5 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 February 2019 Current Affairs In Marathi

5 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 फेब्रुवारी 2019)

अरिबम शर्मां पद्मश्री सन्मान परत करणार:

 • प्रस्तावित नागरिकत्व सुधारणा विधेयकास विरोध करण्यासाठी आघाडीचे मणिपुरी चित्रपट निर्माते अरिबम श्‍याम शर्मा (वय 83वर्ष) यांनी पद्मश्री सन्मान शासनाला परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांना 2006 मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 • दरम्यान, मणिपूरमधील विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला असून, या अनुषंगाने अकरा प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची दिल्लीत भेट घेत आपला विरोध दर्शविला.
 • मणिपुरी चित्रपटांना जागतिक पातळीवर नेणारे आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असलेल्या शर्मा यांची एक संवेदनशील चित्रपट निर्माता म्हणून ओळख आहे. त्यांनी या प्रस्तावित विधेयकाला विरोध करत पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.
 • मणिपूरचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते एन. बिरेन सिंह यांनीही या विधेयकाला विरोध केला असून आमचे राज्य या विधेयकाच्या कक्षेतून वगळले जावे अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे. हे विधेयक मंजूर झाले तर राज्यामध्ये परप्रांतीयांचा पूर येईल अशी भीती स्थानिकांमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 • तर या अनुषंगाने मेघालयचे मुख्यमंत्री आणि ‘नॅशनल पीपल्स पार्टी’चे अध्यक्ष कॉनराड के. संगमा यांच्या नेतृत्वाखालील विविध पक्षांच्या अकरा सदस्यीय शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ यांची भेट घेतली.

यंदापासून दुसरीसाठी नवा अभ्यासक्रम:

 • यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. मात्र, इयत्ता तिसरीचा अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी बदलण्यात येणार नसल्याचे बालभारतीच्या वतीने जाहीर केले आहे. Balbharati
 • एक फेब्रुवारी 2018 च्या पत्रान्वये राज्यात जून 2019 या नव्याने सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये दुसरी, तिसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला होता.
 • मात्र, बालभारतीने त्यामध्ये बदल करत 17 जानेवारीच्या पत्रान्वये केवळ दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी नवा अभ्यासक्रम येणार नाही.
 • एखाद्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्याची सूचना शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच द्यावी लागते. मागील वर्षी तिसरीच्या अभ्यासक्रमामध्येही बदल करणे प्रस्तावित केले होते. मात्र, बालभारतीने आता या निर्णयान्वये तिसरीचा अभ्यासक्रम न बदलण्याचे ठरविले आहे. त्यामुळे यंदा दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना राज्यात 10 टक्के आरक्षण:

 • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना केंद्राप्रमाणे शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत मान्यता दिली. त्यामुळे राज्यातील एकूण आरक्षण आता 78 टक्के इतके झाले आहे.
 • हे आरक्षण अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता सर्व अनुदानित किंवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये, सर्व उच्च शिक्षण शैक्षणिक संस्था, स्वायत्त विद्यापीठे यामध्ये असेल.
 • तसेच शासकीय आस्थापना, निमशासकीय आस्थापना, मंडळ, महामंडळे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्वराज्य संस्था, प्राधिकरणे यांच्या आस्थापनांवरील सरळसेवेच्या पदांमध्ये हे आरक्षण लागू होणार आहे.
 • तर या आरक्षणाने मूळ आरक्षण असलेल्या घटकांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आधीचे 52 टक्के आरक्षण आणि नंतर मराठा समाजाला देण्यात आलेल्या 16 टक्के आरक्षणाला कोणतीही बाधा येणार नाही.

मुद्रांक शुल्क अभय योजनेला मान्यता:

 • शासनाच्या विविध प्राधिकरणांकडून वाटप करण्यात आलेल्या निवासी-अनिवासी गाळे आणि सदनिकांसह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सदनिका आणि भाडेपट्ट्याचे हस्तांतर दस्त यासाठी आकारण्यात आलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडाच्या रकमेत 90 टक्के सूट देणाऱ्या मुद्रांक शुल्क अभय योजनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
 • म्हाडा, सिडको आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून निवासी किंवा अनिवासी गाळे, सदनिकांचे वाटप करण्यात येते. अशा सदनिकांसह मानीव अभिहस्तांतरणासाठी प्रलंबित असलेल्या नोंदणीकृतसहकारी गृहनिर्माण संस्थामधील निवासी सदनिका आणि निवासी वापरासाठीच्या स्थावर मालमत्तेच्या भाडेदारीच्या हस्तांतरणाचे दस्त योग्य मुद्रांकित केले नसल्यास दरमहा दोन टक्के दराने दंडआकारण्यात येतो. हा दंड मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या जास्तीत जास्त चार पट आकारला जातो.

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन:

 • मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचा वयाच्या 70व्या वर्षी (4 फेब्रुवारी) निधन झाले. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ramesh bhatkar
 • रमेश भाटकर यांचा रंगभूमी, रुपेरी पडदा आणि छोटा पडदा अशा तिन्ही मंचावर वावर होता. मात्र त्यांचं खरं प्रेम हे रंगभूमीवरच होतं. आजपर्यंत त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं असून त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.
 • रमेश भाटकर यांना खरी ओळख रंगभूमीमुळे मिळाली. त्यांच्या अनेक नाटकांचं आजही आवर्जुन नाव घेतलं जातं. 1975 साली रंगमंचावर सादर झालेल्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकामुळे रमेश भाटकर यांची वेगळी ओळख निर्माण झाली. या नाटकात ते मुख्य भूमिकेत झळकले होते.
 • या नाटकांव्यतिरिक्त अशी बरीच नाटक आहेत ज्यामध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. ‘मुक्ता’, ‘उघडले स्वर्गाचे दार’, ‘देणाऱ्याचे हात हजार’ या नाटकांमध्ये ते मुख्य भूमिकेत झळकले असून या नाटकांनी त्याकाळी रंगभूमी गाजविली होती.
 • विशेष म्हणजे रमेश भाटकर यांनी 50 हून अधिक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केले होते. तर गेल्या वर्षी त्यांना 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

दिनविशेष:

 • चार्ली चॅप्लिनने सन 1919 मध्ये इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली होती.
 • सन 1952 मध्ये स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या.
 • सन 2003 या वर्षी भारताने 2002 मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
 • पुण्याची स्वाती घाटे ही सन 2004 या वर्षी बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.