चालू घडामोडी (9 जुलै 2016)
भारत-आफ्रिका संरक्षण उत्पादनात सहकार्य :
- संरक्षणसामग्री, उत्पादन, खाणकाम व खनिज क्षेत्रातील संबंध दृढ करण्यासोबत दहशतवादाशी लढण्यासाठी कृतिशील पाऊल उचलण्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी परस्पर सहमती दर्शविली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी (दि. 8) दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांची भेट घेतली.
- संरक्षणसामग्रीचे उत्पादन करण्यासाठी भारत हे अतिशय योग्य ठिकाण असून, प्रादेशिक व जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतील, यावर मोदी यांनी चर्चेत भर दिला.
- जागतिक पातळीवर संरक्षणसामग्री उत्पादनात दक्षिण आफ्रिका आघाडीवर आहे. या बैठकीदरम्यान मोदी यांनी अणुपुरवठादार देशांच्या गटाचे सदस्यत्व भारताला मिळावे यासाठी दक्षिण आफ्रिका देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानले.
- व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये दोन्ही देशांना खूप वाव असून, विशेषतः खनिजे व खाणकाम, रसायने, औषधे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा यात प्रामुख्याने समावेश करावा लागेल, असे मोदी यांनी या वेळी नमूद केले.
- दहशतवादाशी लढण्याच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले, ‘समाजाच्या पायावर दहशतवादी हल्ला करीत आहेत.
- तसेच दोन्ही देश दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी कृतिशील सहकार्य करणार आहेत.
पर्यटन परिषद राज्याची पर्यटन राजधानी औरंगाबाद :
- पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी नवनवीन संधी शोधण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातली पहिली पर्यटन परिषद राज्याची पर्यटन राजधानी असणाऱ्या औरंगाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच याविषयी पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग म्हणाल्या, ‘अजिंठा-वेरूळ’च्या लेण्यांकडे पर्यटकांचा नेहमीच मोठा ओघ राहिला आहे.
- राज्यात येणाऱ्या देशी, तसेच परदेशी पर्यटकांना या स्थळांनी नेहमीच आकर्षित केले आहे.
- ऐतिहासिक रेशीम मार्ग आणि चीनसह जगभरातल्या बुद्धिस्ट वर्तुळाशी असलेला संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
- पद्मपाणिची (बुद्ध) भलीमोठी शिल्पे असल्याने अजिंठाचा समावेश नेहमीच जगातल्या अप्रतिम पर्यटन स्थळांमध्ये होतो.
सावरकरांच्या ‘त्या’ ऐतिहासिक उडीला 106 वर्ष पूर्ण :
- भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांचा अत्यंत जुलमी छळ सहन करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ‘मोरिया’ बोटीतून मारलेल्या त्या ऐतिहासिक उडीला (दि. 8) 106 वर्ष पूर्ण झाली.
- आठ जुलै 1910 रोजी सावरकरांनी ‘मार्सेलिस’ बंदरात थांबलेल्या ‘मोरिया’ बोटीतून उडी मारुन फ्रान्सचा किनारा गाठला होता.
- 1909 साली मॉरली-मिनटो सुधारणां विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सशस्त्र उठाव केला होता.
- तसेच या प्रकरणी ब्रिटीशांनी सावरकरांवर गुन्ह्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला. या प्रकरणी त्यांना लंडनमध्ये अटक झाली.
- इंग्रजांनी त्यांना मार्चमहिन्यात अटक केली. एक जुलै 1910 रोजी सावरकरांना मोरिया बोटीतून भारतात पाठवण्यात आले.
- त्यावेळी इंग्रजांच्या तावडीतून कसे निसटायचे हा एकच विचार त्यांच्या डोक्यात होता.
- आपल्याला बोटीतून पाठवण्यात येईल याची पूर्ण कल्पना त्यांना होती. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळच्या मित्राला त्यांना ज्या सागरी मार्गाने नेण्यात येणार त्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते.
- अखेर आठ जुलैला सावरकरांना ती संधी मिळाली. त्यांनी बोटीच्या शौचकूपाच्या खिडकीतून उडी मारुन फ्रान्सचा किनारा गाठला.
- अथांग सागर पोहून त्यांनी किनारा गाठला पण किना-यावर फ्रान्स पोलिसांनी पुन्हा त्यांना अटक केली.
हार्दिक पटेलसह 22 जणांना जामीन मंजूर :
- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलसह 22 जणांना गुजरात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी सहा महिन्यांसाठी राज्याबाहेर राहण्यास सांगितले आहे.
- गुजरात सरकारने हार्दिकवर राजद्रोहाचा आरोप ठेवत तुरुंगात टाकले होते.
- हार्दिक पटेलने आपल्याला जामीन मिळावा, अशी विनंती गुजरात उच्च न्यायालयाला केली होती. ती मागणी मान्य केली असली, तरी तो तुरुंगातून बाहेर पडणार किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- कारण त्याच्यावरील अन्य काही खटले अद्याप प्रलंबित आहेत.
- राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरुद्ध पाटीदार समाजाचे आंदोलन उभारल्याप्रकरणी हार्दिक पटेल याला सुरत तुरुंगात टाकले होते.
- पाटीदार समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि महाविद्यालयांत आरक्षण ठेवावे, अशी मागणी करीत हार्दिक पटेलने अनेक सार्वजनिक सभा घेतल्या होत्या आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
ग्रेट ब्रिटनचा अँडी मरे विम्बल्डन स्पर्धेच्या फायनलमध्ये :
- विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या द्वितीय मानांकित अँडी मरे याने झेक रिपब्लिकच्या दहाव्या मानांकित टॉमस बेर्डिच याचा 6-3, 6-3, 6-3 असा सरळ सेटसमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
- अँडी मरे याने हा सामना 1 तास 57 मिनिटांत जिंकला.
- आता त्याची विजेतेपदाच्या लढतीसाठी कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी सामना होईल.
दिनविशेष :
- 1951 : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
- 1969 : वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
- 2011 : सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा