8 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
8 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 डिसेंबर 2018)
डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार:
- इंडिअन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक असलेल्या डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.
- पुढील तीन वर्षांसाठी ते या पदावर कार्यरत राहतील. यापूर्वी या पदावर असलेल्या अरविंद सुब्रमण्यम यांची ते जागा घेतील. अरविंद सुब्रमण्यम यांनी याच वर्षी जुलै महिन्यांत व्यक्तिगत कारणाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
- डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे सध्या इंडिअन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेमध्ये फायनान्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापकपदी कार्यरत आहेत. शिकागोमधून त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली आहे.
- तसेच आयआयटी आणि आयआयएममधून त्यांनी शिक्षण घेतले आहे. सुब्रमण्यम यांची गणना जगातील उच्च स्तरीय बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इकॉनॉमिक पॉलिसी तज्ज्ञांमध्ये होते.
- सेबीच्या कॉर्पोरेट गवर्नन्स तज्ज्ञांची समिती आणि आरबीआयसाठी बँकांच्या गव्हर्नन्सचे काम करणाऱ्या समितीचा भाग असण्याबरोबर कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि भारतात बँकिंग सुधारणांसाठी त्यांना ओळखले जाते. या सर्व क्षेत्रांमधील त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे.
- सुब्रमण्यम हे वैकल्पिक गुंतवणूक धोरण, प्राथमिक-माध्यमिक बाजार आणि संशोधनावर आधारित सेबीच्या समितीचा भागही राहिले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
केंद्र सरकारची रावी नदीवरील धरणास मंजुरी:
- पंजाबमधील रावी नदीवर शाहपूरकांदी धऱण बांधण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे सध्या जे पाणी रावी नदीमार्गे पाकिस्तानला वाहून जाते किंवा वाया जाते त्याचा वापर करणे भारताला शक्य होणार आहे.
- 2022 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल. या दोन राज्यांच्या सिंचन क्षमतेमध्ये वाढ होईल.
- 17 वर्षांपूर्वीच या प्रकल्पाची योजना आखण्यात आली होती. पण राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता.
- 2018-19 ते 2022-23 या पाच वर्षाच्या काळात केंद्राकडून प्रकल्पातील सिंचनाचा जो भाग आहे त्यासाठी राज्याला 485 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल. भारत-पाकिस्तानमधील सिंधु पाणी वाटप करार लक्षात घेऊनच केंद्रीय मंत्रिमंडळाने या धरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
- सन 1960 मध्ये झालेल्या करारानुसार भारताला पूर्वेकडच्या रावी, बियास आणि सतलज या तीन नद्यांच्या पाण्याचा पूर्ण वापर करण्याचा अधिकार आहे. हे धरण बांधून पूर्ण झाल्यानंतर पंजाबची सिंचन क्षमता 5 हजार हेक्टरने तर जम्मू-काश्मीरची सिंचन क्षमता 32,173 हेक्टरने वाढणार आहे तसेच या प्रकल्पामुळे पंजाबला 206 मेगावॅट ऊर्जा क्षमतेचा हायड्रोपावर प्रकल्प उभारता येईल.
कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत सरकारचे योगदान 14 टक्के:
- सरकारी कर्मचा-यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेतील (एनपीएस) गुंतवणुकीत सरकारच्या योगदानात वाढ करण्याच्या निर्णयास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आतापर्यंत कर्मचार्यांच्या मूळ वेतनाच्या 10 टक्के योगदान सरकार देत होते. ते आता 14 टक्के करण्यात आले आहे.
- कर्मचार्यांचे किमान योगदान 10 टक्के कायम राहणार आहे. एनपीएसमधील 10 टक्क्यांपर्यंतच्या योगदानास प्राप्तिकर कायद्याच्या 80 सी अन्वये कर सवलत देण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवृत्तीच्या वेळी जमा झालेल्या निधीपैकी 40 टक्के रक्कम एनपीएसमधून काढून अन्यत्र वळविण्याची परवानगी नोकरदारास होती. ही मर्यादा वाढवून 60 टक्के करण्यात आली आहे. आपली रक्कम कर्मचारी निश्चित उत्पन्न योजनांत अथवा शेअर बाजारात गुंतवू शकतील.
- मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, निवृत्तीच्या वेळी कर्मचार्यांच्या एनपीएस खात्यात जमा असलेली सर्व 100 टक्के रक्कम अन्यत्र न वळविता एनपीएसमध्येच ठेवल्यास कर्मचार्यांना त्याच्या शेवटच्या वेतनाच्या अर्ध्या रकमेएवढे पेन्शन मिळेल.
आता निजामुद्दीन दर्ग्यातही महिलांना प्रवेशाची मागणी:
- मुंबईच्या हाजीअली दर्ग्यात आणि केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशाचा समान अधिकार देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता दिल्लीच्या निजामुद्दीन औलिया दर्ग्यातही महिलांना प्रवेश देण्याची मागणी जोर धरत आहे.
- यासंबंधी दिल्ली हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये महिलांना दर्ग्यात आतल्या खोलीपर्यंत जाण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.
- निजामुद्दीन दर्ग्यामध्ये महिलांनाही प्रवेश देण्याच्या मागणीबाबत कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका महिला विद्यार्थीनीने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केंद्र आणि संबंधित प्रशासनाला या दर्ग्यात महिलांना प्रवेशाचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
- याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, या दर्ग्याच्या बाहेर एक नोटीस लावण्यात आली आहे. यामध्ये ‘महिलांना प्रवेश बंद’ असे लिहिले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
- याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी याबाबत संबंधित प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. महिलांना येथे प्रवेश नाकारणे हे असंविधानिक असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
- तसेच यासंबंधी अजमेर शरीफ, हाजीअली दर्ग्याचे उदाहरण समोर ठेवले. या ठिकाणी महिलांना आतपर्यंत प्रवेशाचा अधिकार मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टात या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल:
- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आरोग्यसेवेत राज्यात बाजी मारली आहे. राज्य शासनाने केलेल्या सर्वेक्षणात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, पीपीआययूसीडी, गरोदर माता नोंदणी, लसीकरण यांसह अन्य आरोग्यसेवा चांगल्या दर्जाच्या पुरवल्याचे आढळले असून, त्यासाठी त्यांना शंभरपैकी 82 गुण मिळाले आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा आकडा चांगला असल्याने पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल ठरला आहे.
- ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरविण्याचे काम हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असते. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या साह्याने तसेच आरोग्यसेवकांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
- तसेच या आरोग्यसेवेची पाहणी करण्यासाठी तसेच राज्यातील आरोग्यसेवा चांगल्या पद्धतीने सुरू राहावी आणि रुग्णांना सेवा देताना तत्काळ व उत्तम सेवा मिळते की नाही, हे पाहण्यासाठी राज्य शासनाकडून दर वर्षी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे रँकिंग काढण्यात येते.
- तर यामध्ये प्रत्येक विभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे, रुग्णांची नोंदणी, साथीच्या रोगांवर कशा पद्धतीने नियंत्रण आणले, तत्काळ आरोग्यसेवा या सर्व गोष्टींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र गुण दिले जातात. या सर्वेक्षणात पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा अव्वल ठरला.
दिनविशेष:
- हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म 8 डिसेंबर 1897 मध्ये झाला होता.
- भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत सन 1937 पासून धावू लागली.
- भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर सन 1971 मध्ये हल्ला केला.
- सन 1985 मध्ये सार्क परिषदेची स्थापना झाली.
- ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने सन 2004 मध्ये भेट दिली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा