चालू घडामोडी (20 मार्च 2018)
सेवा ज्येष्ठतेनुसार 100 टक्के पदोन्नती :
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला पदोन्नतीतील आरक्षणाचा 33 टक्क्यांचा वाटा सर्व वर्गासाठी खुला करून पदोन्नतीत आरक्षण न देता 100 टक्के सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे. पदोन्नतीत मागासवर्गीयांसाठी असलेले 33 टक्के आरक्षण रद्द करून या जागा सेवा ज्येष्ठता या एकाच निकषावर भरण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
- पदोन्नतीत आरक्षण दिले जाऊ नये, या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्याच दिशेने राज्य सरकारने टाकलेले हे एक पाऊल समजले जात आहे. मागासवर्गीयांसाठी पदोन्नतीत आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे; तर उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीही दिलेली नाही.
- राज्य सरकारच्या सेवेतील पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यास विधी व न्याय विभागाने यापूर्वीच परवानगी दिली होती. खुल्या प्रवर्गातील 67 टक्के जागा सेवा ज्येष्ठतेनुसार भरली जात असली तरी, 33 टक्के मागासवर्गीयांसाठी राखीव जागांच्या पदोन्नतीबाबत सरकार निर्णय घेण्यास कचरत होते.
- आता मात्र राज्य सरकारने याबाबत विधी व न्याय विभागाकडे याबाबतचा कायदेशीर सल्ला विचारला असून, मागासवर्गीयांसाठी राखीव असलेले 33 टक्के आरक्षण हे खुले करण्याचा सरकारचा विचार आहे.
- या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास 100 टक्के पदोन्नतीही सेवा ज्येष्ठतेनुसार होणार असून, त्यासाठी कोणतेही आरक्षण असणार नाही.
कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय :
- कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
- कर्नाटकातील जातीय समीकरण लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
- लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची केंद्र सरकारकडे लिखित मागणी करण्यात येईल असा निर्णय 19 मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
- नागामोहन दास समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाआधी मंत्रिमंडळात सविस्तर आणि प्रदीर्घ चर्चा झाली. कर्नाटक अल्पसंख्याक कायद्याच्या कलम 2 (डी) अंतर्गत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्याचा विचार व्हावा असे नागामोहन दास समितीने म्हटले होते. स्वतंत्र धर्म आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याची लिंगायत समाजाची मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित होती.
- तसेच कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 17 टक्के आहे. लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा मिळाला तर कलम 25, 28, 29 आणि 30 अंतर्गत फायदे मिळतील.
भारतात तयार होणार एफ-16 फायटर विमाने :
- भारतात ज्या एफ-16 फायटर विमानांची निर्मिती होईल त्यामध्ये काही खास वैशिष्ट्य असतील असे अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने म्हटले आहे.
- अमेरिकन संरक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या लॉकहीड मार्टिनने भारतात एफ-16 फायटर विमानांच्या निर्मितीचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे भारताच्या हवाई सुरक्षेच्या गरजा पूर्ण होणार असून मेक इन इंडियाचे धोरणही प्रत्यक्षात येईल.
- मेक इन इंडियामुळे संरक्षण क्षेत्राचे दरवाजे भारतीय खासगी कंपन्यांसाठी खुले झाले आहेत. हवाई दलाला अधिक मजबूत, सक्षम करण्यासाठी आपल्या ताफ्यात नव्या लढाऊ विमानांचा समावेश करण्याची भारताची योजना आहे. अब्जावधी डॉलर्सचे हे कंत्राट मिळवण्यासाठी लॉकहीड मार्टिन कॉर्प, साब एबी ग्रिपेन आणि बोईंग या कंपन्यांमध्ये अटीतटीची स्पर्धा आहे.
- एफ-16 विमान निर्मितीचा संपूर्ण प्रकल्प भारतात आणण्याची लॉकहीड मार्टिनची तयारी आहे. भारतात विमानांची निर्मिती करताना त्यात काही खास गोष्टी असतील. ज्या यापूर्वी कुठल्याही फायटर विमान निर्मिती कंपनीने दिलेल्या नाहीत असे लॉकहीड मार्टिनचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी सांगितले.
प्रसिद्ध देवस्थान पंढरपूर ऍपचे अनावरण :
- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची माहिती, महात्म्य, मंदिर समितीच्या योजना, भक्त निवास माहिती, ऑन लाईन दर्शन व देणगी, संपर्क क्रमांक अशी सर्वंकष माहिती आता मोबाईल ऍपव्दारे उपलब्ध होणार आहे.
- मंदिर समितीने मनोरमा सोशल मोबाईल ऍनालिटिक्स क्लाऊड कोल्हापूर यांच्या सहकार्याने तयार केलेल्या या मोबाईल ऍपचे अनावरण 19 मार्च रोजी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले व अन्य सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चंद्रभागा नदीवर स्नानासाठी येणाऱ्या महिलांसाठी चेंजींग रुम उभा करणे यासह अनेक महत्वाचे निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आले. यावेळी या मोबाईल ऍपचे अनावरण करण्यात आले.
- श्री श्रेत्र पंढरपूरचे पर्यटन दृष्ट्या महत्व वाढवण्यासाठी आणि भाविकांना मंदिरा विषयी एकत्रित माहिती मिळावी यासाठी हे ऍप तयार करण्यात आले आहे. गुगुल ऍप स्टोअर वर ‘श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर’ या नावाने हे ऍप मोफत उपलब्ध होणार आहे.
इंस्टाग्रामतर्फे पहिल्यांदाच पुरस्कार जाहीर :
- आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणारी दीपिका पदुकोण ही अभिनेत्री आता इंस्ट्राग्राम या सोशल नेटवर्किंग साइटची राणी ठरली आहे.
- सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या अकाऊंटचे अवॉर्ड दीपिका पदुकोणने मिळवले आहे. ‘Most Followed Account’ हा पुरस्कार दीपिकाला जाहीर झाला आहे.
- तर क्रिकेटर विराट कोहलीला मोस्ट एंगेज्ड अकाऊंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंस्टाग्रामने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षीसांची भारतात घोषणा केली आहे.
- विराट कोहलीचे फॉलोअर्स 1 कोटी 90 लाखांच्या घरात आहेत. सर्वाधिक एंगेज्ड अकाऊंटचा पुरस्कार त्याच्या अकाऊंटला जाहीर झाला आहे.
- 2017 या वर्षात लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊसच त्याच्या अकाऊंटवर पडला आहे. तर अभिनेत्री प्रियंका चोप्राला मागे सारत दीपिका पदुकोण ही इंस्टाग्रामची क्वीन ठरली आहे.
दिनविशेष :
- सन 1602 मध्ये 20 मार्च रोजी डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
- रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना सन 1854 मध्ये झाली.
- 20 मार्च 1916 मध्ये अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
- सन 1917 मध्ये 20 मार्च रोजी महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.
- सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व 20 मार्च 2015 या एकाच दिवशी झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा