24 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
24 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2018)
एम नागेश्वर राव सीबीआयचे नवे प्रभारी संचालक:
- सीबीआयमधील उच्चपदस्थांमध्ये संघर्ष सुरु असून अखेर केंद्र सरकारने मध्यस्थी करत दखल घेतली आहे. केंद्र सरकारने कडक पाऊलं उचलत सीबीआय प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
- आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांच्याकडे सीबीआय प्रभारी संचालकपद सोपवण्यात आलं आहे. 1986 च्या बॅचमधील ओडिशा कॅडरचे आयपीएस अधिकारी राव तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्याचे रहिवासी आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या विशेष पथकाने आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्या कार्यालयात छापेमारी केली असून 10 आणि 11 मजला सील केला आहे.
- केंद्र सरकारने यासंबंधी आदेश जारी करत तात्काळ स्वरुपात आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांची नियुक्ती केली आहे. महत्त्वाचं म्हणजे विशेष संचालक अस्थाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफआयआरमध्ये मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याडून तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
मेघ ठक्कर ठरला ‘आयर्नमॅन’:
- पुण्यातील फग्र्युसन कॉलेजचा फिजिओथेरपीचा विद्यार्थी मेघ ठक्कर याने अमेरिकेतील केंटुकीत झालेल्या ‘आयर्नमॅन चॅलेंज स्पर्धे’चे अत्यंत बिकट आव्हान पार करून दाखवले.
- विशेष म्हणजे मेघने त्याच्या वयाच्या 18व्या वर्षी हे आव्हान पार करताना भारतातील आणि बहुधा जगातील सर्वात कमी वयाचा आयर्नमॅन हा किताबदेखील पटकावला आहे.
- ‘आयर्नमॅन’ बनण्याच्या खडतर आव्हानासाठी किमान वयाची पात्रताच 18 वर्षांची असून त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याने हे लक्ष्य पार करीत अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
- ‘फुल आयर्नमॅन’साठी 16 तासांमध्ये 3 किलोमीटर जलतरण, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन धावण्याचे दिव्य पार करणे बंधनकारक असते. मेघने हे आव्हान 13 तास 53 मिनिटांतच पूर्ण करीत त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली.
जायकवाडीत 8.99 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश:
- मराठवाडय़ातील आमदार जायकवाडीच्या पाणीप्रश्नी आक्रमक होत असल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून 8.99 अब्ज घनफूट पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले.
- जायकवाडी धरणामधील 172 द.ल.घ.मी. तूट लक्षात घेऊन पाणी सोडण्यासंदर्भात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानंतर पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले.
- मराठवाडय़ातील सर्वपक्षीय आमदारांनी जायकवाडीसह मराठवाडय़ातील सिंचनप्रश्नी आक्रमक होण्याचे ठरविले होते. या पाश्र्वभूमीवर मुंबईमध्येही जलसंपदा विभागात हालचाली सुरू होत्या.
- मुळा, गंगापूर, दारणा, पालखेड या चार धरणसमूहातून पाणी सोडताना विद्युत प्रवाह बंद ठेवण्यात येणार असून पाण्याचा व्यय अधिक होऊ नये म्हणून एका वेळी शक्य तेवढा अधिक विसर्ग करण्याच्या सूचना नाशिक व नगर जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
द. आशियाई शरिरसौष्टव संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत आपटे:
- देशातील सर्वात बलाढ्य राज्य संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेची ताकद आता आणखी वाढली आहे.
- राज्य संघटनेच्या नेतृत्वाखाली अनेका राष्ट्रीय स्तरीय स्पर्धांचे आयोजन केल्यानंतर मार्च महिन्यात भारत श्रीचे अभूतपूर्व आयोजन आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या आशिया श्री या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांच्यावर आता दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा पॉल चुआ यांनी प्रशांत आपटे यांच्या निवडीची नुकतीच घोषणा करून महाराष्ट्र शरीरसौष्ठवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
- राज्य संघटनेच्या भरीव आणि धोरणात्मक कार्यामुळे महाराष्ट्र हे शरीरसौष्ठवातील देशातील सर्वात बलशाली राज्य आधीच बनले आहे. भारतातील सर्वाधिक शरीरसौष्ठवपटू हे राज्यातूनच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत.
‘एच-1बी’साठी प्रमाणपत्र मिळणाऱ्या कंपन्यांत टीसीएस:
- 2018 या वित्त वर्षात एच-1बी व्हिसासाठी विदेशी कामगार प्रमाणपत्र (फॉरेन लेबर सर्टिफिकेशन) मिळविणा-या जगातील सर्वोच्च 10 कंपन्यांत भारतातील एकमेव टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीचा समावेश झाला आहे. टीसीएसला 20 हजारांपेक्षा जास्त विदेशी कामगार प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
- एच-1बी व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी अमेरिकेच्या श्रम मंत्रालयाला एक अर्ज करून विदेशी कामगार प्रमाणपत्र मिळविणे कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. जेवढ्या कामगारांसाठी प्रमाणपत्रे मिळाली असतील, तेवढ्याच कामगारांच्या व्हिसासाठी कंपन्या अर्ज करू शकतात.
- अमेरिकी कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, लंडनस्थित अर्न्स्ट अँड यंग ही कंपनी सर्वाधिक विदेशी कामगार प्रमाणपत्रे मिळवून पहिल्या स्थानी आली आहे. कंपनीला विशेष व्यवसायासाठी 1,51,164 विदेशी कामगार प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
- अमेरिकी कामगार मंत्रालयाने वितरित केलेल्या एकूण प्रमाणपत्रांपैकी 12.4 टक्के प्रमाणपत्रे अर्न्स्ट अँड यंगला मिळाली आहेत. 69,869 प्रमाणपत्रांसह डेलॉईट कन्सल्टिंग दुसर्या स्थानी आहे.
- भारतीय-अमेरिकी कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी तिसर्या स्थानी असून, कंपनीला 47,732 प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
- कॉग्निझंटनंतर एचसीएल अमेरिका (4,820), के फोर्स आयएनसी (32,996), अॅपल (26,833) यांचा क्रमांक लागला.
दिनविशेष:
- 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन, जागतिक विकास माहिती दिन तसेच जागतिक पोलियो दिन आहे.
- सन 1605 मध्ये मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.
- विल्यम लसेल यांनी सन 1851 मध्ये उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
- सन 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
- भारतामध्ये प्रथमच भुयारी रेल्वे सन 1984 मध्ये कोलकाता येथे सुरू झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा