Current Affairs of 19 September 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (19 सप्टेंबर 2015)
‘नासा’कडून छायाचित्रे प्रसिद्ध :
- अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने प्लुटोची नवी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
- “नासा”च्या न्यू हॉरिझॉन या अवकाश यानाने घेतलेल्या या छायाचित्रांमध्ये प्लुटोवर हिमशिखरे, पठारे आणि धूसर वातावरण असल्याचे दिसून आले आहे.
- या नव्या छायाचित्रांवरून प्लुटोवरील वातावरण पृथ्वीसारखेच दिसत असून, जलचक्रासमान प्रक्रिया होत असल्याचे पुरावेही मिळाले आहेत.
- प्लुटोवर लांबच लांब पठारी प्रदेश दिसत असून, अंदाजे अकरा हजार फूट उंचीचे पर्वत असलेला प्रदेशही दिसत आहे.
- तसेच या पर्वतांवर हिमनद्या असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
- प्लुटोची छायाचित्रे पाहताना आपण पृथ्वीकडेच पाहत आहोत असा आभास होतो, असे या मोहिमेतील शास्त्रज्ञ डॉ. ऍलन स्टर्न यांनी म्हटले आहे.
- न्यू हॉरिझॉनने 14 जुलैला सुमारे अकरा हजार मैल अंतरावरून सूर्यास्तावेळी ही छायाचित्रे घेतली आहेत.
- प्लुटोच्या सर्वांत खालच्या वातावरणात धूळ आणि इतर कणांचे धूसर वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
- प्लुटोच्या पृष्ठभागापासून 60 मैल उंचीपर्यंत अशा वातावरणाचे अंदाजे बारा थर असल्याचेही आढळून आले आहेत.
- प्लुटोवर जलचक्र असल्याचे पुरावे या छायाचित्रांवरून मिळत असल्याचेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
- प्लुटोवर आढळून आलेल्या पर्वतांना नोर्गे मॉंटस् आणि हिलरी मॉंटस् अशी नावे देण्यात आली आहेत.
- पृथ्वीवरील सर्वोच्च शिखर असलेले माउंट एव्हरेस्ट सर्वप्रथम सर करणाऱ्या शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि सर एडमंड हिलरी यांच्यावरून ही नावे देण्यात आली आहेत.
Must Read (नक्की वाचा):
फेसबुकने “सिग्नल” ऍप केले सुरू :
- फेसबुकवर सुरू असलेले ट्रेंडस्, फोटोज्, व्हिडिओ आदींबाबत बातमीच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती देण्यासाठी फेसबुकने नुकतेच “सिग्नल” ऍप सुरू केले आहे.
- माध्यमांना सातत्याने माहितीच्या स्रोताची आवश्यकता असते. यासाठीच जगभरातील काही पत्रकारांनी बातमीसाठीची महत्त्वाची माहिती पत्रकारांना उपलब्ध करून देण्याबाबत फेसबुकला कळविले होते.
- त्यास प्रतिसाद देत फेसबुकनेही “सिग्नल” ऍप सादर केले आहे.
- या ऍपद्वारे फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवरील सांस्कृतिक, मनोरंजन, क्रीडा तसेच इतर सर्व विषयांवर बातमीच्या संदर्भातील माहिती देण्यात येणार आहे.
- फेसबुकचे हे ऍप पत्रकारांच्या एका समुदायाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आल्याचेही फेसबुकने कळविले आहे.
- विविध क्षेत्रांतील सेलिब्रेटी व्यक्तींनी फेसबुकवर मांडलेले मत, फेसबुकवर चर्चेत असलेला विषय, त्यासंबंधीचा व्हिडिओ, छायाचित्रे आदी माहिती या ऍपद्वारे उपलब्ध होणार आहे.
मुंबईत “बॅंक ऑफ चायना”ची भारतातील पहिली शाखा सुरू :
- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत “बॅंक ऑफ चायना”ची भारतातील पहिली शाखा सुरू झाल्यास भारत आणि चीन या देशांचे आर्थिक आणि औद्योगिक संबंध वृद्धिंगत होतील.
- त्यामुळे बॅंकेच्या स्थापनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बॅंक ऑफ चायनाच्या शिष्टमंडळाला दिले.
- बॅंक ऑफ चायना ही चीनमधील अग्रेसर बॅंक आहे.
- या बॅंकेच्या पर्यवेक्षकीय बोर्डचे संचालक ली जून यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
- या वेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- “मेक इन महाराष्ट्र”अंतर्गत राज्यातील गुंतवणूकवाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह नुकताच चीनचा दौरा केला होता.
- या दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेनुसार “बॅंक ऑफ चायना” मुंबईत आपली शाखा सुरू करीत आहे.
- मुंबईसह राज्यात विविध चिनी उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
- या पार्श्वभूमीवर बॅंकेच्या राज्यातील शाखेमुळे भारत-चीन आर्थिक संबंधांना अधिक चालना मिळणार आहे.
फिफा महासचिव जेरोम वाल्के निलंबित :
- तिकीट घोटाळ्यात सामील असल्यावरून फिफा महासचिव जेरोम वाल्के यांना नाट्यमयरीत्या निलंबित करण्यात आले आहे.
- भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासाला वेग यावा, यासाठी अटकेत असलेल्या फिफा उपाध्यक्षांना अमेरिकेच्या स्वाधीन करण्यास मात्र स्वित्झर्लंडने नकार दिला.
- विश्वचषकाच्या तिकीट विक्रीतील घोटाळ्यात सामील असल्याचा वाल्के यांच्यावर आरोप आहे.
- तिकिटांच्या कमाईचा मोठा वाटा त्यांच्या खात्यात वळता करण्यात आल्याची चर्चा आहे.
- 2014 च्या विश्वचषक फुटबॉलच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या एका कंपनीतील अमेरिकेचे सल्लागार बेली एलिन यांनी घोटाळ्याची चर्चा होताच हा करार नंतर रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन 4 ऑक्टोबरला :
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 ऑक्टोबरला होणार आहे.
- इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर हे स्मारक उभारले जाणार आहे.
- या स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम एका फ्रेंच कंपनीला आणि मुंबईतील प्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांना देण्यात आले होते.
- दोघांनीही आपले आराखडे सादर केले आहेत. प्रभू यांनी स्मारकाच्या कामासाठी 425 कोटी रुपये खर्च येईल, असे नमूद केले होते.
- स्मारकामध्ये भव्य सभागृह, डॉ. बाबासाहेबांचा भव्य पुतळा, समृद्ध ग्रंथालय, बौद्ध स्तूप आदींचा समावेश असेल.
- तसेच लंडनमध्ये डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य होते ती वास्तू खरेदी करण्यासाठीची रक्कम घरमालकाला राज्य शासनाकडून सोमवारी अदा करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ क्रिकेटपटू बाळ. ज. पंडित यांचे वृद्धापकाळाने निधन :
- दूरदर्शनची चैन सामांन्यांच्या आवाक्यात नव्हती अशा काळात आपल्या वाणीतून आकाशवाणीवरुन क्रिकेट सामना जिवंत करणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू व समालोचक बाळ. ज. पंडित (वय 86) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
- पंडित यांचा जन्म 24 जुलै 1929 रोजी पुण्यात झाला.
- प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी फलंदाज म्हणूनही भूमिका बजावली होती.
- त्यांची खेळाडू म्हणून कारकिर्द 1959-60 अशी लहानच होती.
- मात्र रेडिओच्या जमान्यात जनसामान्यांना खेळाचा आस्वाद घेता या वा या साठी त्यांनी समालोचकाच्या मिळालेल्या संधीचे सोने केले.
आयएनएस अध्यक्षपदी पी. व्ही. चंद्रन यांची निवड :
- दि इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) 76व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘मातृभूमी’ वृत्तपत्र समूहाचे पी. व्ही. चंद्रन यांची 2015-16 या वर्षांकरिता अध्यक्षपदी निवड झाली.
- ‘राष्ट्रदूत’ साप्ताहिकाचे सोमेश शर्मा यांची डेप्युटी प्रेसिडेंट म्हणून, ‘बिझिनेस स्टँडर्ड’च्या अकिला उरणकर यांची व्हाईस प्रेसिडेंट म्हणून, तर मोहित जैन (इकॉनॉमिक टाइम्स) यांची मानद कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे.
- व्ही. शंकरन हे नवे सरचिटणीस असतील.
- तसेच किरण बी. वडोदरिया यांच्या जागी निवड झालेले चंद्रन हे मातृभूमी वृत्तसमूहाचे व्यवस्थापकीय संपादक आहेत.
- अनेक वर्षांपासून ‘आयएनएस’च्या कार्यकारी समितीवर असलेले चंद्रन हे 2013-14 मध्ये संघटनेचे व्हाइस प्रेसिडेंट, तर 2014-15 साली डेप्युटी प्रेसिडेंट होते.
दिनविशेष :
- चिली सेना दिन
- न्यूझीलँड स्त्री मतदान हक्क दिन
- सेंट किट्स आणि नेव्हिस स्वातंत्र्य दिन
- 1893 : न्यू झीलँडमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
- 1957 : अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
- 1983 : सेंट किट्स आणि नेव्हिसला स्वातंत्र्य.