Current Affairs of 10 March 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (10 मार्च 2018)
लाल किल्ला शिवरायांची गौरवगाथा ऐकणार :
- नुकत्याच दणक्यात झालेल्या शिवजयंतीने राजधानीमध्ये शिवरायांच्या नावाचा जयघोष झाला असतानाच आता दिल्लीकरांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचा रोमांचक अनुभव घेता येणार आहे. 6 एप्रिल ते 10 एप्रिलदरम्यान थेट ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रांगणात ‘जाणता राजा’चे प्रयोग होतील.
- या जंगी कार्यक्रमाची घोषणा केली ती केंद्रीय सांस्कृतिकमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी. या वेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार विनय सहस्रबुद्धे, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आणि महाराष्ट्रभूषण हे महानाटय़ाचे सर्वेसर्वा बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते.
- ‘छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे आदर्श आहेत. शिवचरित्र हे भावी पिढीसाठी अतिशय आदर्शवत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढय़ासही शिवाजी महाराजांची प्रेरणा होती. त्यांचे जीवनकार्य प्रेरणादायी असून दिल्लीकरांना ते आता अनुभवण्यास मिळणार असल्याचा आनंद वाटतो,’ असे महेश शर्मा यांनी सांगितले. त्यांच्याच हस्ते ऑनलाइन तिकीट विक्रीला प्रारंभ झाला.
Must Read (नक्की वाचा):
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय :
- स्वेच्छा मरणाबाबत सुप्रीम कोर्टाने 9 मार्च रोजी ऐतिहासिक निकाल दिला असून स्वेच्छा मरणाला सुप्रीम कोर्टाने सर्शत परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिला.
- स्वेच्छा मरणाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. स्वेच्छा मृत्यूला कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की, एखादी व्यक्ती जिवंतपणी असे इच्छापत्र करु शकते की ‘भविष्यात कधीही मी बरा होऊ न शकणाऱ्या कोमामध्ये गेलो तर मला कृत्रिमरित्या जगवणारी वैद्यकीय सेवा (व्हेंटिलेटर) देऊ नये.’
- घटनेने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. याचाच अर्थ घटनापीठाने सन्मानाने मरण्याचाही अधिकार दिला असल्याचे ध्वनित केले आहे.
- घटनापीठातील चार न्यायाधीशांनी आपले मत मांडले. परंतू पाच सदस्यीय घटनापीठाने जिवंतपणी मृत्यूपत्र करुन स्वेच्छा मरणाचा पर्याय योग्य असल्याचे नि:संदिग्धपणे सांगितले. हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असून अनेक वृद्ध तसेच जराजर्जर रुग्णांसाठी महत्त्वाचा असेल.
राज्यात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना होणार :
- स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी राज्य सरकारकडून 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ‘स्कील इंडिया’साठी 15 ते 25 वयोगटातील मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय पदवीधर तरूणांचे स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन केली जाणार आहेत. याचबरोबर राज्यात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 9 मार्च रोजी दिली.
- 2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री मुनगंटीवार सादर करत आहेत. राज्यातील विविध विभागांच्या दृष्टीने महत्वपूर्ण तरतूदी केल्या जात आहेत. या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी तरतूद करण्यात आली आहे.
- यापूर्वी राजर्षि शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेची मर्यादा 6 लाख होती आता ही मर्यादा वाढविण्यात आली असून, नवी मर्यादा 8 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. तसेच ‘स्टार्ट अप‘ उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु केले जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन 4 हजार रूपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. मानव विकास मिशनसाठी 350 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- तसेच याशिवाय चक्रधर स्वामींच्या नावे अध्यासन केंद्राची स्थापना केली जाणार आहे. महापुरुषांचे साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी वेबसाईटचीही निर्मिती केली जाणार आहे. या योजनेसाठी 4 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षक समितीमध्ये मनोमिलन :
- सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांच्या शिष्टाईमुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये पडलेल्या फुटीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
- शिवाजीराव साखरे यांना समितीच्या घटनेनुसार शिक्षक नेतेपद देण्यात आले. तर उदय शिंदे यांना राज्याध्यक्षपदी कायम ठेवून हे मनोमिलन करण्यात सोलापूरकरांना यश आले.
- राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या दोन मोठ्या संघटनांना फुटीने घेरले असताना ही घटना प्राथमिक शिक्षकांसाठी सुखद ठरणार आहे.
- प्राथमिक शिक्षक समितीमधील शिवाजीराव सारखे व उदय शिंदे या दोन्ही गटांची मनोमिलनाची बैठक सांगोला (जि.सोलापूर) येथे नुकतीच झाली. यामध्ये दोन्ही गटांनी झालेल्या सर्व घटनांवर पडदा टाकत संघटनेच्या हितासाठी प्राथमिक शिक्षक समिती अभेद्य ठेवण्याचा निर्णय घेतला.
- ओरस येथे प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक राज्य अधिवेशन झाले होते. यावेळी संघटनेमध्ये राज्याध्यक्षपदावरुन दोन गट पडले होते. राज्याध्यक्षपदी साताऱ्याचे उदय शिंदे यांची झालेली निवड ही लोकशाहीला मारक आहे, असे सांगत लातूरच्या शिवाजीराव साखरे यांनी समांतर संघटनेची घोषणा करून पुण्यात काही दिवसांपूर्वी त्यांच्या संघटनेची राज्य कार्यकारणीही जाहीर केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती.
राजस्थान सरकारने संमत केला नवा कायदा :
- बारा वर्षांच्या खालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा कायदा 9 मार्च रोजी राजस्थान विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे.
- मध्य प्रदेशनंतर असा कायदा करणारे राजस्थान हे दुसरे राज्य ठरले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश हे अशा प्रकारचा कायदा करणारे पहिले राज्य ठरले होते. गेल्या महिन्यात हरयाणा सरकारच्या विधानसभेमध्येही इंडियन पीनल कोडमधील बलात्काराच्या शिक्षेसंदर्भात कठोर शिक्षा करण्याचे सुचवण्यात आले होते.
- तसेच हे विधेयक 7 मार्च रोजी राजस्थान विधानसभेत सादर करण्यात आले होते. इंडियन पीनल कोडमध्ये 376-एए या कलमाची भर टाकण्यात आली असून त्यात स्पष्ट केले आहे की, ‘बारा वर्षांपर्यंतच्या महिलेवर बलात्कार केल्यास गुन्हेगार कुणीही असला तरी त्याला मृत्यूदंडाची किंवा किमान 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येईल. तुरुंगवासाची शिक्षा, जन्मठेपेपर्यंत म्हणजे व्यक्ती नैसर्गिकरीत्या मरण पावेपर्यंत वाढवता येईल. शिवाय आरोपीला दंडही ठोठावता येईल.’
दिनविशेष :
- 10 मार्च 1897 हा दिवस पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन आहे.
- प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना 10 मार्च 1922 रोजी 6 वर्षांची शिक्षा झाली.
- ‘ट्विटर’चे सहसंस्थापक बिझ स्टोन यांचा जन्म 10 मार्च 1974 रोजी झाला.
- युरेनस ग्रहाला शनी ग्रहासारखी कडी असल्याचा शोध 10 मार्च 1977 रोजी लागला.