Current Affairs of 21 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2017)

देशातील उत्कृष्ट पत्रकारांचा गौरव समारंभ :

  • देशातील 27 उत्कृष्ट पत्रकारांचा ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्डस 2016’ ने गौरव करण्यात आला. या पुरस्कारांचे हे बारावे वर्ष आहे.
  • नवी दिल्लीत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा पार पडला. यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
  • एक्स्प्रेस वृत्तसमूहाकडून त्यांचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 2006 साली या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.
  • मानचिन्ह आणि प्रत्येकी 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या 7 तर ‘लोकसत्ता‘च्या 1 महिला पत्रकाराने या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.
  • यंदा या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड करण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी.एन. श्रीकृष्ण, एचडीएफसी लि.चे अध्यक्ष दीपक पारेख, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी आणि वरिष्ठ पत्रकार पामेला फिलिपोज यांसारख्या नावाजलेल्या परीक्षकांनी पार पाडले.

सहा महिन्यांनंतर न्या. कर्णन तुरूंगाबाहेर :

  • न्यायालयाचा अवमानना केल्याप्रकरणी सहा महिने तुरूंगवासाची शिक्षा झालेले कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती एस. कर्णन 20 डिसेंबर रोजी मुक्त झाले. त्यांना 20 जून रोजी अटक करण्यात आली होती.
  • न्या. कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती जे.एस. केहर आणि इतर न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यासाठी त्यांनी सीबीआय चौकशीचे निर्देशही दिले होते. हे आरोप म्हणजे न्यायालयाचा अवमानना असल्याचे केहर यांनी म्हटले होते. त्यानंतर 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने कर्णन यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते.
  • न्या. कर्णन यांना निवृत्तीनंतर तुरूंगात पाठवावे का यावर या खंडपीठाचे एकमत झाले नव्हते. एक न्यायाधीश तुरूंगात जाणे म्हणजे न्याय व्यवस्थेवर हा कलंक असल्याचे मानले जाईल, असे काहींचे मत बनले होते. परंतु, नंतर खंडपीठाने सर्व शक्यता फेटाळून अवमानना कोण केलीय फरक पडत नसल्याचे मत व्यक्त केले होते.
  • तसेच यापूर्वी न्या. कर्णन यांनी भारताचे तत्कालीन मुख्य न्यायमुर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर 7 न्यायाधीशांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

विराट-अनुष्काचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण :

  • बॉलिवूडमधील सध्याची बहुचर्चित जोडी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे नुकतेच इटलीत लग्न झाले. आता खास स्वागत समारंभ 21 डिसेंबर रोजी होणार आहे. या समारंभासाठी या नवदांपत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून निमंत्रण दिले.
  • फक्त जवळच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत विराट-अनुष्काचे लग्न झाल्यानंतर त्यांनी सर्व नातेवाईक आणि मित्र परिवारासाठी दिल्लीत 21 तर मुंबईत 26 डिसेंबर रोजी स्वागत समारंभ ठेवला आहे. या समारंभाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

2000 रुपयांची नोट माघारी घेतली जाण्याची शक्यता :

  • नोटाबंदीनंतर चलनात आलेली 2000 रुपयांची नोटही माघारी घेतली जाण्याची शक्यता वर्तवितानाच नव्याने छापलेल्या 15.78 लाख कोटी मूल्याच्या नोटांपैकी 2.46 लाख कोटींहून अधिक मूल्याच्या नोटा चलनात आल्या नसल्याची शंका स्टेट बँकेने व्यक्त केली आहे.
  • केंद्रीय अर्थ खाते आणि रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या माहितीच्या आधारावर स्टेट बँकेने हा अहवाल तयार केला आहे. त्यात नवीन 2000 रुपयांची चलनी नोट मागे घेतली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
  • रिझव्‍‌र्ह बँकेने नोटाबंदीनंतर छापलेल्या मोठ्या मूल्याच्या नोटांपैकी अधिकतर नोटा प्रत्यक्षात चलनात आल्या नसल्याचे कारण देण्यात आले आहे.
  • रिझव्‍‌र्ह बँकेने 15,78,700 कोटी रुपये मूल्याच्या नोटा नोव्हेंबर 2016 मधील नोटाबंदीनंतर छापल्या; मात्र पैकी 2,46,300 कोटी रुपयांच्या नोटा अद्यापही चलनात आलेल्या नाहीत, असे स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष म्हणाले. रिझव्‍‌र्ह बँकेने छापलेल्या 500 रुपयांच्या नोटांची संख्या 1657 कोटी तर 2000 रुपयांच्या नोटांची संख्या 365 कोटी असल्याची माहिती अर्थ खात्याने लोकसभेला दिली आहे.

पाक लष्करप्रमुखांची सरकारला विनंती :

  • भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्व संबंध सुधारण्यासाठी आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. भारताशी संबंध सुधारावे अशी विनंतीच बाजवा यांनी पाकिस्तानमधील सरकारला केली असून यासाठी पाक लष्कराचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  • इस्लामाबादमध्ये लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा, पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे प्रमुख नावीद मुख्तार आणि लष्करातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिनेट समितीशी चर्चा केली. सुमारे साडे चार तास ही चर्चा सुरु होती. बाजवा लष्करप्रमुखपदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच ही बैठक पार पडली. या बैठकीत बाजवा यांनी भारताशी संबंध सुधारण्यावर भर दिल्याचे पाकिस्तानमधील माध्यमांनी म्हटले आहे.
  • ‘शेजारी राष्ट्रांशी संबंध सुरळीत होण्याची गरज आहे. भारताशी संबंध सुधारण्यावर पाक सरकारने भर द्यावा. या प्रयत्नांना पाक लष्कराचा पाठिंबा असेल’, अशी ग्वाही देखील बाजवा यांनी दिली.

दिनविशेष :

  • सन 1909 मध्ये 21 डिसेंबर रोजी अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
  • ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) हे सन 1913 मध्ये 21 डिसेंबर रोजी न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
  • रघुनंदन स्वरुप पाठक यांनी 21 डिसेंबर 1986 रोजी भारताचे 18 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/v6m32cfIA_c?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.