चालू घडामोडी (29 मे 2018)
प्रणव मुखर्जी घेणार आरएसएसच्या स्वयंसेवकाचे ‘बौद्धिक’ :
- भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. भारताच्या माजी राष्ट्रपतींना नागपूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधण्याचे आमंत्रण दिल्याचे व त्यांनी ते स्वीकारले असल्याचे संघाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे.
- संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये 600 स्वयंसेवक सहभागी होणार असून त्यांना प्रणव मुखर्जी मार्गदर्शन करणार आहेत. मतं विरोधी असणं म्हणजे शत्रू असणे असे नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्व यांच्यासंबंधात निर्माण केल्या गेलेल्या प्रश्नांना हे मुखर्जींनी निमंत्रण स्वीकारणं हे उत्तर आहे, असे मत संघाचे नेते राकेश सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.
- सात जून रोजी हा कार्यक्रम होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वृत्तास दुजोरा दिला असला तरी, प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयानं याबाबत अद्याप काही स्पष्ट केलेले नाही.
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसकडून अनेक पदावर काम केलेले प्रणव मुखर्जी जुलै 2017 मध्ये राष्ट्रपती पदावरून पायउतार झाले.
- तसेच मुखर्जी यांनी प्रदीर्घ काळ काँग्रेससाठी काम केलेले आहे. त्यामुळे काँग्रेसचा प्रदीर्घ वारसा असलेले व राष्ट्रपतीपदासारखे सर्वोच्च पद भूषवलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
स्टरलाइट कॉपर प्रकल्प कायमचा बंद होणार :
- तामिळनाडूतील तुतिकोरीन येथील वेदांत समूहाच्या स्टरलाइट कॉपर या कंपनीचा तांबेनिर्मिती प्रकल्प बंद करण्याचे आदेश तेथील राज्य सरकारने दिले असून याचा फटका देशभरातील 800 लघु व मध्यम उद्योगांना बसणार आहे. या निर्णयामुळे थेट किंवा अप्रत्यक्षपणे या क्षेत्राशी संबंधित उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या 50 हजार लोकांच्या रोजगारावर संकट आले आहे.
- वेदांत उद्योग समुहातील ‘स्टरलाइट कॉपर’ नावाच्या कंपनीचा तुतिकोरीन येथील तांबेनिर्मिती प्रकल्प कायमचा बंद करण्याचे आदेश तामिळनाडू सरकारने दिले आहेत.
- तसेच या प्रकल्पातून वर्षाला 4 लाख टन तांबेनिर्मिती व्हायची. देशभरात दरवर्षी 10 लाख टन तांबेनिर्मिती होते. म्हणजेच देशातील तांब्याच्या उत्पादनात तुतिकोरीन प्रकल्पाचा वाटा 40 टक्के इतका होता.
- भारतात तांबेनिर्मितीमध्ये हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी कंपनी), हिंदाल्को आणि स्टरलाइट या तीन कंपन्या आघाडीवर आहेत. यातील ‘हिंदुस्तान कॉपर‘मधून दरवर्षी 99 हजार 500 टन तांबेनिर्मिती होते. ‘हिंदाल्को इंडस्ट्रीज‘मधून दरवर्षी सुमारे 5 लाख टन तांबेनिर्मिती होते. तर स्टरलाइटमधून 4 लाख टन तांबेनिर्मिती होत असते.
आता पतंजलीचा टेलिकॉम क्षेत्रातही प्रवेश :
- बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने आता टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला आहे. विविध बिस्कीटपासून मॅगीपर्यंत अनेक खाद्यपदार्थ, किराणा मालातील पदार्थ, औषधी उत्पादने यानंतर आता पतंजलीने आपली सिमकार्ड बाजारात आणली आहेत.
- विशेष म्हणजे यासाठी कंपनीने सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलशी करार केला आहे. 28 मे रोजी हरिद्वारमध्ये या सिमकार्डचे अनावरण करण्यात आले. या सिमकार्डला स्वदेशी समृद्धी सिमकार्ड असे नाव देण्यात आले आहे.
- आता सुरुवातीच्या टप्प्यात या सिमकार्डचा वापर पतंजलीचे कर्मचारी आणि अधिकारी यांना करता येणार आहे. त्यानंतर हे कार्ड सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. यातील आणखी एक खास बाब म्हणजे सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांना पतंजलीच्या इतर उत्पादनांवर 10 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. या सिमकार्डसाठी आकर्षक प्लॅनही तयार करण्यात आला आहे.
- 144 रुपयांच्या रिचार्जवर देशभर अनलिमिटेड कॉल्सबरोबरच 2 जीबी डेटा देण्यात येणार आहे. याशिवाय 100 मेसेज मोफत मिळू शकतील. पतंजलीकडून आपल्या युजर्सना आरोग्य, अपघात आणि जीवन विमा मिळणार आहे.
- तसेच यामध्ये 2.5 लाख रुपयांचा आरोग्य विमा, 5 लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. रस्ते अपघातातही या विम्याचा लाभ मिळू शकेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
विश्व स्कॉश स्पर्धेसाठी यश फडतेची निवड :
- 17 वर्षाखालील यू एस ओपन स्कॉश स्पर्धा जिंकणाऱ्या वास्को गोवा येथील यश फडते याची येत्या जुलै मध्ये भारतात चेन्नई येथे खेळविण्यात येणाऱ्या 19 वर्षाखालील विश्व स्कॉश स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
- विश्व चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी चेन्नई येथे निवड चाचणी शिबीर आणि खेळाडूंमध्ये सामने खेळविण्यात आले, यात यश फडतेने अपराजित राहून सर्व प्रतिस्परध्यावर विजय मिळविला.
- तसेच अंतिम सामन्यात त्याने महाराष्ट्रच्या वीर चोत्रांनी ह्याला पराभूत केले. यश फडते गोव्याचा प्रतिभाशाली युवा स्कॉशपटू आहे, गोव्यात स्कॉश खेळविषयी कोणतीच साधन सुविधा नसताना मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या स्कॉश कोर्टवर सराव करून त्यांनी आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे.
प्रो कबड्डी लीगच्या लिलावात 422 खेळाडू :
- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेट संपल्यानंतर आता देशाच्या आर्थिक राजधानीत 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वाच्या लिलावाकडे क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधले आहे. 12 संघांचा समावेश असलेल्या या लीगच्या लिलावासाठी 422 खेळाडू उपलब्ध आहेत.
- या लिलावासाठी इराण, बांगलादेश, जपान, केनिया, कोरिया, मलेशिया आणि श्रीलंका, आदी 14 अन्य देशांच्या 58 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
- तसेच या लिलावाला सामोरे जाण्यापूर्वी 12 संघांपैकी नऊ संघांनी महत्त्वाच्या काही खेळाडूंना कायम ठेवले आहे. मात्र यू मुंबासहित तीन संघांनी संपूर्णत: नवा संघ बांधण्याचे धोरण आखले आहे. भविष्यातील कबड्डी तारे या उपक्रमातून निवडलेले 87 खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील.
दिनविशेष :
- 29 मे 1906 रोजी भारतीय-इंग्लिश लेखक टी.एच. व्हाईट यांचा जन्म झाला.
- एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म 29 मे 1914 रोजी झाला.
- अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी 29 मे 1919 रोजी घेण्यात आली.
- 29 मे 1987 हा दिवस भारताचे 5वे पंतप्रधान ‘चौधरी चरणसिंग‘ यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा