29 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
29 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2018)
मानवी अवकाश मोहिमेसाठी तिघांची निवड:
- भारताच्या मानवी अवकाश मोहिमेसाठी तिघांची निवड करण्यात येईल व त्यांना 16 मिनिटात पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवणे शक्य होईल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितले.
- पृथ्वी निकटच्या कक्षेत हे भारतीय अवकाशवीर पाच ते सात दिवस राहू शकतील. नंतर त्यांना घेऊन येणारी कुपी गुजरातच्या किनाऱ्यावर अरबी समुद्रात विशिष्ट ठिकाणी पडेल असे सांगून ते म्हणाले की, इस्रोने 2022 पर्यंत गगनयान मोहीम पार पाडण्याचे निश्चित केले आहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी या योजनेची घोषणा केली आहे.
- भारताच्या मानवी अवकाश मोहिमेचे सादरीकरण इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी केले त्यावेळी अणुऊर्जा व अवकाश खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह उपस्थित होते. सिवन यांनी सांगितले की, एका वेळी तीन भारतीय अवकाशात जाऊ शकतील.
- यात अवकाशवीरांना नेणारे व इतर महत्त्वाची कामे पार पाडणारे असे दोन प्रकारचे मोडय़ूल असतील ते जीएसएलव्ही मार्क तीन अग्निबाणाने सोडण्यात येतील. श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपक झेपावल्यानंतर पृथ्वी जवळची 300-400 किलोमीटरची कक्षा अवघ्या 16 मिनिटात प्राप्त करता येईल.
Must Read (नक्की वाचा):
आता गुगल असिस्टंट मराठीत उपलब्ध:
- तुम्ही मायबोली मराठी भाषेत बोलुनही गुगल असिस्टंटला सूचना देऊ शकतात. Google for India 2018 (गुगल फॉर इंडिया) चे चौद एडिशन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आले होते.
- या कार्यक्रमात गुगलने भविष्यातील योजनांबाबत अनेक घोषणा केल्या. यावेळी गुगलचे सिनीयर इंजिनिअरिंग डायरेक्टर प्रवीर गुप्ता यांनी गुगल असिस्टंटची सेवा आता मराठी भाषेतही सुरू होत असल्याची घोषणा केली.
- गुगल असिस्टंटची सेवा आता हिंदी आणि इंग्रजीबरोबरच प्रादेशिक भाषांमध्येही सुरू होणार आहे. यामध्ये सध्या मराठी भाषेत सेवा उपलब्ध होणार असून लवकरच इतर सात भारतीय भाषांमध्येही ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले.
- त्यामुळे आता गुगल असिस्टंटसोबत तुम्ही मायबोली मराठी भाषेत बोलुनही सूचना देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला एखादे गाणे ऐकायचे असेल तर गुगल व्हॉइस असिस्टंट ओपन करुन तुम्हाला Play My Favourite song असे इंग्रजीत म्हणण्याची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही ‘माझे आवडते गाणे सुरू कर’ एवढेच म्हटले की लगेच गुगल आपले काम करेल.
- याशिवाय, आता गुगल असिस्टंवर तुम्हाला ट्रेनचे लोकेशनही समजू शकणार आहे. Where’s My Train : या अॅपसोबत गुगल असिस्टंटने भागीदारी केली आहे त्यामुळे प्रश्न विचारताच ट्रेनच्या जागेची माहिती तुम्हाला मिळेल.
800 मीटर शर्यतीत मनजीत सिंहला सुवर्णपदक:
- आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी पुन्हा एकदा अॅथलेटिक्सने भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली आहे.
- मनजीत सिंह आणि जिनसन जॉन्सन यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली. मनजीतने 1:46:15 तर जिनसनने 1:46:35 अशी वेळ नोंदवली. सुरुवातीला अतिशय सावधपणे सुरुवात केलेल्या दोन्ही भारतीयांनी मोक्याच्या क्षणी वेग घेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.
- त्याआधी सकाळच्या सत्रात भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने रौप्यपदकाची कमाई केली आहे. अटीतटीच्या लढतीत शूटऑफमध्ये कोरियाच्या संघाने भारतीय संघावर मात करत विजेतेपद पटकावले.
- भारतीय संघाचे हे तिरंदाजीमधले दुसरे रौप्यपदक ठरले आहे. शूटऑफमध्ये दोन्ही संघाचे गुण हे समसमान झाले होते. मात्र कोरियाच्या खेळाडूंनी लक्ष्याच्या जवळ अधिक मारा केल्यामुळे त्यांना या स्पर्धेचे विजेतेपद देण्यात आले. यासोबत कुराश प्रकारात भारताच्या भारताच्या मालप्रभा जाधवला कांस्य तर पिनाकी बलहाराला रौप्यपदक मिळाले.
गुगलकडून केरळसाठी 7 कोटींची मदत:
- केरळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या नैसर्गिक आपत्तीनंतर देशभरातून ‘मदतीचा हात’ मिळत आहे. त्यानंतर आता केरळच्या पुनर्वसनासाठी गुगलकडून 7 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.
- याबाबत गुगल इंडियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी सांगितले, की केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुगलर्स आणि Google.org कडून 7 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
- ‘गुगल क्राइसिस रिस्पॉन्स टीम‘ने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. याशिवाय पुरात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी गुगलने ‘गुगल पर्सनल फाइंडर’ टूलची निर्मिती केली आहे, अशी माहिती आनंदन यांनी दिली.
- दरम्यान, केरळमध्ये आलेल्या पुरामुळे आत्तापर्यंत चारशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर राज्यातील सुमारे 22 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या संगणकाचा लिलाव होणार:
- अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स व स्टीव्ह वोझनिक यांनी 1970च्या दशकात बनविलेल्या दुर्मिळ संगणकाचा 25 सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे.
- स्टीव्ह जॉब्स व स्टीव्ह वोझनिक यांनी तयार केलेला संगणक अद्यापही कार्यरत आहे. लिलावामध्ये या संगणकाला सुमारे 3 लाख डॉलर एवढी किंमत मिळण्याची शक्यता आहे.
- 1970 साली स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझनिक यांनी अॅपल 1 हा डेस्कटॉप संगणक तयार केला होता. या संगणकाचा लिलाव बोस्टनमधील आरआर ऑक्शनकडून आजोजित करण्यात येणार आहे. अॅपल 1 हा संगणक त्या खास 60 संगणकांपैकी आहे, जे आजही अस्तित्वात आहेत. अॅपल 1 संगणकाला अॅपल I किंवा अॅपल-1 या नावानेही ओळखले जाते. अॅपलने 1976 साली तो बाजारात आणला होता.
- लिलावामध्ये मदरबोर्ड, मेन्युअल, पीरियड स्टाइल मॉनिटर आणि कीबोर्ड यांचाही समावेश असणार आहे. 1976 साली संगणक किती शक्तिशाली होता, हे यामाध्यमातून दाखवण्यात येईल. अॅपल 1 एक्स्पर्टस् कोरी कोहेन यांनी 2018 मध्ये या संगणकाला रिस्टोअर केले होते. तसेच त्यांनी त्याला 10 पैकी 8.5 एवढे रेटिंग दिले होते, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
दिनविशेष:
- 29 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन तसेच भारतीय क्रीडा दिन आणि तेलगु भाषा दिन आहे.
- सन 1831 मध्ये मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
- भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला होता.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समिती स्थापन झाली.
- चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना 29 ऑगस्ट 1974 मध्ये केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा