासन निर्णयही काढण्यात आला असल्याची माहिती महसूलमंत्री तथा मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
- तसेच मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाची पहिली बैठक येत्या 29 नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील उपसमितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पाटील म्हणाले, की मराठा आरक्षणाचा मुद्या न्यायालयात प्रलंबित आहे. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्त्वाचा आहे.
- आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सोपी होणार असल्याचा दावा पाटील यांनी केला. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी संस्थांना दहा हजार रुपये प्रतिविद्यार्थी अशी रक्कम देण्यात येणार आहे. कायमस्वरूपी वसतिगृहासाठी पाच कोटी राज्य शासन देणार आहे. त्यासंदर्भातही आखणी सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
दिनविशेष :
- धर्मरहस्यकार ‘केशव लक्ष्मण दफ्तरी’ यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1880 मध्ये झाला.
- 22 नोव्हेंबर 2002 हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसैनिक “गोविंदभाई श्रॉफ” यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा