22 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
22 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 फेब्रुवारी 2019)
UN सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा निषेध:
- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचे दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) हा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक आणि भ्याड असल्याचे सांगत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 देशांचा समावेश असून यामध्येही चीनदेखील आहे. सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करत अशा हल्ल्यांसाठी जबाबदार दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.
- महत्त्वाचं म्हणजे, संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये मसूद अझहर म्होरक्या असणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनदेखील समाविष्ट आहे.
- चीनने नेहमीच मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला विरोध केला आहे. सुरक्षा परिषदेने यावेळी दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भारताला शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले आहे.
Must Read (नक्की वाचा):
आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक:
- भारतात प्रथमच घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ह्रदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवडमधील कोया फिटनेस अकादमीच्या मुलींनी सुवर्ण आणि कांस्यपदकाची कमाई केली आहे.
- स्वरा महाबळेश्वरकरने 10 वर्षांखालील वयोगटात एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावले. तसेच 12 वर्षांखालील वयोगटात रूही कौलगीकरने कांस्यपदक पटकावले. काशवी ठाकोर, अवनी नहार, यावी मेहता, आदिश्री कुलकर्णी, धानवी चोरडिया, सई दानी, शालवी शहा, रिदम मुथ्था, केया खैरनार व प्रेरणा धर्मानी आदी खेळाडूंनी नैपुण्य दाखवले.
- सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व परीक्षक आदिश्री राजपूत व संस्थेचे सहायक प्रशिक्षक रश्मी पर्णीकर यांनी मार्गदर्शन केले. तर या स्पर्धेत भारतासह एकूण 6 देशांचा सहभाग होता.
डी.के. जैन ‘बीसीसीआय’चे नवे लवाद अधिकारी:
- सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) लवाद अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायालयाने ‘बीसीसीआय’वर नेमलेले ते पहिले लवाद अधिकारी आहेत.
- न्यायमूर्ती एस.ए. बोबडे आणि ए.एम. सप्रे यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले आहे की, ‘दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.’
- खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयातील सहा माजी न्यायमूर्तीची नावे ठेवण्यात आली होती. यापैकी जैन यांना प्राधान्य देण्यात आले. खंडपीठाने जैन यांच्या नावाविषयी विचारले असता सर्व वकिलांनी अनुकूलता दर्शवली.
- राज्य क्रिकेट संघटनांमधील खेळाडूंचे प्रश्न आणि आर्थिक समस्या सोडवण्याची जबाबदारी लवाद अधिकाऱ्यांवर असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने आपल्या 9 ऑगस्ट 2018च्या निकालात लोकपालांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंडय़ा व लोकेश राहुल वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना त्यांच्या निलंबनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी लोकपालांची गरज तीव्रतेने भासली होती.
भारत सरकार आता पाकिस्तानचे पाणी रोखणार:
- प्राधान्य देशाचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानचे पाणीही तोडण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. सिंधू, चिनाब आणि झेलम या भारतातून पाकिस्तानकडे वाहात जाणाऱ्या नद्यांचा प्रवाह यमुनेकडे वळविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
- काश्मिरात पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर ही पावले उचलली जात आहेत, अशी माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
- उत्तर प्रदेशात बागपत येथे एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले की या तिन्ही नद्यांवर धरण प्रकल्प बांधून हे पाणी अडवून यमुनेकडे वळविले जाईल. त्यामुळे यमुनेच्या पाण्यातही मोठय़ा प्रमाणात वाढ होईल.
- अर्थात अधिकाऱ्यांच्या मते असा प्रवाह अडवण्यासाठी किमान 100 मीटर उंचीची धरणे बांधणे आवश्यक असून त्यासाठी किमान सहा वर्षांचा कालावधी लागेल. म्हणजेच पाकिस्तानची प्रत्यक्ष पाणी-कोंडी होण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.
‘ईपीएफओ’कडून पीएफच्या व्याजदरात वाढ:
- देशातील कोट्यवधी लोकांना फायदा मिळवून देणारे पाऊल उचलत कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफवर (प्रॉव्हिडंट फंड) व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
- नव्या निर्णयानुसार 2018-19 या वर्षासाठी सध्याचा 8.55 टक्के असलेला व्याजदर वाढवून तो 8.65 टक्के इतका करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केल्यानांतर याचा देशातील सहा कोटी सदस्यांना फायदा मिळणार आहे. आर्थिक वर्ष 2016 नंतर प्रथमच वाढ करण्यात आली आहे.
- व्याजदरात वृद्धी करण्याबाबत कामगारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत व्याजदरात 0.10 टक्के वाढ करण्यावर एकमत झाले होते. ईपीएफओच्या या नव्या निर्णयांमुळे सुमारे 6 कोटी खातेधारकांना फायदा मिळणार आहे.
- नियमानुसार ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज‘ (सीबीटी) ही ईपीएफओची निर्णय घेणारी प्रमुख समिती व्याजदरात होणाऱ्या बदलाबाबतचा निर्णय घेत असते.
- ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज‘च्या सदस्यांनी व्याजदरात होणाऱ्या बदलाबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तो प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवला जातो. अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर हे मंजूर दरानुसार व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाते.
दिनविशेष:
- महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1836 मध्ये झाला.
- बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला होता.
- सन 1958 मध्ये इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.
- श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सन 1978 मध्ये भारताचे 16वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा