चालू घडामोडी (13 डिसेंबर 2016)
जागतिक बिलियड्स अजिंक्यपद स्पर्धेत पंकज अडवाणी विश्वविजेता :
- दिग्गज भारतीय क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचे कडवे आव्हान परतावून 11 व्या जागतिक बिलियड्स अजिंक्यपद स्पर्धेवर विजय मिळविला.
- विशेष म्हणजे कारकिर्दीतील 16वे विश्वविजेतेपद पटकावताना अडवाणीने अंतिम सामन्यात गिलख्रिस्टला 6-3 असे पराभूत केले.
- तसेच सकाळच्या सत्रात म्यांमाच्या अंगु हतेला उपांत्य फेरीत नमवून आगेकूच केलेल्या अडवाणीने सिंगापूरमध्ये स्थायिक झालेल्या ब्रिटीश गिलख्रिस्टला सहज नमवले.
कसोटी मालिकेत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय :
- कर्णधार विराट कोहलीचे व्दिशतक, मुरली विजय, जयंत यादव यांची शतकी खेळी, रवीचंद्रन अश्विनने घेतलेले बारा बळी अशा बहारदार खेळाच्या प्रदर्शनामुळे भारताने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना एक डाव आणि 36 धावांनी दणदणीतपणे जिंकला आहे.
- इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 ने आघाडी मिळवत मालिकेवरही नाव कोरले आहे.
- सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने चांगला खेळ करत मोठी धावसंख्या उभारू शकेल अशी परिस्थिती निर्माण केली होती. मात्र रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडला 400 धावांत रोखले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने चोख प्रत्युत्तर देत 631 धावांचा डोंगर उभारून 235 धावांची आघाडी घेतली.
- कर्णधार विराट कोहलीने 340 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 235 धावा केल्या. तर मुरली विजयने 282 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांच्या सहाय्याने 136 धावा केल्या.
- तसेच दुसऱ्या डावातही रवीचंद्रन अश्विनने 6 बळी मिळवत भारताला विजय प्राप्त करून दिला.
अक्षयकुमार काळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी :
- डोंबिवलीत होणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत, ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी एकतर्फी विजय मिळवला.
- डॉ. अक्षयकुमार काळे यांच्यासह प्रसिद्ध गीतकार-कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मदन कुळकर्णी व जयप्रकाश घुमटकर हे मैदानात होते. डॉ. काळे यांनी मोठे मताधिक्य मिळवीत बाजी मारली.
- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय सध्या नागपुरात विदर्भ साहित्य संघाकडे आहे.
- निवडणूक निर्वाचन अधिकारी अॅड. मकरंद अग्निहोत्री यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला.
टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरुन सायरस मिस्त्रींना हटवले :
- टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांना 12 डिसेंबर रोजी टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरुन हटवण्यात आले.
- सायरस मिस्त्रींनाच हटवण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. त्यात मतदानाने मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
- टाटा समूहातील कंपन्यांच्या ज्या पदांवर मिस्त्री आहेत त्या पदांवरुन त्यांना हटवण्यात येत आहे.
- तसेच टाटा समूहातील सहा कंपन्यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली होती.
- टाटा समूहाचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांनी मागच्या आठवडयात शेअर होल्डर्सना पत्र लिहून सायरस मिस्त्रींना हटवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
- समूहातील कंपन्यांच्या संचालक मंडळावर मिस्त्री यांची उपस्थिती कंपनीच्या हिताची नसल्याचे रतन टाटा यांनी पत्रात म्हटले होते.
दिनविशेष :
- भारतीय साहित्यिक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म 13 डिसेंबर 1924 रोजी झाला.
- 13 डिसेंबर 2003 रोजी प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला.
- 13 डिसेंबर 2005 हा हिंदी चित्रपट निर्माता, रामायण व श्रीकृष्ण निर्देशक रामानंद सागर यांचे स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा