28 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2018)
‘एसबीआय’मध्ये महत्वपूर्ण बदल:
- स्टेट बँक ऑफ इंडियाने सहा संलग्न बँकांचे आपल्यामध्ये विलीनीकरण केल्यानंतर देशभरातील 1300 शाखांची नावे आणि आयएफएससी कोड बदलले आहेत.
- स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयने नावे बदलल्यानंतर नव्या शाखांचे कोड आणि आयएफएससी कोड प्रसिद्ध केले आहेत.
- मागच्यावर्षी 1 एप्रिल 2017 रोजी सहा संलग्न बँका आणि भारतीय महिला बँकेचे एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आले. या विलीनीकरणामुळे एसबीआयचा विस्तार आणि मूल्यांकन दोन्हीमध्ये वाढ झाली आहे.
- देशभरातील एसबीआयच्या 1295 शाखांमध्ये बदल झाले असून त्यासंबंधीची सर्व माहिती एसबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- संपत्तीच्या बाबतीत जगातल्या आघाडीच्या बँकांमध्ये एसबीआय 53व्या स्थानावर आहे. 30 जून 2018 रोजी एसबीआयची एकूण संपत्ती 33.45 लाख कोटी रुपये होती.
- डिपॉझिट, अॅडव्हान्स, ग्राहकसंख्या आणि शाखा याचा विचार करता एसबीआय देशातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयच्या एकूण 22 हजार 428 शाखा आहेत. संलग्न बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणामुळे एसबीआयच्या 1805 शाखा कमी झाल्या.
कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशांना मराठीचे ज्ञान हवे:
- राज्यातील कनिष्ठ न्यायालयांतील संभाव्य न्यायाधीशांना मराठी भाषेचे ज्ञान अवगत असणे बंधनकारक आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
- राज्य न्यायिक सेवा अधिनियम 5(3)ड नुसार कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशपदाच्या उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान अवगत असणे बंधनकारक आहे. त्यांना मराठी भाषेतून बोलणे, वाचन करणे, लिहिणे तसेच मराठी भाषेतून इंग्रजी भाषेत वा इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करता यावे यासाठीच ही अट बंधनकारक करण्यात आली आहे.
- न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने ही अट योग्य ठरवत कनिष्ठ न्यायालयातील संभाव्य न्यायाधीशांना मराठी भाषेचे ज्ञान उत्तम प्रकारे अवगत असायलाच हवे, असा निर्वाळा दिला आहे.
Must Read (नक्की वाचा):
आता ड्रोनव्दारे होणार वस्तूंची वाहतूक:
- ई-कॉमर्स साईटवर एखाद्या वस्तूची किंवा खाद्य पदार्थाची ऑर्डर दिल्यानंतर उद्या ड्रोनव्दारे घरपोच डिलिव्हरी मिळाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण 27 ऑगस्ट रोजी केंद्रीय नागरी हवाई उड्डयाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भातील धोरण जाहीर केले आहे. ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या वस्तूंची डिलिव्हरी ड्रोनव्दारे होऊ शकते.
- येत्या 1 डिसेंबरपासून देशभरात ड्रोनच्या उड्डाणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. पण त्याचसोबत काही अटी सुद्धा घालण्यात आल्या आहेत. ड्रोनचा सुरळीत वापर सुरु राहिल्यास त्या अटींमधून दिलासाही मिळू शकतो असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले.
- वजनानुसार ड्रोनची पाच विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वात छोटो नॅनो ड्रोन ज्याचे वजन 250 ग्रॅम असेल. सर्वात वजनदार 150 किलोचे ड्रोन असेल.
महसुली उत्पन्नाच्या निकषात जिओ देशात दुसर्या स्थानी:
- अवघ्या दोन वर्षांमध्ये ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम‘ कमाईच्या बाबतीत देशातील दुसरी मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे. महसुली उत्पन्नाच्या निकषात जिओने व्होडाफोनला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे. पहिल्या क्रमांकावर एअरटेल कायम असून आता जिओ आणि एअरटेलमधील अंतर बरेच कमी झाले आहे.
- कमी पैशांमध्ये इंटरनेट सेवा आणि गावागावात पोहोचलेलं नेटवर्क यामुळे जिओच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे, परिणामी कंपनीच्या उत्पन्नामध्ये वाढ पाहायला मिळत आहे.
- 4जी सेवा सादर केल्यानंतर गेल्या दोन वर्षांत महसुली उत्पन्नाच्या बाजारपेठेत ‘जिओ’च्या बाजारहिश्श्यात मोठी वाढ झाली आहे. जून 2018 च्या तिमाहीत कंपनीचा बाजारहिस्सा 22.4 टक्क्यांवर पोहोचला. ट्रायच्या आकडेवारीनुसार मार्च 2018च्या तिमाहीच्या तुलनेत जूनअखेर 2.53 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
- महसुली उत्पन्नाच्या निकषाच्या जून 2018 च्या तिमाहीनुसार एअरटेल 31.7 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे, 22.4 टक्क्यांसह जिओ दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर व्होडाफोन 19.3 टक्के आणि आयडिया 15.4 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जिओ लवकरच एअरटेललाही मागे टाकेल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
अहमदाबाद सहकारी बँकेचा राहुल गांधींवर अब्रुनुकसानीचा दावा:
- वर्ष 2016 मध्ये नोटाबंदी दरम्यान पाच दिवसांत 750 कोटी रूपयांचे जुने चलन बदलून घेतल्याचा बँकेवर आरोप केल्याप्रकरणी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने (एडीसीबी) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि रणदिप सुरजेवाला यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे या बँकेचे संचालक आहेत. नोटाबंदीच्या काळात कोट्यवधी लोकांचे जीवन उद्धवस्त झाले. पण तुम्ही इतक्या मोठ्याप्रमाणात जुन्या नोटा बदलून घेतल्या याचे कौतुक वाटत असल्याचा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता. तर सुरजेवाला यांनीही पत्रकार परिषद घेऊन बँकेवर आरोप केले होते.
- या दोन्ही नेत्यांनी बँकेविरोधात खोटे आरोप केल्याचे या बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी 17 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
‘किम्भो अॅप’चे लाँचिंग पुन्हा लांबणीवर:
- योग गुरु बाबा रामदेव यांनी आपल्या पतंजली ब्रॅण्डच्या प्रसिद्धीसाठी तयार केलेल्या ‘किम्भो’ या चॅट अॅपचे लॉन्चिंग पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे.
- किम्भो अॅप 27 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात येणार होते. मात्र, या अॅपमधील सुरक्षा विषयक फिचर्सचे निराकरण केल्यानंतर या अॅपचे लवकरच लॉन्चिंग करण्यात येईल असे पतंजलीकडून सांगण्यात आले आहे.
- पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, किम्भो अॅप अधिक सुरक्षित आणि वापरण्यात सोपे करण्यासाठी त्यात आवश्यक बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही या अॅपच्या लॉन्चची नवी तारीख जाहीर करू.
- ‘किम्भो अॅप’ हे स्वदेशी अॅप असून व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून ते तयार करण्यात आले आहे. किम्भो अॅप पहिल्यांदा 30 मे रोजी लॉन्च करण्यात आले होते. मात्र, 24 तासांच्या आतच ते मागे घेण्यात आले.
- बोलो चॅट अॅपचे निर्माते अदिती कमाल यांच्या अॅपचे रिब्राडिंग करु ते पतंजलीसाठी किम्भो अॅप म्हणून आणण्यात आले आहे. कमाल आपली बोलो मेसेंजर सेवा वेगळी लॉन्च करणार आहेत.
- किम्भो या नावाबाबत सांगताना पतंजलीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, किम्भो हा संस्कृत शब्द आहे. किम्भो अॅपमध्ये AES इन्क्रिप्टेड तसेच घोस्ट चॅटिंग आणि ऑटो डिलीट सुविधा असणार आहेत.
दिनविशेष:
- सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.
- भारतीय पदार्थवैज्ञानिक एम.जी.के. मेनन यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.
- टोयोटा मोटर्स ही सन 1937 मध्ये स्वतंत्र कंपनी बनली.
- ‘पोकेमोन’चे निर्माते सातोशी ताजीरी यांचा जन्म 28 ऑगस्ट 1965 मध्ये झाला.
- 28 ऑगस्ट 1969 हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा