Current Affairs of 13 November 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 नोव्हेंबर 2017)

चालू घडामोडी (13 नोव्हेंबर 2017)

बँकिंग विषयात आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय :

 • देशात इस्लामिक बँकिंग न आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सर्व नागरिकांना बँकिंग आणि इतर आर्थिक सेवांचा समान लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. ‘भारतात इस्लामिक बँकिंग आणण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने विचार केला. मात्र सर्वांना बँकिंग आणि आर्थिक सेवांचा समान लाभ घेता यावा, यासाठी हा प्रस्ताव रद्द करण्यात आला,’ असे माहिती अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाला उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने म्हटले.
 • इस्लामिक किंवा शरिया बँकिंग व्यवस्था व्याज न घेण्याच्या सिद्धांतावर चालते. कारण व्याज स्वीकारणे इस्लाममध्ये हराम समजले जाते. त्यामुळे शरियानुसार इस्लामिक बँकिंग सुरु करण्यात यावी, असा प्रस्ताव आरबीआयकडून अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर पीटीआय वृत्तसंस्थेच्या एका प्रतिनिधीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे माहिती अधिकारांतर्गत विचारणा केली होती. या अर्जाला रिझर्व्ह बँकेकडून उत्तर देण्यात आले.
 • तसेच ‘सर्व नागरिकांना बँकिंग आणि आर्थिक सेवा समान रुपात उपलब्ध आहेत. त्यामुळे याबद्दलच्या प्रस्तावाला मूर्त स्वरुप न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन :

 • कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे 26 नोव्हेंबर रोजी 22 वे ग्रामीण साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत राजन खान (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली सात सत्रांत होत आहे.
 • यंदाच्या संमेलनाचे उद्‌घाटक म्हणून महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे, अशी माहिती साहित्य विकास मंडळाच्या अध्यक्षा कल्पना रायजाधव यांनी दिली.
 • कारदगा येथे आयोजित पत्रकार बैठकीत त्या बोलत होत्या. सकाळी 8 ते 9 ग्रंथदिंडी, 10 ते 12.30 पर्यंत उद्‌घाटनसत्र, निपाणीतील लेखक कृष्णा खोत यांच्या ‘बोअरवेल’ पुस्तकाचे प्रकाशन व राजन खान यांचे अध्यक्षीय भाषण होईल. दुसऱ्या सत्रात दुपारी 12.30 वाजता पुणे येथील संजय कुलकर्णी यांचे ‘कुटुंबातील संवाद’ विषयावर मुक्तचिंतन होणार आहे. तसेच त्यानंतर ठरल्या वेळेत इतर कार्यक्रम पार पडतील.

चीनचा प्रभाव रोखण्याची रणनीती :

 • फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे होत असलेल्या तीन दिवसीय ‘आसिआन’ आणि ‘ईस्ट एशिया समिट’ या परिषदांच्या पाश्र्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या प्रतिनिधींची 12 नोव्हेंबर रोजी बैठक झाली.
 • अधिकृतरित्या आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित व्यवस्था कायम राखणे, शस्त्रास्त्र प्रसार रोखणे, दहशतवादाला आळा घालणे, मुक्त व्यापार व संपर्क वाढवून समृद्धी आणणे अशी या चार देशांच्या चर्चेची उद्दिष्टय़े असल्याचे सांगितले गेले असले तरी या माध्यमातून चीनच्या वाढत्या प्रभावाला आवर घालण्यासाठी हे चार देश एकत्र येऊन रणनीती ठरवत असल्याचे मानले जात आहे.
 • ‘आसिआन’ परिषदेत व्यापार व गुंतवणूक या विषयांना प्राधान्य असेल. तर ईस्ट एशिया समिटमध्ये सागरी सुरक्षा, दहशतवाद, अण्वस्त्र प्रसारबंदी आणि स्थलांतर आदी विषयही चर्चेला येतील. भारताचा भर या प्रदेशातील व्यापारी व सामरिक संबंध सुधारण्यावर असेल. दक्षिण चीन समुद्रातील चीनची अरेरावी आणि उत्तर कोरियाची अण्वस्त्रलालसा यांना पायबंद घालण्याबाबतही विचार होईल.

अनसूया साराभाई यांना गुगलची मानवंदना :

 • महनीय व्यक्तींना डुडलच्या माध्यमातून मानवंदना देणाऱ्या गुगलने 11 नोव्हेंबर रोजी मजूर महाजन संघाच्या संस्थापकसामाजिक कार्यकर्त्या अनसूया साराभाई यांना आदरांजली वाहिली आहे.
 • साराभाई यांच्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांचे खास डुडल साकारले आहे. अनसूया साराभाई यांनी देशातील कामगारांसाठी दिलेल्या लढ्याच्या आठवणी त्या निमित्ताने पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
 • अनसूया यांचा जन्म 11 नोव्हेंबर, 1885 मध्ये अहमदाबाद येथे झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या अनसूया व त्यांच्या भांवडांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. 13व्या वर्षी त्यांचा बालविवाह झाला. पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. त्यांनतर त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून वैद्यकीय शिक्षण घ्यायचे ठरवले. त्यासाठी भावाच्या मदतीने त्यांनी लंडन गाठले. मात्र, लंडनला गेल्यावर त्यांनी विचार बदलला आणि ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये प्रवेश घेतला.
 • भारतात परतल्यानंतर त्यांनी महिला आणि समाजातील गरीब व्यक्तींसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. गिरण्यांमध्ये 36-36 तास काम करणाऱ्या महिला कामगारांना पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी गिरणी कामगारांना न्याय मिळावून देण्याचा निर्णय घेतला.

उत्तर प्रदेशात भगव्या रंगाचा संकल्प :

 • महामार्गांवरील फलकांना भगवा रंग देण्याचा आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. भगवेकरणाचा नवा टप्पा महामार्गावर आखला जात असून महामार्गांवर असलेले सूचनाफलक बदलले जाणार आहेत.
 • सूचनाफलकाचे डिझाइनही तयार केले जात आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची छायाचित्रे असतील. वाहतुकीच्या कायद्यांनुसार हे फलक तयार केले जाणार असून ते रेडियममुळे रात्रीही उठून दिसणार आहेत.
 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भगवा रंग आवडतो हे सर्वांना माहिती आहे. या रंगाच्या आकर्षणातूनच त्यांनी घर सोडले, संन्यास घेतला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे समाजासाठी जगू लागले. त्यांनी राज्यही भगवे करण्याचा संकल्प सोडल्याचे दिसत आहे.
 • तसेच मुख्यमंत्री निवासस्थानापासून सरकारी बसपर्यंत भगव्या रंगाचे आदेश देण्यात आले होतेच आता महामार्गांवरील फलकही भगवे होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे.

दिनविशेष :

 • पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तसेच भारतीय स्वातंत्र्यसैनिक “बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर” यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1873 मध्ये झाला.
 • शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा ‘रणजितसिंह’ यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1780 मध्ये झाला.  
 • प्रसिद्ध मराठी नाटककार ‘गोविंद बल्लाळ देवल’ यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1855 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.