Current Affairs of 26 August 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2017)
कर्नाटकात प्रकाश जावडेकर भाजपाचे निवडणूक प्रमुख :
- कर्नाटकात या वर्षीच्या अखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची भाजपाची जबाबदारी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
- मणिपूर विधानसभा निवडणूक पक्षाला जिंकून दिल्याचे मोठे बक्षीस जावडेकर यांना या जबाबदारीतून दिले गेले आहे.
- भाजपा नेतृत्वाने कोळसा, खाणी आणि वीजमंत्री पीयूष गोयल यांना कर्नाटकातच जावडेकर यांचे सहप्रमुख बनवण्यात आले आहे.
- कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सरकारचा पाया बळकट असून, भाजपा मात्र अंतर्गत मतभेदांना तोंड देत आहे. त्यामुळे कर्नाटक हे भाजपासाठी मोठेच आव्हान आहे. पर्यायाने जावडेकर-गोयल यांनाही आव्हान कठीणच आहे.
- गुजरात विधानसभा निवडणुकीची पक्षाची जबाबदारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे दिली गेली असून चार मंत्र्यांनाही सहप्रमुख बनवण्यात आले.
- ग्रामीण आणि नागरी विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन, पंतप्रधान कार्यालयातील मंत्री जितेंद्र सिंह आणि कायदा राज्य मंत्री पी.सी. चौधरी हे जेटलींसोबत गुजरात विधानसभा निवडणुकीत काम करतील. जेटली चार वेळा गुजरातेतून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अग्रवाल :
- लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे नागरी सत्कार करण्यात आला.
- 210 देशांमध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सेवाकार्य सुरू आहे. लायन्सने शताब्दी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करून शतकोत्तर पहिल्या वर्षात पाऊल टाकले. या ऐतिहासिकसमयी लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद भूषविण्याचा मान नरेश अग्रवाल या भारतीय उद्योजकांना मिळाला.
- आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेश अग्रवाल औरंगाबादेत आले होते. प्रारंभी राजेंद्र दर्डा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. यानंतर नरेश अग्रवाल यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
- सत्काराला उत्तर देताना अग्रवाल म्हणाले की, हा नरेश अग्रवाल यांचा सत्कार नव्हे, हा सन्मान भारतीय तिरंगा झेंड्याचा आहे. सव्वाकोटी भारतीयांचा हा सन्मान आहे. मी ज्या देशांमध्ये लायन्सचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जातो तेथे प्रथम आपले राष्ट्रगीत म्हटले जाते. मला अभिमान वाटतो, मी हिंदुस्थानी असल्याचा.
आधार-पॅनकार्ड जोडणीची अंतिम मुदत कायम :
- खासगीपणा हा मूलभूत हक्क आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी आधारकार्ड हे पॅनला जोडावेच लागणार असून, त्यासाठी दिलेली कालमर्यादा लागू राहणार आहे, असे ‘यूआयडीएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी सांगितले.
- सरकारी अनुदाने, सामाजिक कल्याण कार्यक्रम व इतर लाभ मिळण्यासाठी आधारकार्ड योजना लागू राहणार असून, त्यात आधारकार्ड हे पॅनला जोडण्यासाठी महिनाअखेरीस दिलेली मुदत कायम राहील, असे पांडे यांनी सांगितले.
- तसेच सरकारने 31 ऑगस्टपर्यंत पॅनकार्ड हे आधारला जोडण्याची सक्ती केली आहे.
- ‘पॅन हे आधारकार्डला जोडावेच लागेल. प्राप्तिकर कायद्यातील दुरुस्तीनुसार ते आवश्यक आहे, त्यात काही बदल होणार नाही. आधार कायदा, प्राप्तिकर कायदा व काळ्या पैशाविरोधातील नियम जोपर्यंत लागू आहेत तोपर्यंत यात काही परिणाम होण्याची शक्यता नाही. आधी विविध प्रक्रियांसाठी दिलेल्या कालमर्यादा या पाळाव्याच लागतील, खासगीपणाचा किंवा व्यक्तिगततेचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे पण आम्ही आधारकार्डातील माहिती सुरक्षित ठेवली आहे. त्यामुळे या निकालाचा काही परिणाम होणार नाही,’ असे पांडे यांनी सांगितले.
नंदन निलेकणी इन्फोसिस संचालक मंडळाचे नवे अध्यक्ष :
- इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक आणि आधारकार्ड योजनेचे शिल्पकार नंदन निलेकणी यांनी अखेर इन्फोसिस संचालक मंडळाचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली.
- विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर आठवडाभरात कंपनीच्या संचालक मंडळाने निलेकणींच्या नियुक्तीला मंजुरी दिली. मात्र याचवेळी सिक्कासह आणखी तीन संचालकांनी संचालकपदाचे राजीनामे दिले आहेत.
- नंदन निलेकणी यांची संचालक मंडळाचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मात्र विशाल सिक्का, संचालक मंडळाचे अध्यक्ष आर. सेशाशाही, प्राध्यापक जेफ्री लेहमन, आणि प्राध्यापक जॉन इट्चेमेंडी यांनी राजीनामे दिले आहेत.
- निलेकणी योग्य नेतृत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी नव्याने भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त करत सेशाशाही यांनी निलेकणी यांचे स्वागत केले.
- तसेच रवि वेंकटेशन यांनी संचालक मंडळाच्या सह अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते संचालक मंडळावर कायम राहतील.
दिनविशेष :
- समाजसेविका; ‘नोबेल पारितोषिक’ आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित “मदर तेरेसा” यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 मध्ये झाला.
- 26 ऑगस्ट 1922 मध्ये भारतीय स्वातंत्र्यसैनिक ‘गणेश प्रभाकर प्रधान’ यांचा जन्म झाला.