चालू घडामोडी (26 एप्रिल 2016)
महानगरपालिकेची जीओ टॅगिंगची यंत्रणा यशस्वी :
- महानगरपालिकेच्या कामांमध्ये पारदर्शकता यावी, कामांची पुनरावृत्ती टाळावी आणि सुरू असलेल्या कामांची स्थिती काय आहे, ते कोणत्या टप्प्यावर आहे, याची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देशात सर्वप्रथम जीओ टॅगिंग यंत्रणा राबवण्याचा मान मिळवला होता.
- तसेच ही यंत्रणा यशस्वी झाल्याचा दावा आता पालिकेने केला आहे.
- विशेष म्हणजे इतर शासकीय यंत्रणाही जीओ टॅग यंत्रणा वापरण्याविषयी सकारात्मक विचार करीत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
- याबाबत, अलीकडेच केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयानेही हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच त्यामुळे आयुक्तांनी जीओ टॅगिंगचा घेतलेला निर्णय आता अनेक शासकीय यंत्रणा राबवण्याचा विचार करीत असल्याचे दिसत आहे.
- महापालिकेच्या वतीने दरवर्षी करोडो रुपयांची विकासकामे करण्यात येतात.
- तसेच या कामांचे योग्य मूल्यमापन व्हावे, कामांमध्ये पारदर्शकता राहावी, कामांची काय प्रगती आहे, त्याचत्याच कामांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक कामाचे जीओ टॅगिंग झाल्याशिवाय त्याचे देयक अदा करू नये, असे आदेश काढले होते.
अभ्यास मंडळ व तज्ज्ञ समित्या बरखास्त :
- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य मंडळ आणि बालभारती या संस्थांमध्ये अस्तित्त्वात असलेली अभ्यास मंडळ, लेखन गट, कार्यगट आणि तज्ज्ञ समित्या बरखास्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने (दि.25) घेतला.
- इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंतचे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यसाहित्य, शिक्षक प्रशिक्षण, मूल्यमापन व लोक सहभागासाठी निर्णय घेण्याकरता विषयनिहाय तज्ज्ञ समित्या आणि अभ्यास मंडळे असतील.
- तसेच ती शिक्षण हक्क कायद्यांतर्गत नेमण्यात आलेल्या शैक्षणिक प्राधिकरणाच्या अखत्यारित काम करतील, या मंडळांतील सदस्यांची निवड ऑनलाइन/ जाहिरात पद्धतीने अर्ज मागवून करण्यात येणार आहे.
- शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी, राज्यातील अभ्यासक्रमांची काठीण्यपातळी वाढविणे व गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने संरचनात्मक बदल करण्यात येणार आहेत.
- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
- तसेच ते पूर्ण कार्यक्षम होऊन काम सुरू करेपर्यंत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने समन्वय राहावा यासाठी राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
- पाठ्यपुस्तक छपाईचे कार्य पूर्वीप्रमाणे बालभारतीच करेल, रॉयल्टीबाबत प्रचलित धोरण कायम राहील, असे शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे.
भारताचा नेमबाज मैराज खानला सिल्वर मेडल :
- भारताचा नेमबाज मैराज अहमद खानने रिओ दि जानिरो (ब्राझील) शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात रौप्यपदक प्राप्त केले.
- या स्पर्धेतील ‘स्कीट’ सामन्यातील हे भारताचे पहिले पदक आहे.
- 40 वर्षीय मैराजने पुरुषांच्या स्कीट सुवर्णपदक सामन्यात स्वीडनच्या मार्कस स्वेनसनचा शूटआउट टायब्रेकरवर 2-1 ने पराभव केला.
- मैराजने अंतिम फेरीच्या क्वालिफाय राउंडमध्ये 125 पैकी 122 शॉट्स लगावून फायनलसाठी पात्रता मिळवली. तो 6 नेमबाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
- अंतिम फेरीत मैराज आणि मार्कस या दोघांनी 16 पैकी 15, अशी कामगिरी करून सुवर्णपदकासाठी दावेदारी पक्की केली होती. ज्यात मार्कसने बाजी मारली.
- इटलीचा टमारो कसान्द्रो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी सतीश माथूर :
- आयपीएसच्या 1981 च्या तुकडीतील अधिकारी सतीश माथूर यांची (दि.25) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
- तसेच या विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्तपद सोपविण्यात आले, संजय बर्वे 1987 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
- ‘एसीबी’चे प्रमुख होण्यापूर्वी माथूर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे महासंचालक होते.
- नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये प्रशिक्षण घेतलेले सतीश माथूर हे महाराष्ट्रातील पहिले अधिकारी असून, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यानंतर ते सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहे.
- महासंचालक म्हणून त्यांनी विधी व तांत्रिक तसेच पोलीस गृहनिर्माण व कल्याण या विभागाचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे.
- तसेच त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना एअर इंडियामध्ये तसेच सीबीआयमध्येही काम केले.
- सीबीआयमध्ये असताना मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट तपासात त्यांचा सहभागा होता. ते काही काळ पुण्याचे आयुक्त होते व मुंबईत वाहतूक पोलीस सहआयुक्त हे पदही त्यांनी भूषवले आहे.
भविष्य निर्वाह निधी वर 2015-16 या वर्षासाठी 8.7 टक्के व्याज :
- भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वर 2015-16 या वर्षासाठी 8.7 टक्के व्याज मिळणार आहे.
- भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्तांनी 8.8 टक्के व्याजदराची शिफारस केली होती; मात्र काटकसरीवर भर देणाऱ्या केंद्र सरकारने 8.7 टक्के व्याजाला मंजुरी दिली.
- तसेच गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा सरकारने पीएफ व्याजदराला कात्री लावल्याने जवळपास पाच कोटी पीएफधारकांची निराशा झाली आहे.
- भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) विश्वस्त मंडळाची फेब्रुवारीमध्ये व्याजदरासंबंधी बैठक झाली, या वेळी 2015-16 या वर्षासाठी 8.8 टक्के व्याजदर देण्याची शिफारस मंडळाने केली.
- मात्र, अर्थ खात्याने 8.7 टक्के व्याजदर निश्चित केल्याची माहिती केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी (दि.25) लोकसभेत दिली.
- पहिल्यांदाच पीएफ विश्वस्त मंडळाची शिफारस सरकारकडून अमान्य करण्यात आली.
उमर खलिद याला जेएनयूतून निलंबित करण्यात आले :
- जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) कॅम्पसमध्ये अफझल गुरूच्या फाशीविरोधात कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी विद्यापीठाने उमर खलिद याच्यासह इतर दोन विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
- तसेच विद्यापीठाने कन्हैय्या कुमारला 10 हजारांचा दंड ठोठावला.
- उमरला एका सत्रासाठी, मुजीब गट्टो याला दोन सत्रांसाठी आणि अनिर्बन भट्टाचार्यला 15 जुलैपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
- अनिर्बनला पुढील पाच वर्षे विद्यापीठातून कोणताही अभ्यासक्रम शिकता येणार नाही.
- जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यासह उमर आणि अनिर्बन यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती.
- कॅम्पसमध्ये 9 फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमाला आक्षेप घेणारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य सौरभ शर्मा याला वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उच्चस्तरीय समितीने दोषी ठरविले आहे.
दिनविशेष :
- 1755 : रशियातील जुन्या प्रख्यात मॉस्को विद्यापीठाची स्थापना.
- 1933 : जर्मनीची गुप्त पोलिस यंत्रणा गेस्टापोची रचना.
- 1964 : टांगानिका व झांझिबार देश एकत्र आले. टांझानियाची रचना.
- टांझानिया एकत्रीकरण दिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा