Current Affairs of 3 October 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (3 ऑक्टोंबर 2015)
मोबाईल फोन्समध्ये पॅनिक बटणाची सुविधा आणण्याचा सरकारचा विचार :
- महिला सुरक्षेसाठी मोबाईल फोन्समध्ये पॅनिक बटणाची सुविधा आणण्याचा सरकारचा विचार आहे.
- यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांना विचारणा करण्यात आली असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी आज दिली.
- यामध्ये विशेष नेकलेस, ब्रेसलेट्स आणि अंगठ्या आदींसह अनेक कल्पक आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा समावेश होता.
- सध्या असलेल्या एसओएस मेसेज सिस्टिमद्वारे या माध्यमातून मुलगी असुरक्षित असताना संदेश पोचवून तिची मदत करता येऊ शकते हे आपल्याला ठाऊक आहेच.
- नेकलेस किंवा अन्य गोष्टी नेहमीच जवळ बाळगणे सोईस्कर नसल्याने अखेर “स्मार्ट” फोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- फोनमध्ये देण्यात येणारे हे पॅनिक बटण दाबताच सिस्टिममध्ये फीड असलेल्या काही मोजक्या लोकांना तत्काळ त्या मुलीच्या ठिकाणाविषयीची माहिती मिळेल आणि तिला मदत करणे शक्य होईल.
- याबाबत सर्व मोबाईल कंपन्यांशी चर्चा सुरू असून, लवकरच फोनमध्ये हे बटण दिसेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):
भारत आणि चीनदरम्यान सीमा अधिकारांची बैठक :
- भारत आणि चीनदरम्यान सीमा अधिकारांची बैठक तवाम्ग जिल्ह्यातील बुमला येथे आयोजित करण्यात आली आहे.
- चीनच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित या बैठकीला दोन्ही देशांची शिष्टमंडळे उपस्थित राहणार असून, या वेळी विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे.
मंगळावर अगदी वाहते पाणी :
- मंगळ या पृथ्वीच्या शेजाऱ्याकडे मायंदाळ पाणी असल्याचे सुखद वृत्त ‘नासा’ या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने नुकतेच दिले.
- मंगळावर बर्फाच्या टोप्या घातलेली उत्तुंग शिखरे आहेत, पण तिथे पाणी असल्याचा ठाम दावा आजवर कधी झाला नव्हता.
- पण किमान चार भक्कम वैश्विक पुरावे हाती ठेवून नासाच्या संशोधकांनी निर्वाळा दिला आहे की मंगळावर पाणी आहे, अगदी वाहते पाणी आहे.
- तिथल्या लाल पृष्ठभागावर ज्या ठळक निळ्या रेघोट्या दिसताहेत, त्या प्रत्यक्षात नद्या आहेत.
- मंगळावरच्या जलसाठ्यांचे हे गुपित फोडले ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ या ‘नासा’ने 2011 च्या नोव्हेंबरात पाठवलेल्या अंतराळयानाने.
- खरे तर हे यान म्हणजे संपूर्णपणे स्वयंचलित आणि सुसज्ज असे वाहनच आहे.
- सध्या ते तिथल्या पृष्ठभूमीवर हिंडून दगड, मातीचे नमुने गोळा करते आहे.
- जमेल तितके त्यांचे विश्लेषण करून त्याचा तपशीलही पाठवते आहे.
- रोव्हरने आजवर मंगळभूमीची हजारो छायाचित्रे पाठवली आहेत.
- 1967 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एक बाह्य अंतराळविषयक करार केला आहे.
- ‘आऊटर स्पेस ट्रिटी’ या नावाने तो ओळखला जातो.
- या करारानुसार भविष्यात अशी शक्यता उद्भवलीच, तर पृथ्वीवरील जीवजंतूंची वैश्विक निर्यात संपूर्णपणे टाळण्यासाठी सर्व संबंधित राष्ट्रे वचनबद्ध असतील.
- हा करार जवळपास साठ वर्षांपूर्वीचा असला तरी आम्ही त्यास बांधील आहोत, असे ‘नासा’च्या मंगळ संशोधन प्रकल्पाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.
फुटबॉल जागतिक क्रमवारीमध्ये अर्जेंटिना अग्रस्थानी :
- फुटबॉल क्षेत्रामधील शिखर संस्था असलेल्या फिफाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक क्रमवारीमध्ये अर्जेंटिना अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- जर्मनीने बेल्जियमला मागे टाकत या क्रमवारीमध्ये द्वितीय स्थान मिळविले आहे.
- जर्मनीचे एकूण 1,401 गुण आहेत.
- यामुळे आता अर्जेंटिना व जर्मनीमध्ये अवघ्या 18 गुणांचा फरक आहे.
- या क्रमवारीमध्ये पोर्तुगाल (क्रमांक चार), स्पेन (क्रमांक सहा), कोलंबिया (क्रमांक आठ) या देशांचाही समावेश असून ब्राझील सातव्या स्थानावर फेकला गेला आहे.
- या क्रमवारीमध्ये इराण (क्रमांक 39) हा आशियामधील सर्वोच्च क्रमांक मिळविणारा देश ठरला आहे.
- भारतीय फुटबॉल संघाची ‘फिफा’ क्रमवारी 12 स्थानाने घसरली असून या क्रमवारीत भारत 167 व्या स्थानावर आला आहे.
क्रिकेटपटू अजय जडेजा याचा दिल्लीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा :
- माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी दिल्लीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने दिल्ली संघासमोर अडचणी वाढल्या आहेत.
- तसेच डीडीसीएने मात्र याबाबत जडेजा यांच्याकडून कोणतेही अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे सांगितले.
- जडेजा यांनी गतमहिन्यामध्येच दिल्लीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
लखनौतील कुटुंबाकडे 300 वर्षांपूर्वी उर्दूत लिहिलेले महाभारत :
- जुन्या लखनौतील करबाला कॉलनीतील मंजुल या कुटुंबाकडे गेल्या पाच पिढ्यांपासून चालत आलेला हा अमूल्य ठेवा म्हणजे सुमारे 300 वर्षांपूर्वी उर्दूत लिहिलेले महाभारत सापडले आहे.
- पणजोबा मवाली हुसेन नसीरबादी यांनी रायबरेली या जन्मगावी आपल्या वाचनालयात हा ग्रंथ जतन करून ठेवला होता.
- विशेष म्हणजे उर्दूत लिहिलेल्या या महाभारतातील प्रत्येक प्रकरणात अरबी आणि पर्शियन भाषेत प्रस्तावना दिली आहे.
- हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्दश: अनुवाद नसून ते सोप्या गोष्टीरूपात लिहिलेले आहे.
- प्रत्येक प्रकरणात अरेबिक अवतरणांमध्ये माहिती दिली आहे.
मराठमोळा लेखक सुदीप नगरकरने बेस्ट सेलरच्या यादीत अव्वल क्रमांक :
- इंग्रजी साहित्य क्षेत्रातील मराठमोळा लेखक सुदीप नगरकरने पुन्हा एकदा बेस्ट सेलरच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
- दोन आठवड्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘यू आर ट्रेडिंग इन माय लाईफ’ या सुदीपच्या कादंबरीचे 50 हजारहून अधिक प्रति विकल्या गेल्या असून बेस्ट सेलरच्या स्पर्धेत सुदीपने चेतन भगतलाही मागे टाकले आहे.
- सर्वाधिक खपाच्या टॉप 10 कादंबरींमध्ये मध्ये सुदीपची कांदबरी पहिल्या तर चेतनचे पुस्तक दुस-या स्थानावर आहे.
शॉरॉन हा गुंतागुंतीचा व स्फोटक भूगर्भीय इतिहास असलेला उपग्रह असल्याचे सूचित :
- नासाच्या न्यू होरायझन्स या अवकाशयानाने प्लुटोच्या शॉरॉन या उपग्रहाची वेगळी व अतिशय जास्त विवर्तनक्षमता असलेली छायाचित्रे पाठवली आहेत.
- या छायाचित्रांवरून तरी शॉरॉन हा गुंतागुंतीचा व स्फोटक भूगर्भीय इतिहास असलेला उपग्रह असल्याचे सूचित होत आहे.
- या छायाचित्रात निळा, लाल व अवरक्त असे रंग असून ती या अवकाशयानावरील राल्फ, मल्टीस्पेक्ट्रल व्हिज्युअल इमेजिंग कॅमेऱ्याने टिपली आहेत.
- रंगांमुळे या उपग्रहाच्या पृष्ठभागावरील बदल अधोरेखित झाले आहेत.
- शॉरॉनच्या रंगीत छायाचित्रात प्लुटोच्या छायाचित्रांइतकी रंगांची विविधता नाही.
- उत्तर ध्रुव लाल रंगात दिसत असून त्याचे नामकरण मोर्डर मॅक्युला असे करण्यात आले आहे असे नासाने म्हटले आहे.
- शॉरॉन हा 1214 किलोमीटर व्यासाचा असून त्याच्या प्रतिमेचे विवर्तन 2.9 किलोमीटर इतके आहे म्हणजे इतक्या लहान भागातील तपशील त्यात दिसू शकतात.
- शॉरॉनचा व्यास हा प्लुटोच्या निम्मा असून तो ग्रहाच्या तुलनेत उपग्रहाचा आकार मोठा अशा प्रकारचा सौरमालेतील पहिलाच उपग्रह आहे.
- शॉरॉनच्या वरच्या भागात तुटलेल्या घळया दिसतात व व्हल्कन प्लॅनमची पठारे तळाकडच्या भागात दिसतात. शॉरॉनचा 1214 किलोमीटरचा भाग काही ठिकाणी 0.8 किलोमीटर विवर्तनाने दिसत आहे.
- दुसऱ्या एका छायाचित्रात श्ॉरॉनच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे काही तडे गेलेले दिसतात व त्यात काही घळयांचा समावेश आहे.
- यातील मोठी घळी 1600 कि.मी रूंदीची असून शॉरॉनचा बराच भाग तिने व्यापला आहे.
‘4 जी’ च्या जाहिरातीमधून ग्राहकांची दिशाभूल :
- ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात टेलिव्हीजनवर दाखविल्याप्रकरणी एअरटेल या टेलिकॉम सर्व्हिस देणाऱया कंपनीला अॅडव्हर्टाइझिंग स्टॅण्टर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने(एएससीआय) धक्का दिला आहे.
- एअरटेलने ‘4 जी’ च्या जाहिरातीमधून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवणारी नोटीस ‘एएससीआय’ने कंपनीला बजावली आहे.
- तसेच ही जाहिरात येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत मागे घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
- एअरटेलची ‘4 जी’ सेवा दाखल झाल्याची माहिती देणाऱया जाहिरामधील प्रमुख मॉडेल असलेली मुलगी तिच्या मोबाईल इंटरनेट स्पीडपेक्षा अधिक जलदगतीने चित्रपट डाउनलोड करून दाखवले तर एअरटेल तुम्हाला मोबाइलचे बिल आयुष्यभर फुकटात देईल, असे इतरांना आव्हान करताना दिसते.
- शिवाय, जर इतर मोबाईल इंटरनेट सेवा पुरवणाऱयांचा इंटरनेट वेग एअरटेल ‘4 जी’ हून अधिक वेगवान असेल, तर एअरटेल कंपनी आयुष्यभर मोबाइल बिल फ्री देईल.
- मात्र, ही जाहिरात प्रसारित करताना कोणतेही अस्वीकृती (डिस्क्लेमर) दिलेले नाही. त्यामुळे जाहिरात वादात अडकली आहे.
- दरम्यान, आम्ही केलेल्या दाव्यावर आम्ही ठाम असून, हे ‘एएससीआय’ला पटवून दिले जाईल, असे एअरटेलने सांगितले आहे.