चालू घडामोडी (11 फेब्रुवारी 2017)
भारताचा महिला क्रिकेट संघ सुपरसिक्समध्ये दाखल :
- भारताची सलामीची फलंदाज तिरुष कामिनीचे शतक आणि दीप्ती शर्माबरोबर केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने आयर्लंडवर 125 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच भारताने आयसीसी महिला जागतिक चषक पात्रता फेरीच्या सुपरसिक्समध्ये प्रवेश केला आहे.
- कामिनी हिने 146 चेंडूंत 11 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 113 धावा केल्या. तिने दीप्तीसोबत पहिल्या विकेटसाठी 174 धावांची भागीदारी केली.
- महिला क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी भारताकडून करण्यात आलेली ही पहिली भागीदारी आहे. या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या चांगल्या सुरुवातीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 250 धावा केल्या.
- प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 49.1 षटकांत 125 धावांवर बाद झाला. त्यांच्याकडून गॅबी लुईस हिने 33 तर इसोबेल जोएसने 31 धावा केल्या.
- भारताची लेगस्पिनर पुनम यादव हिने 30 धावा देत तीन गडी बाद केले. तर शिखा पांडे, देविका वैद्य आणि एकता बिष्ट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
ISRO एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करणार :
- नेहमीच समस्त भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करणारी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो येत्या 15 फेब्रुवारीला नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे.
- इस्त्रो PSLV C 37 या प्रक्षेपकाव्दारे एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करुन नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर करणार आहे.
- एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम सध्या रशियाच्या नावावर आहे. जुलै 2014 मध्ये रशियाने एकाचवेळी 37 उपग्रह प्रक्षेपित केले होते.
- 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.28 मिनिटांनी श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन PSLV C 37 मधून 104 उपग्रहांचे प्रक्षेपण होईल.
- पृथ्वी निरीक्षण करणा-या मालिकेतील कार्टोसॅट-2 हा मुख्य उपग्रह असून त्याचे वजन 714 किलो आहे.
विराट कोहलीचे विश्वविक्रमी व्दिशतक :
- कर्णधार विराट कोहलीने सलग चौथ्या कसोटी मालिकेत चौथे व्दिशतक झळकावण्याचा पराक्रम केला.
- विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशच्या कमकुवत गोलंदाजीविरुद्ध एकमेव कोसटी सामन्यात दुसऱ्या दिवशी 6 बाद 687 धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला.
- प्रत्युत्तरात खेळताना दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने 1 गडी गमावित 41 धावा केल्या होत्या. उमेश यादवने सलामीवीर सौम्या सरकारला माघारी परतवले.
- कोहलीने 204 धावांची खेळी करीत महान सर डॉन ब्रॅडमन व राहुल द्रविड यांचा विक्रम मोडला. त्यांनी सलग तीन मालिकांमध्ये तीन व्दिशतके झळकावली होती. कोहलीने यापूर्वी वेस्ट इंडिज (200), न्यूझीलंड (211) व इंग्लंड (235) यांच्याविरुद्ध व्दिशतके झळकावली होती.
- भारताने 6 बाद 687 धावांची मारलेली मजल विक्रमी ठरली आहे. कारण यापूर्वी कुठल्याही संघाला सलग तीन कसोटी सामन्यांत 600 धावांच्या पुढे मजल मारता आलेली नाही. यापूर्वी भारताने इंग्लंडविरुद्ध मुंबई व चेन्नई कसोटी सामन्यात 600 धावांची वेस ओलांडण्याचा पराक्रम केला आहे.
रेशनकार्ड वापरण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक :
- शिधावाटप केंद्रांवरुन स्वस्त दरांमध्ये धान्य खरेदी करण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. स्वयंपाकाच्या गॅससाठी याआधीच सरकारने आधार कार्ड अनिवार्य केले आहे.
- भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि अनुदानाचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
- आधार नसलेल्या लोकांनी 30 जूनपर्यंत आधार कार्डसाठी अर्ज करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
- मात्र ज्या लोकांकडे आधार कार्ड नसेल, त्या लोकांना 30 जूननंतर शिधावाटप केंद्रांवरुन स्वस्त दरात धान्य मिळणार की नाही, याबद्दल सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
- खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत सरकार देशातील 80 कोटी लोकांना दर महिन्याला प्रति व्यक्तीसाठी 5 किलो धान्य 1 रुपया ते 3 रुपये दराने देते. खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत अनुदानासाठी सरकार दरवर्षी 1.4 लाख कोटी रुपये खर्च करते.
- खाद्य आणि ग्राहक विभागाने 8 फेब्रुवारीला अधिसूचना जारी केली आहे. या अधिसुचनेनुसार शिधावाटप पत्रिका धारकाला आधार क्रमांकाचा पुरावा द्यावा लागणार आहे आणि अनुदान मिळवण्यासाठी आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्यावी लागणार आहे.
- जम्मू काश्मीर, आसाम आणि मेघालयचा अपवाद वगळता खाद्य आणि ग्राहक विभागाने लागू केलेली अधिसूचना 8 फेब्रुवारीनंतर देशभरात लागू झाली आहे.
दिनविशेष :
- 11 फेब्रुवारी 1830 रोजी मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली.
- सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक, विद्युतप्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक ‘थॉमस अल्वा एडिसन’ यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी झाला.
- म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक 11 फेब्रुवारी 1933 मध्ये प्रसिद्ध झाला.
- 11 फेब्रुवारी 1979 रोजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा