Current Affairs of 16 May 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (16 मे 2018)
निवृत्तिवेतनासाठी आधारची सक्ती नाही :
- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही, असे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
- स्वयंसेवी संस्थांच्या तिसाव्या बैठकीत त्यांनी सांगितले, की बँकेस भेट न देता जिवंत असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी एक अतिरिक्त सुविधा म्हणून आधारचा वापर केला जावा अशी अपेक्षा आहे, पण आधार कार्ड अनिवार्य नाही.
- बँक खात्याला आधार जोडलेले नसल्यामुळे अनेक वृद्धांना निवृत्तिवेतन मिळत नाही अशी तक्रार असून, या बाबत आता मंत्र्यांनीच खुलासा केल्याने संभ्रम दूर झाला आहे. सिंह यांनी सांगितले, की सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनासाठी आधार कार्डची सक्ती केलेली नाही. केंद्र सरकारचे 48.41 लाख कर्मचारी असून 61.17 लाख निवृत्तिवेतनधारक आहेत.
- किमान निवृत्तिवेतन मर्यादा आता 9000 रुपये करण्यात आली आहे, तर अंशदान हे 20 लाखांपर्यंत ठेवले आहे. वैद्यकीय भत्ता महिना 1000 रुपये आहे अशी माहिती त्यांनी दिली. सातत्यपूर्ण उपस्थिती भत्ता 4500 रुपयांवरून 6750 रुपये करण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
रितीशा गुप्ता आयएससी परीक्षेत देशात दुसरी :
- पुण्याच्या रितीशा गुप्ता हिने आयएससी परीक्षेत 99.25 टक्के मिळवुन देशात दुसरा क्रमांक पटकावला. आयसीएसई आणि आयएससी परीक्षांचे निकाल 14 मे रोजी जाहिर करण्यात आले. निकाल जाहिर झाल्यानंतर पुणे आणि मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
- आयएससी परीक्षेत देशातील प्रथम क्रमांकावर 7, दुसर्या क्रमांकावर 17, तर तिसर्या क्रमांकावर 25 विद्यार्थ्यांनी बाजी मारली. रितीशा आयएससी परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱय़ा 17 विद्यार्थ्यांपैकी एक आहे.
- रितीशा पुणे कॅम्प येथील बिशप्स स्कुलमध्ये शिकते. तिला इतिहास विषयाची व पियानो वादनाची आवड आहे. ती दिल्ली विद्यापिठातून राज्यशास्त्र विषयात पुढील शिक्षण घेण्याची तयारी करत आहे.
- तसेच नवी मुंबईच्या सयंम दास याने आयसीएसई परीक्षेत 99.4 टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर कालवश :
- लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर (वय 103) यांचे वाई येथे 15 मे रोजी निधन झाले. कृष्णाकाठच्या या कलासाधिकेने सारं आयुष्य कलेसाठीच अर्पण केलं.
- 31 डिसेंबर 1915 रोजी यमुनाबाई वाईकर यांचा जन्म वाई (जि. सातारा) येथील कोल्हाटी समाजात झाला. आयुष्याच्या मार्गातील अनेक खडतर प्रसंगाना सामोरे जात त्यांनी स्वतःच्या कलेने, लावणीस सम्राज्ञीपदावर पोहचवले. कलेबरोबरच गावाला, समाजाला आणि याच वाटेने चालणाऱ्या असंख्य कलाकारांना आनंदाचे वाटेकरी केले.
- तसेच यमुनाबाईंनी कोल्हाटी-डोंबारी समाजास केंद्रशासनाच्या दप्तरी अत्यंत गौरवाचे स्थान मिळवून दिले. महाराची पोर नाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले. त्यांच्या या तमाशाफडात दडलेले नाट्य आणि संगीत गावोगावच्या रसिकांना अनुभवायला मिळाले आहे. त्यांच्या निधनाने पारंपारिक लावणी जपणाऱ्या कलावंतास देश मुकला आहे.
दोनशे उपयोजने फेसबुककडून बंद :
- फेसबुकने वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा गैरवापर करणारी दोनशे उपयोजने काढून टाकली आहेत. केंब्रिज अॅनॅलिटिका या राजकीय सल्लागार आस्थापनेने 87 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांची माहिती चोरली होती, त्याबाबत चौकशी सुरू असून, त्या वेळी या माहितीचा वापर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2016 मधील प्रचाराच्या वेळी करण्यात आला होता. चौकशी वेगात सुरू असल्याचे फेसबुकचे उत्पादन भागीदारी उपाध्यक्ष इमी आर्चिबोंग यांनी सांगितले. ज्या उपयोजनांनी माहितीचा गैरवापर केला ती काढून टाकण्यात येत असून त्यांच्यावर बंदी घालण्यात येत आहे. वापरकर्त्यांनाही बंदी घातलेल्या उपयोजनांची माहिती देण्यात येणार आहे.
- केंब्रिज अॅनॅलिटिका प्रकरणामुळे फेसबुकने माहिती गैरवापराची चौकशी सुरू केली आहे. त्यात व्यक्तिगत माहिती कशी वापरली गेली, ती कशी मिळवण्यात आली या सर्व अंगांनी विचार सुरू आहे.
- 2014 मध्येच फेसबुकने धोरणात बदल करून काही उपयोजने म्हणजे अॅप्सना खासगी माहितीचा वापर करण्यास बंदी केली होती तरीही काही उपयोजने माहितीचा वापर करीत होती.
- तसेच लोकांच्या माहितीचा गैरवापर करणारी सर्व उपयोजने शोधून काढण्याचे काम सुरू आहे. केंब्रिज अॅनॅलिटिका प्रकरणात बाहेर आलेल्या माहितीमुळे होणाऱ्या परिणामांचा विचार फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी गेला महिनाभर केला आहे.
आयसीसी अध्यक्षपदी पुन्हा शशांक मनोहर यांची निवड :
- आयसीसीच्या अध्यक्षपदी भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. 15 मे रोजी झालेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.
- 2016 साली शशांक यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती, यानंतर अध्यक्षपदाची मनोहर यांची ही दुसरी टर्म असणार आहे.
- ‘आयसीसीच्या अध्यक्षपदी फेरनिवड होणं हा माझ्यासाठी एकप्रकारे सन्मान आहे. माझ्या नावाला पाठींबा देणाऱ्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो आहे. 2016 साली जी आश्वासन मी दिली होती, ती पूर्ण करण्यात काही अंशी यश आलं आहे. आगामी वर्षांमध्ये ही आश्वासनं पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.’ फेरनिवडीनंतर शशांक मनोहर यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.
दिनविशेष :
- क्रांतिकारक ‘बाळकृष्ण चाफेकर’ यांना 16 मे 1899 मध्ये फाशी झाली.
- 16 मे 1975 मध्ये सिक्कीम भारतात विलीन झाले.
- सन 1975 मध्ये जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.
- भारताचे 10वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी 16 मे 1996 मध्ये सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ 13 दिवस टिकले.