7 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
7 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2018)
ओबीसी विधेयकाला राज्यसभेत मंजुरी:
- ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचे महत्त्वाचे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले आहे. याआधी लोकसभेत 3 ऑगस्टला हे विधेयक मंजूर झाले होते. आता ते राज्यसभेतही मंजूर झाले आहे.
- 2019च्या निवडणुका लक्षात घेऊन मागासवर्गींना खुश करण्यासाठी मोदी सरकारने हे विधेयक मंजूर केल्याची चर्चा आहे.
- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी हे विधेयक मंजूर झाल्याने भाजपा कार्यकर्ते आणि देशाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. 156 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर या विधेकाच्या विरोधात एकही मत पडले नाही.
- ओबीसी विधेयकाला मंजुरी मिळाल्याने राज्यांच्या अधिकारांमध्ये घट होईल अशी जी शंका व्यक्त केली जात होती ती शंका निराधार आहे असे केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यावर राज्यांना जातीचा समावेश ओबीसीच्या केंद्रीय सूचीमध्ये करायचा असेल तर तसे ते आयोगाला कळवू शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):
चीनकडून वेगवान महासंगणक विकसित:
- चीनने नव्या पिढीतील महासंगणकाचे प्रारूप तयार केले असून त्याच्या मदतीने सेकंदाला क्विंटिलियन गणने करता येतात. संगणनाच्या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यात वापरण्यात आले असून ‘सनवे एक्सास्केल कॉम्प्युटर‘ असे त्याचे नाव आहे. हा संगणक 5 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला.
- नॅशनल रीसर्च सेंटर ऑफ पॅरलल कॉम्प्युटर इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, दी नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटर (जिनान), नॅशनल लॅबोरेटरी फॉर मरीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थांनी संयुक्तपणे या महासंगणकाची निर्मिती केली आहे. या संगणकाचे हे प्राथमिक रूप असून त्यात सेकंदाला क्विंटिलियन म्हणजे (1 वर अठरा शून्य-अब्ज अब्ज) गणने करता येतात.
- सनवे एक्सास्केल संगणकाचे प्राथमिक रूप हे संकल्पनेतील मोटार रस्त्यावर चालवण्यासारखे आहे, असे नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटरचे संचालक यांग मेइहाँग यांनी सांगितले. 2020च्या उत्तरार्धातील सर्वात प्रगत संगणक तयार करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
- सनवे ताइभूलाइट हा लागोपाठ दोन वर्षे 2016 व 2017 मध्ये जगातील वेगवान महासंगणक ठरला आहे. महासंगणकांमुळे हवामान अंदाज, महासागरी प्रवाह, आर्थिक माहिती, उत्पादन प्रक्रिया यातील चित्र बदलत असून त्यात प्रगती होत आहे, असे नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग सेंटरचे पॅन जिंगशान यांनी सांगितले.
- अमेरिका व जपान ही एक्सास्केल महासंगणक तयार करण्याच्या स्पर्धेत असून 2021 मध्ये त्यांचा नवीन महासंगणक तयार होईल. भारताने ‘प्रत्युश’ हा महासंगणक पुण्याच्या आयआयटीएम या हवामान प्रयोगशाळेत बसवला असून त्याचा वेग सेकंदाला 6.8 पेंटाफ्लॉप म्हणजे 1 हजार दशलक्ष-दशलक्ष गणने इतका आहे.
आयुष्मान भारत योजनेत आता नोकरीच्या संधी:
- केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत या राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मिशनमुळे देशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ही योजना लागू झाल्यामुळे देशात कमीत कमी 10 हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
- 10 कोटी गरिब परिवारांना आरोग्य सुरक्षा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी पाच लाखांचे सुरक्षा कवच देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये ‘आयुष्मान मित्र’ या पदांतर्गत भरती करण्यात येणार आहे.
- जवळपास 1 लाख आयुष्मान मित्रांची नेमणूक केली जाणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हे आयुष्मान मित्र आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना सरकारी योजनेचा लाभ घेण्यासंदर्भात माहिती देतील.
- या भरतीसाठी कौशल्य विकास मंत्रालयासोबत एक करार करण्यात आला आहे. आता सर्व नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये रुग्णांना मदत कऱण्यासाठी या आयुष्मान मित्रांची नेमणूक होईल. हे नव्याने भरण्यात आलेले लोक लाभार्थी आणि रुग्णालय यांच्यात समन्वयाची भूमिका बजावतील.
- प्रत्येक रुग्णालयांमध्ये याचा एक वेगळा डेस्क असेल. ज्याठिकाणी रुग्णांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम होईल. एकूण एक लाख आयुष्मान मित्रांची नोंदणी केली जाणार असली तरीही आता त्यातील 10 हजार पदे भरली जातील.
न्या. नरेश पाटील राज्याचे प्रभारी मुख्य न्यायाधीश:
- मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून राष्ट्रपतींनी ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांची 6 ऑगस्ट रोजी नियुक्ती केली. आधीच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्या. विजया कमलेश ताहिलरामाणी यांची मद्रास उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्याने न्या. पाटील यांची ही नियुक्ती झाली आहे.
- न्या. पाटील ऑक्टोबर 2001 पासून न्यायाधीश आहेत. न्या. ताहिलरामाणी मद्रासला केव्हा रुजू होणार हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्या 7 ऑगस्ट पासून उपलब्ध नाहीत असे गृहित धरून ‘बोर्ड’ तयार केले आहेत. त्यानुसार मुख्य न्यायाधीशांच्या कोर्ट नं. 1 मध्ये न्या. पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांचे खंडपीठ बसणार आहे.
पेप्सिकोचे नवे सीईओ ‘रेमन लॅगार्ट’ :
- पेप्सिको कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंदिरा नूयी 12 वर्षांनंतर आपल्या पदावरून पायउतार झाल्या आहेत. कंपनीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. 62 वर्षीय इंदिरा नूयी यांच्या जागी रेमन लॅगार्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पेप्सी कंपनीचे सहावे सीईओ असतील.
- पेप्सिको कंपनीच्या त्या पहिल्या महिला सीईओ होत्या. येत्या 3 ऑक्टोबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. गेल्या 24 वर्षांपासून त्या पेप्सी कंपनीशी निगडीत आहेत. पेप्सिको कंपनीत काम करणे ही माझ्यासाठी आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. मला अभिमान आहे की, गेल्या 12 वर्षांत आम्ही फक्त भागधारकच नव्हे तर सर्वांसाठी चांगली कामगिरी केली असल्याचे इंदिरा नूयी यांनी म्हटले आहे.
- रेमन लॅगार्ट हे मागील 22 वर्षांपासून पेप्सिको कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी कार्पोरेट स्ट्रॅटजी, पब्लिक पॉलिसी आदींमध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर त्यांनी कंपनीच्या यूरोप-आफ्रिका विभागाचे सीईओपदही सांभाळले आहे.
दिनविशेष:
- पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 मध्ये रोजी झाला.
- 7 ऑगस्ट 1941 हा दिवस जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
- मुंबई महानगरपालिकेने 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
- सलग 128 वर्षे प्रकाशित झाल्यावर ‘द वॉशिंग्टन स्टार‘ हे वृत्तपत्र सन 1981 मध्ये बंद पडले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा