17 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
17 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 एप्रिल 2019)
यंदाचे पुलित्झर पुरस्कार जाहीर:
- अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत शोधपत्रकारितेवर आधारित बातम्या देणाऱ्या दी न्यूयॉर्क टाइम्स व दी वॉल स्ट्रीट जर्नल यांनी पुलित्झर पुरस्कार पटकावले आहेत.
- न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ट्रम्प कुटुंबीयांनी त्यांच्या संपत्तीबाबत केलेले दावे खोटे असल्याचे दी न्यूयॉर्क टाइम्सने दाखवून दिले होते. त्यात ट्रम्प यांच्या उद्योगांचे विस्तारलेले साम्राज्य व त्यांनी केलेली करचुकवेगिरी यांचा पर्दाफाश करण्यात आला होता.
- ट्रम्प यांनी 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी दोन महिलांना पैसे देऊन त्यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत वाच्यता न करण्यास सांगितले होते. त्याबाबतच्या बातमीसाठी दी वॉल स्ट्रीट जर्नलला राष्ट्रीय वार्ताकनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- दी साउथ फ्लोरिडा सन सेटिंनलला लोकसेवा प्रवर्गात हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी मारजोरी स्टोनमल डग्लस हायस्कूलमधील फेब्रुवारी 2018 मधील हत्याकांड व त्यात शाळा व कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे अपयश यावर प्रकाश टाकला होता.
Must Read (नक्की वाचा):
उद्या राज्यातील 10 ठिकाणी मतदान:
- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांत (हिंगोली, अमरावती, बुलढाणा, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नांदेड, अकोला आणि परभणी) निवडणूक होत असून, अटीतटीच्या या लढतींच्या प्रचारतोफा 16 एप्रिल रोजी थंडावल्या.
- 1 कोटी 54 लाख मतदार गुरुवारी (18 एप्रिल) मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. या टप्प्यात सहा विद्यमान खासदार पुन्हा आपले भाग्य अजमावित आहेत.
- एकूण 167 उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी एक-दोन अपवाद वगळता इतर ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत. महिला मतदारांची संख्या जवळपास पुरुषांच्या बरोबरीने असल्याने त्यांचे मत महत्त्वपूर्ण असेल.
टिक-टॉक अॅपवर केंद्र सरकारची बंदी:
- सोशल मीडियात प्रचंड क्रेझ असणाऱ्या टिक-टॉक अॅपवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
- केंद्र सरकारने गुगलला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अॅप काढण्यास सांगितले आहे. या आदेशानंतर लोकांना टिकटॉक अॅप डाउनलोड करता येणार नाही. मात्र ज्या लोकांकडे आधीपासून हा अॅप आहे, त्यांना तो पहिल्यासारखा वापरता येईल.
- सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने हा आदेश काढला. टिकटॉक अॅप तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
- मात्र काही जण या अॅपचा गैरवापर करून, अश्लील चित्रफितींना प्रोत्साहन देतात, असा आरोप करत त्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयाने याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने या अॅपवर बंदीचा निर्णय दिला. त्यानंतर टिकटॉकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
लता मंगेशकर यांची शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत:
- पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ‘भारत के वीर’च्या माध्यमातून ही मदत करणार असल्याची माहिती मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा नातू आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.
- फेब्रुवारी महिन्यात तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर आता लता मंगेशकर यांनीदेखील 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
- विशेष म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त मंगेशकर कुटुंबीय आणि त्यांचा मित्रपरिवारही 11 लाख रुपयांची मदत करणार आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या मास्टर दीनानाथ पुरस्कारांच्या घोषणेवेळी ही मदत जाहीर करण्यात आली. यावेळी लता मंगेशकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर उपस्थित होते.
हजार वर्षांपूर्वीचा वीरगळ लेख प्रकाशात:
- गेल्या आठवडय़ात विटय़ाजवळील भाळवणी येथे चालुक्य राजवटीत जैन मंदिराला दान दिल्याचा शिलालेख उजेडात आल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे याच कालखंडातील धारातीर्थी पडलेल्या वीर योद्धय़ाच्या स्मरणार्थ कोरण्यात आलेला वीरगळ लेख प्रकाशात आला आहे.
- मिरज इतिहास संशोधन मंडळाने हे ऐतिहासिक संदर्भ शोधल्यामुळे सांगली परिसर सुमारे साडेनऊशे वर्षांपूर्वी चालुक्य राजवटीत महत्त्वाचा भाग होता हे स्पष्ट होत आहे.
- चालुक्य राजा दुसरा सोमेश्वर उर्फ भ्वनेकमल्ल (इ.स. 1068 ते 1076) याच्या कारकिर्दीत झालेल्या एका लढाईत आगळगावातील एका योद्धय़ाला वीरमरण आले होते. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरगळ तयार करून त्याच्यावर हा लेख कोरून ठेवण्यात आला आहे.
- जिल्ह्यतील हा पहिला लेखयुक्त वीरगळ असून, महाराष्ट्रामध्ये आढळलेल्या वीरगळ लेखात तो सर्वात जुना असल्याचेही समोर आले आहे.
दिनविशेष:
- 17 एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिमोफिलिया दिन‘ म्हणून पाळला जातो.
- हिंदी कवी तसेच थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य ‘संत सूरदास’ यांचा जन्म 17 एप्रिल 1478 मध्ये झाला.
- बेसबॉल चे जनक ‘अलेक्झांडर कार्टराईट’ यांचा जन्म 17 एप्रिल 1820 रोजी झाला होता.
- बॅ. मुकुंदराव जयकर सन 1950 मध्ये पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले होते.
- सन 1952 मध्ये पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
- सन 1971 द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा