Current Affairs of 1 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 फेब्रुवारी 2017)

चालू घडामोडी (1 फेब्रुवारी 2017)

योगेश बोंबाळेला ‘महान भारत केसरी’ पुरस्कार :

 • कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील हल्ल्याळ येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या योगेश बोंबाळे याने ‘महान भारत केसरी’ पुरस्कार पटकाविला. तर मुरगूडच्या स्वाती शिंदे हिने ‘वीरमाता कित्तूर राणी चन्नम्मा केसरी’ पुरस्कार पटकाविला.
 • योगेश बोंबाळेला 2 लाख रुपये व मानाची गदा प्रदान करण्यात आली. स्वाती शिंदेला 25 हजार रुपये व चांदीची गदा देण्यात आली.
 • कर्नाटकचे उच्चशिक्षणमंत्री आर.व्ही. देशपांडे यांच्यावतीने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 • स्पर्धेतील पुरुष गटात अंतिम फेरीत पै. योगेश बोंबाळे आणि पै. माउली जमदाडे हे दोघे कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचे मल्ल समोरासमोर आले होते. या लढतीत माउली जमदाडेने आक्रमक खेळ करताना योगेशवर दुहेरी पट काढला; परंतु योगेशने त्यातून सुटका करून घेतली. त्यानंतर संधी मिळताच योगेशने निकाल डावावर माउलीचा आडवा हात धरून त्यास चितपट केले.
 • पै. योगेश बोंबाळे मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मगरवाडी या छोट्याशा गावचा मल्ल असून, तो वस्ताद विश्वास हारुगले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र चक्काजाम :

 • मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, या आणि इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता सकल मराठा समाजाने मराठा क्रांतिमोर्चाच्या बॅनरखाली 31 जानेवारी रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले.
 • औरंगाबाद व नांदेड येथे झालेला लाठीमार, सेनगावला झालेली दगडफेक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाळपोळीच्या घटना वगळता, अन्यत्र आंदोलन शांततेत व शिस्तीत पार पडले. आंदोलनात महिला आणि युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय होता.
 • मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
 • सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलनकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून होते. त्यामुळे बघता-बघता राज्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली.

शिवपाल यादव करणार नव्या पक्षाची स्थापना :

 • समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवपालसिंह यादव यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा 31 जानेवारी रोजी केल्याने पक्षातील ‘यादवी’ला आता नवी कलाटणी मिळणार आहे.
 • विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर म्हणजे 11 मार्चनंतर नवीन पक्ष अस्तित्वात येईल, असे त्यांनी समर्थकांना सांगितले.
 • उत्त्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी तीव्र मतभेद झाल्यानंतर दुखावलेल्या शिवपाल यादव यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेऊन पुतण्या अखिलेशला आव्हान दिल्याचे मानले जात आहे. “तुम्ही सरकार स्थापन करा, आम्ही नवीन पक्ष स्थापन करू,” असे शिवपाल यादव म्हणाले.
 • तसेच ‘पक्षहिताविरोधात काम करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा अखिलेश यादव यांनी दिला. त्यानंतर काही मिनिटांतच शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली.

‘जे.के. सिमेंट ग्रेट मास्टर्स पुरस्कार’ जाहीर :

 • कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट शिरीष बेरी यांना देशातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘जे. के. सिमेंट ग्रेट मास्टर्स पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
 • गेली चार दशके त्यांनी आर्किटेक्चर क्षेत्रासाठी दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. रोख तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  
 • तसेच ही माहिती ‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर असोसिएशन’चे अध्यक्ष सतीशराज जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जगदाळे म्हणाले, सन 1990 पासून जे. के. मास्टर्स पुरस्कार प्रदान केले जात असून, आर्किटेक्चर क्षेत्रातील साठ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या एका आर्किटेक्टची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
 • दोन वर्षांतून एकदा देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी 11 देशांतून आर्किटेक्ट बेरी यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड झाली. त्यामुळे पहिल्यांदाच कोल्हापूरला हा पुरस्कार मिळाला आहे.

दिनविशेष :

 • 1 फेब्रुवारी 1831 रोजी ललित कला प्रदर्शन कलकत्ता येथे संपन्न झाले.
 • भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी झाली.
 • 1 फेब्रुवारी 2003 हा कल्‍पना चावला यांचे स्मृतीदिन आहे. त्या भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर तसेच भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होत्या.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 फेब्रुवारी 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.