7 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 जानेवारी 2019)

7 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 जानेवारी 2019)

भारतीयांच्या ई-वॉलेट वापरात वाढ:

 • जगातील दुसरा मोठा ऑनलाइन बाजार असणाऱ्या भारतात आता ई वॉलेटचा वापर 8 टक्क्यांनी वाढला आहे. एक व्यक्ती सरासरी तीन हजार रुपये डिजिटल पद्धतीद्वारे महिन्याला खर्च करत असल्याचे पाहणीतून आढळले आहे.
 • सध्या तंत्रज्ञानाने युग आहे. या डिजिटल युगात विविध कामांसाठी महाजालाचा वापर केला जातो. यामुळे वेबपोर्टल, अ‍ॅपचे प्रमाणही वाढले आहे. प्रत्येक वेळी रोखीचा वापर करण्यापेक्षा लोक ई वॉलेटचा किंवा डिजिटल पद्धतीचा वापर करू लागले असून महाजालाचा वापर करून पैसे भरण्याच्या वापरात 8.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. e wallet india
 • नोटाबंदीनंतर ई पद्धतीचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला आणि लोकांनी ई वॉलेटचा पर्याय मोठय़ा प्रमाणात स्वीकारला. सध्या दीडशेहून अधिक अ‍ॅप भ्रमणध्वनीच्या आयओएस आणि अँड्रॉईड प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.
 • अनेक बँकांचेही अ‍ॅप बाजारात आलेले आहेत. खरेदी किंवा खाद्यपदार्थ मागविताना बऱ्याचदा ई पद्धतीचा वापर केल्यास देय रकमेवर सवलत दिली जाते. त्यामुळे या पर्यायाचा वापर सहज केला जातो, असे डिजिटल माध्यम व्यवस्थापक आदित्य पाटील यांनी सांगितले, तर ग्राहक कमीत कमी दोन हजार ते साडेचार हजार रुपये दर महिन्याला डिजिटल पद्धतीद्वारे खर्च करतात, असे डिजिटल वॉलेट यंत्रणेचे प्रमुख साहिल कुमार यांनी सांगितले.

फुटबॉल स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक विजय:

 • आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने प्रारंभीच केलेल्या दोन गोलसह पायाभरणी करीत थायलंडवर 4-1 असा विजय मिळवला.
 • भारताने 1964 सालानंतर आशियाई स्पर्धेत मिळवलेला हा पहिला ऐतिहासिक विजय आहे. तसेच इतक्या मोठय़ा फरकासह मिळवलेलेही हे पहिलेच यश आहे.
 • कारकीर्दीतील दुसऱ्या आशियाई स्पर्धेत खेळणाऱ्या छेत्रीने सामन्याच्या २७व्या मिनिटाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टीवर पहिला गोल लगावला. त्यानंतर सहाच मिनिटांनी थायलंडचा कर्णधार टेरासिल दांगडाने 33व्या मिनिटाला थायलंडचा पहिला गोल रचून 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर पुन्हा भारताने त्यांच्या आक्रमणांची धार वाढवली. 46व्या मिनिटाला उदांता सिंगने दिलेल्या अप्रतिम पासवर छेत्रीने पुन्हा एकदा अफलातून गोल करीत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली.
 • ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीत भारत 97व्या स्थानावर आहे, तर थायलंड 118व्या स्थानावर असल्याने भारताला या सामन्यात वरचढ मानले जात होते. मात्र पूर्वार्धातच भारत विजयी आघाडी घेईल, अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती.

ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करावे लागणार:

 • केंद्र सरकार बनावट परवान्यांना लगाम घालण्यासाठी लवकरच वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आधारशी जोडणे (लिंक) अनिवार्य करणार आहे. 
 • सरकार लवकरच वाहनचालक परवान्याला आधार कार्ड संलग्न करणे अनिवार्य करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
 • आम्ही लवकरच एक कायदा आणणार असून, त्यायोगे वाहनचालक परवान्याला (ड्रायव्हिंग लायसन्स) आधार संलग्न करणे अनिवार्य करण्यात येईल, असे विधि, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री असलेले प्रसाद यांनी येथे सुरू असलेल्या 106व्या विज्ञान काँग्रेसमध्ये केलेल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
 • सध्या असे होते की, अपघात करून पळून जाणारी दोषी व्यक्ती दुय्यम (डुप्लिकेट) परवाना मिळवतो. यामुळे त्याला सहीसलामत सुटून जाणे शक्य होते. मात्र, परवान्याला आधार कार्ड संलग्न केल्यास, तुम्ही तुमचे नाव बदलू शकता, परंतु डोळ्यांची बुबुळे किंवा बोटांचे ठसे असे बायोमॅट्रिक्स बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही डुप्लिेकट लायसन्स घेण्यासाठी गेलात, की या व्यक्तीजवळ आधीच चालक परवाना असून त्याला नवा परवाना दिला जाऊ नये असे यंत्रणा सांगेल, अशा शब्दांत प्रसाद यांनी आधार संलग्न करण्याची कारणमीमांसा स्पष्ट केली.

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा:

 • शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा कालावधी संपणार आहे.
 • पक्षावर नाराज नाही, मात्र पक्षाकडून नवीन जबाबदारीची अपेक्षा असल्याने राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. सावंत यांच्या जागी संधी मिळावी, यासाठी सध्या शिवसेना नेत्यांकडून जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे.
 • पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कापण्यात आल्यामुळे डॉ. दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी 4 जुनला राजीनामा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला. यानंतर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला होता.
 • मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांना डच्चू दिला. विलास पोतनीस हे शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी पदवीधर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे.
 • आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

हेमंत भंडारी ठरला कनिष्ठ ‘मुंबई-श्री’:

 • बॉडी वर्कशॉपच्या हेमंत भंडारीने कनिष्ठ ‘मुंबई-श्री’चा किताब पटकावला. 60 किलो वजनी गटातील हेमंतने आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या सर्व खेळाडूंना मागे टाकले. Hemant Bhandari
 • दिव्यांग गटाच्या ‘मुंबई-श्री’मध्ये माँसाहेब जिमचा प्रथमेश भोसले अव्वल ठरला, तर मास्टर्स गटात संतोष ठोंबरे, मोहम्मद शेख आणि मुकुंद लांडगे आपापल्या गटात अव्वल ठरले.
 • कनिष्ठ ‘मुंबई-श्री’चा निकाल-
 • 55 किलो वजनी गट: 1. प्रशांत सडेकर, 2. वृषभ राणे, 3. नंदन नरे; 60 किलो: 1. हेमंत भंडारी, 2. अमेय नेवगे, 3. अमित यादव.
 • दिव्यांग ‘मुंबई-श्री’: प्रथमेश भोसले, मोहम्मद रियाझ आणि मेहबूब शेख.
 • नवोदित मुंबई फिटनेस फिजिक: कौस्तुभ पाटील, यज्ञेश भुरे आणि भाग्येश पाटील.
 • मास्टर्स मुंबई श्री: संतोष ठोंबरे, सुनील सावंत आणि दत्ताराम कदम (जय भवानी).

दिनविशेष:

 • युनिव्हर्सल स्टँडर्ड टाइमचे निर्माते सँडफोर्ड फ्लेमिंग यांचा जन्म 7 जानेवारी 1827 मध्ये झाला होता.
 • स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म 7 जानेवारी 1893 मध्ये झाला होता.
 • लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1920 मध्ये झाला होता.
 • सन 1927 मध्ये न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
 • कोलकाता येथे 7 जानेवारी 1935 रोजी इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.
 • सन 1972 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.