8 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
8 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2018)
द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी कालवश:
- द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे 7 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते.
- चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून 94 वर्षीय करुणानिधी यांच्यावर उपचार सुरु होते. रक्तदाब जाणवू लागल्याने त्यांना 28 जुलैला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. करुणानिधी यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.
- तसेच तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. करूणानिधी यांच्यावर चेन्नईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत अनेक राजकीय नेते अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे.
- केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि देशातील सर्व राज्यातील राजधानीतील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. चेन्नईमध्ये राजकीय सन्मानासह करूणानिधींवर 8 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. तामिळनाडूसह संपूर्ण देशभरात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारतात मायक्रोसॉफ्टचे सरफेस बुक 2 सादर:
- मायक्रोसॉफ्टने आपले सरफेस बुक 2 हे उच्च श्रेणीतील लॅपटॉपचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तम फिचर्स आहेत.
- मायक्रोसॉफ्टने गत वर्षी सरफेस बुक 2 हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती. आता याला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. हे टु-इन-वन या प्रकारातील मॉडेल असल्यामुळे याला लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे. या मॉडेल सोबत सरफेस पेनही वापरता येणार आहे.
- मायक्रोसॉफ्ट सरफेस बुक 2 हा लॅपटॉप 13.5 आणि 15 इंच आकारमानाच्या डिस्प्लेमध्ये सादर करण्यात आला आहे. यातील 13.5 इंची मॉडेलमध्ये 3000 बाय 2000 पिक्सल्स क्षमतेचा तसेच पिक्सलसेन्स या प्रकारचा डिस्प्ले असेल. तर 15 इंची मॉडेलमध्ये 3400 बाय 2000 पिक्सल्स क्षमतेचा पिक्सलसेन्स या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे.
- तसेच याच्या विविध व्हेरियंटमध्ये सातव्या पिढीतील कोअर आय-5 आणि आठव्या पिढीतील कोअर आय-7 हे अत्यंत गतीमान प्रोसेसर देण्यात आले आहेत. याशिवाय यात एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स 1050 आणि जीटीएक्स 1060 हे ग्राफीक्स प्रोसेसर असतील.
- यातील विविध व्हेरियंटच्या रॅम 6 आणि 16 जीबी असतील. तर स्टोअरेजसाठी 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टिबी असे पर्याय देण्यात आले आहेत.
सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक नोंद:
- न्यायमुर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदाची 8 ऑगस्ट रोजी शपथ घेतली. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सध्या काम करणाऱ्या महिला न्यायाधीशांची संख्या तीनवर पोहोचली आहे. ही ऐतिहासिक नोंद असून त्यामुळे आर. भानूमती, इंदू मल्होत्रा आणि इंदिरा बॅनर्जी या तीन महिला न्यायाधीश पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाचे कामकाज पाहणार आहेत.
- स्वातंत्र्यानंतर देशात 1950 मध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. त्यानंतर आजवर आठ महिला न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाल्या आहेत. यामध्ये सर्वात पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी या होत्या, त्यांची नियुक्ती 1989 रोजी झाली होती. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयातून पदोन्नतीद्वारे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनलेल्या न्या. इंदिरा बॅनर्जी या 23 सप्टेंबर 2022 पर्यंत सेवेत असणार आहेत.
- न्या. बॅनर्जी यांनी मद्रास उच्च न्यायालयापूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी आणि त्यानंतर तेथेच मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आहे. बॅनर्जी यांच्यापूर्वी वरिष्ठ अधिवक्त्या इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनलेल्या सातव्या महिला न्यायाधिश ठरल्या होत्या. न्या. मल्होत्रा या पहिल्या महिला न्यायाधिश आहेत ज्यांची थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली आहे.
- दरम्यान, न्या. फातिमा बीवी यांच्यानंतर सुजाता मनोहर, रुमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा, रंजना प्रकाश देसाई आणि त्यानंतर आर. भानुमती या महिला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनल्या आहेत.
अॅट्रॉसिटी कायदा पूर्ववत करण्यास मंजुरी:
- अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अॅट्रॉसिटी कायदा) गुन्हा नोंदणी, अटक व अटकपूर्व जामीन या संबंधिच्या तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करून हा कायदा पूर्ववत करणारे सुधारणा विधेयक लोकसभेने मंजूर केले.
- डॉ. सुभाष काशिनाथ महाजन वि. महाराष्ट्र सरकार या प्रकरणात न्यायालयाने 20 मार्च रोजी हा निकाल दिल्यानंतर दलित समाजात देशभर संतापाची लाट उसळली होती. सरकारने वटहुकूम काढून हा निकाल निष्प्रभ करावा या मागणीसाठी दलित संघटनांनी 9 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत यांनी हे सुधारणा विधेयक तातडीने मांडले.
- अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल झाल्यावर आरोपीवर गुन्हा नोंदविण्यापूर्वी तक्रारीतील तथ्यांच्या खरेपणाची शहानिशा करावी व उपअधीक्षक दर्जाच्या वरिष्ठाची संमती घेतल्यानंतरच अटक करावी, अशी बंधने सर्वोच्च न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यावर घातली होती. तसेच अशा प्रकरणांतील आरोपींना अटकपूर्व जामीन मागण्याची सोयही उपलब्ध करून दिली होती.
- न्यायालयाचा हा निकाल निष्प्रभ करण्यासाठी या सुधारणा विधेयकाने मूळ अॅट्रॉसिटी कायद्यात 18 ए हे नवे कलम समाविष्ट केले जाईल. त्यात म्हटले आहे की, अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यापूर्वी तक्रारीची प्राथमिक शहानिशा करण्याची गरज असणार नाही तसेच आरोपीला अटक करण्यासाठी तपासी अधिकार्याने वरिष्ठाची संमती घेण्याचीही जरुरी नाही. कोणत्याही न्यायालयाने काहीही निकाल दिला असला तरी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 438 अन्वये असलेली अटकपूर्व जामिनाची तरतूद अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात लागू होणार नाही.
दिनविशेष:
- 8 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय मांजर दिन‘ आहे.
- सन 1942 मध्ये 8 ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.
- भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी 8 ऑगस्ट 1958 मध्ये कार्यान्वित झाली.
- पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सन 1994 मध्ये 8 ऑगस्ट रोजी सुरू केले.
- सन 1998 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा