22 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
22 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 सप्टेंबर 2022)
रतन टाटा ‘पीएम केअर्स’च्या विश्वस्तपदी :
- आपत्कालीन पंतप्रधान नागरिक मदत निधीच्या (पीएम केअर्स फंड) विश्वस्तपदी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस, लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवनियुक्त विश्वस्त मंडळासह बैठक घेतली.
- या बैठकीत भारताचे माजी नियंत्रक व महालेखापाल राजीव महर्षी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती आणि इंडी कॉर्प आणि पिरामल फाउंडेशनचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद शहा यांना ‘पीएम केअर्स फंड’च्या सल्लागार मंडळात नियुक्त करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):
राज्यात 18 नवी संवर्धन राखीव क्षेत्रे :
- राज्यात 18 नवी आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे घोषीत करण्याचा निर्णय बुधवारी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
- त्यामुळे राज्यातील संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या आता 52 होणार असून सुमारे 13 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होणार आहे.
- पुणे आणि रायगड जिल्ह्यातील वेल्हे-मुळशी आणि लोणावळा, पुणे-ठाणे जिल्ह्यातील नाणेघाट, पुणे जिल्हा भोरगिरीगड, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, सुरगाणा, ताहाराबाद, नंदूरबार जिल्ह्यातील कारेघाट, चिंचपाडा, रायगड जिल्ह्यातील घेरा माणिकगड आणि अलिबाग, ठाणे पुणे जिल्ह्यातील राजमाची, ठाणे जिल्ह्यातील गुमतारा, पालघर जिल्ह्यातील जव्हार, धामणी, अशेरीगड, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, चंद्रपूर जिल्ह्यातील एकारा ही वनसंवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- तर प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रंगी गड, ठाणे जिल्ह्यातील मोरोशीचा भैरवगड, औरंगाबाद जिल्ह्यातील धारेश्वर, त्रिकुटेश्वर, कन्नड, पेडकागड तर नांदेड जिल्ह्यातील किनवट चा समावेश आहे.
डेबिट, क्रेडिट कार्डाद्वारे दस्त हाताळणी शुल्क भरणे शक्य :
- दस्त नोंदणी करताना आकारण्यात येणारे दस्त हाताळणी शुल्क केवळ ‘एसबीआय ई-पे’ या प्रणालीद्वारे भरता येत होते.
- आता एसबीआयसोबतच सर्व प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे हे शुल्क भरता येणार आहे.
- ही सुविधा राज्यभरात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली.
- दस्त नोंदणी करताना किती पाने आहेत, त्यांचा हिशेब करून रोख पैसे द्यावे लागायचे.
- त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त हाताळणी शुल्क भरण्यासाठी आता सर्व प्रकारची डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरण्याची सुविधा सुरू केली आहे.
एमपीएससी वर्ग तीनमधील लिपिक पदांची भरती राबवण्याचा निर्णय :
- राज्य शासनाने वर्ग तीनमधील लिपिक पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवण्याचा निर्णय घेतला.
- बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, हा निर्णय राज्यातील लाखो उमेदवारांसाठी आनंददायी आहे.
- एमपीएससीमार्फत राज्य शासनाच्या विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जाते.
राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये मल्टी-लॉजिस्टिक पार्क :
- राज्यातील उद्योगांना व रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासाठी जालन्याप्रमाणे नाशिक, जळगाव, अकोला, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, सांगली, भिवंडी, पुणे आदी जिल्ह्यांमध्येही मल्टी-लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
- दोन-तीन जिल्ह्यांसाठी मिळून एक मल्टी-लॉजिस्टिक पार्क असेल.
- त्यामुळे उत्पादनांच्या निर्यातीसाठी उद्योजकांना मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही.
- मल्टी-लॉजिस्टिक पार्कसाठी फक्त राज्याला जमीन उपलब्ध करून द्यावी लागणार असून पार्क विकसित करण्याचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
- मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही प्रदेशांच्या विकासासाठी जालन्यामध्ये उभारल्या जाणाऱ्या मल्टी-लॉजिस्टिक पार्कसाठी केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये बुधवारी महत्त्वाचा करार झाला.
मोहम्मद रिझवानने आपल्या टी20 मधील 2000 धावा पूर्ण :
- एका बाजूला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 सामना सुरु असताना तिकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्ध सामना झाला.
- पाकिस्तानचा यष्टीरक्षक सलामीवीर मोहम्मद रिझवानने एक मैलाचा टप्पा गाठला आहे.
- हा टप्पा पार करताना त्याने भारतीचा रन मशिन विराट कोहलीला मागे टाकले.
- याआधी त्याचा साथीदार कर्णधार बाबर आझमने देखील विराटला मागे टाकले होते.
- पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने आपल्या टी20 मधील 2000 धावा पूर्ण केल्या.
- तर टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 2000 धावा करणाऱ्यांच्या यादीत आता तो बाबर आझमसोबत पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
दिनविशेष:
- सन 1660 मध्ये शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
- सन 1888 मध्ये द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- सन 1995 मध्ये भारतीय नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
- सुनील गावसकर यांना सन 1998 मध्ये महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर झाला.
- सन 2003 मध्ये नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.