26 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं निधन
अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं निधन

26 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 नोव्हेंबर 2020)

अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं निधन :

  • अर्जेंटिनाचे माजी प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं वयाच्या 60 व्या वर्षी निधन झालं आहे.
  • 1986 साली आपल्या बहारदार खेळाने अर्जेंटिनाला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅरेडोना यांचं नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झालं होतं. मॅरेडोना यांच्या निधनामुळे समस्त क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
  • तसेच 2008 साली अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दमदार पुनरागमन केलं. प्रशिक्षणाचा फारसा अनुभव नसतानाही मॅरेडोना यांनी अर्जेंटिनाच्या संघाला प्रशिक्षण देताना आपला ठसा उमटवला होता. अर्जेंटिनामधील आबालवृद्धांमध्ये मॅरेडोना यांची क्रेझ होती.
  • 1986 च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध सामन्यात झळकावलेल्या दोन गोलमुळे मॅरेडोना चर्चेत आले होते. अखेरीस फुटबॉलच्या मैदानात घोंघावणारं वादळ शांत झालं आहे.

स्कॉटलंडमध्ये ‘सॅनिटरी पॅड्स’ मोफत :

  • महिलांना ‘सॅनिटरी पॅड्स’ मोफत उपलब्ध करून देणारा स्कॉटलंड हा पहिला देश ठरला आहे. स्कॉटिश संसदेने याबाबतचा कायदा मंगळवारी एकमताने मंजूर केला.
  • मासिक पाळी आरोग्य उत्पादने (मोफत उपलब्धता) कायदा मंजूर करण्यात आला असून, त्यानुसार आता स्थानिक अधिकाऱ्यांना महिलांची मासिक पाळी आरोग्य उत्पादने मोफत उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक राहणार आहे.
  • तसेच सामाजिक केंद्रे, युवा गट, औषध दुकाने या ठिकाणी ही उत्पादने मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
  • तर त्यासाठी 2022 पर्यंत 8.7 दशलक्ष पौंडाचा खर्च येणार आहे. ही उत्पादने शाळा, महाविद्यालये व विद्यापीठात उपलब्ध केली जाणार आहेत, असे या विधेयकात प्रमुख भूमिका पार पाडणाऱ्या मोनिका लेनॉन यांनी सांगितले.

लक्ष्मी विलास बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण :

  • लक्ष्मी विलास बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • केंद्राच्या या निर्णयामुळे लक्ष्मी विलास बँकेच्या सुमारे 20 लाख खातेदारांना आणि चार हजार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.
  • लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले आहेत. 16 डिसेंबरपर्यंत म्हणजेच पुढील 30 दिवस हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
  • तर या कारवाईमुळे लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदरांना महिनाभरासाठी फक्त 25 हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. 17 नोव्हेंबरपासून हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
  • आता या बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने या संदर्भातला प्रस्ताव दिला होता जो मंजूर करण्यात आला आहे.

‘आयसीसी’चे नवे कार्याध्यक्ष ग्रेग बार्कले :

  • न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख ग्रेग बार्कले यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (आयसीसी) नवे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
  • बार्कले यांनी कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या सिंगापूरच्या इम्रान ख्वाजा यांना 11-5 या फरकाने नमवले.
  • भारताचे सध्याचे ‘आयसीसी’चे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांचे उत्तराधिकारी म्हणून बार्कले काम पाहतील.
  • 16 क्रिकेट मंडळांच्या संचालकांनी या निवडणुकीत मतदान केले. त्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी कसोटी खेळणाऱ्या 12 देशांच्या क्रिकेट मंडळांच्या अध्यक्षांचा समावेश होता. तसेच तीन संलग्न देश आणि एक स्वतंत्र महिला संचालक (पेप्सिकोच्या इंद्रा नूयी) यांचा मतदान करणाऱ्यांमध्ये सहभाग होता.

भारतीय तिरंदाजी संघटनेला अखेर आठ वर्षांनंतर मान्यता :

  • भारतीय तिरंदाजी संघटनेला (एएआय) अखेर आठ वर्षांनंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. याबरोबरच तिरंदाजी संघटनेचा समावेश राष्ट्रीय क्रीडा महासंघामध्ये (एनएसएफ) झाला आहे.
  • ‘एएआय’च्या नवीन पदाधिकाऱ्यांची या वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच 18 जानेवारीला निवडणूक झाली होती. मात्र क्रीडा मंत्रालयाची संघटनेला मान्यता नसल्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पदांवर शिक्कामोर्तब करण्यात आले नव्हते. मात्र आता अधिकृत मान्यता मिळाल्याने अर्जुन मुंडा अध्यक्षपदी, तसेच प्रमोद चांदूरकर (महासचिव) आणि राजेंद्र सिंग तोमार (खजिनदार) यांची निवड ग्राह्य़ धरण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय क्रीडा धोरणाप्रमाणे (2011) उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव यांच्या नेमणुका झाल्या नसल्याचा ठपका ठेवत क्रीडा मंत्रालयाने त्यांना मान्यता दिलेली नाही. त्या नेमणुकांसाठी नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश ‘एएआय’ला देण्यात आले आहेत.
  • केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे नियमांचे पालन करण्यात आले नाही तर पुन्हा ही मान्यता काढून घेण्यात येईल, असेही क्रीडा मंत्रालयाने चार पानांच्या पत्रात स्पष्ट केले आहे.

दिनविशेष:

  • 26 नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन‘ तसेच ‘भारतीय संविधान दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1890 मध्ये झाला.
  • कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1926 मध्ये झाला.
  • 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारताची घटना मंजूर झाली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
  • सन 1997 मध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
  • सन 2008 मध्ये हा दिवस महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.