25 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 जुलै 2018)
लोकसभेत भ्रष्टाचारविरोधी संशोधन विधेयक मंजूर :
- लाच देणाऱ्या आणि घेणाऱ्यासाठीही शिक्षेची तरतूद असणारे तसेच भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे दोन वर्षांत निपटण्यासाठी आणण्यात आलेल्या भ्रष्टाचारविरोधी संशोधन विधेयक 2018 24 जुलै रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले.
- हे विधेयक मांडताना कार्मिक, लोक तक्रार आणि पेन्शन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, जे लोक आपले काम प्रामाणिकपणे करतात अशा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यामुळे सुरक्षा प्रदान होणार आहे.
- जितेंद्र सिंह म्हणाले, भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये त्वरीत सुनावणीची तरतुद आहे. सरकार भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रतिबद्ध आहे. या विधेयकात लाच घेणाऱ्यावर दंडासह तीन ते 7 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच्या 1988च्या कायद्यात बदल करुन हे नवे विधेयक आणण्यात आले आहे.
- सध्याचा भ्रष्टाचारविरोधी कायदा हा तीन दशक जुना आहे. यामध्ये 2013 मध्ये पहिल्यांदा बदलासाठी संसदेत मांडण्यात आले त्यानंतर ते संसदीय समितीसमोर चर्चेसाठी ठेवण्यात आले. पुढे ते विधी तज्ज्ञांच्या समितीकडे आणि 2015 निवड समितीकडे पाठवण्यात आले.
- या समितीने 2016 मध्ये आपला अहवाल सरकारकडे पाठवून दिला. त्यानंतर 2017 मध्ये हे विधेयक संसदेत मांडण्यात आले. मात्र, यावर त्यावेळी कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. या पावसाळी अधिवेशनात मात्र हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले.
सतरा नंबर अर्ज आता ऑनलाइन उपलब्ध :
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्जही आता ऑनलाइन पद्धतीने स्वीकरण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी असणारे 17 नंबरचे परीक्षा अर्ज येत्या 30 जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास सुरवात होणार आहेत.
- पाचवी उत्तीर्ण असणाऱ्या व वयाची 16 वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट दहावीची परीक्षा देता येते. त्या विद्यार्थ्यांच्या सोईसाठी बोर्डाच्यावतीने दरवर्षी 17 नंबर फॉर्म भरुन घेतले जातात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी अर्ज भरत होते. मात्र, यंदाच्या वर्षापासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात केली आहे.
- दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-ssc.in.ac या तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.in.ac या संकेतस्थळावर 30 जुलैपासून अर्ज भरायचे आहेत.
- तसेच अर्ज भरण्यासाठी 25 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. ऑनलाइन अर्ज भरताना शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करायची आहेत.
- 31 जुलै ते 27 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांनी भरलेला मूळ अर्ज, परीक्षा शुल्क, मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्रामध्ये जमा करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज भरताना काही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी 020-25705208 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.
अमेरिकेत आहे सर्वात मोठे हिंदू मंदिर :
- भारत हा हिंदूचा सर्वात मोठा देश मानला जातो, पण अमेरिकेमध्ये जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बांधण्यात आले आहे.
- अमेरिकेतील न्यूजर्जीमधील रॉबिंसविले या ठिकाणी हे भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या निर्मीतीसाठी भारतातून 13,499 दगडे पाठवण्यात आली होती. हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायाचे असून याची निर्मीती बोचासनवासी अक्षर पुरषोत्तम स्वामीनारायण संस्थेने केली आहे.
- तसेच हे भारताबाहेरील सर्वात मोठे मंदिर मानले जातेय. 162 एकरमध्ये मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरामध्ये प्राचिन भारताची झलक दिसून येते.
- स्वामीनारायण मंदिरासाठी 68 हजार क्युबिक फूट इटालियन मार्बलचा वापर करण्यात आला तसेच 108 खांब आहेत. या मंदिरामध्ये तीन गुहा आहेत. हे मंदिर शिल्पशास्त्रानुसार बनवण्यात आले आहे. मंदिर उभारणीला तब्बल 108 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
पीकविमा योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ :
- खरीप हंगाम 2018 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
- मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येक जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्याशी संवाद साधून कृषी विभागाचा आढावा घेतला. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील हे सांगलीहून, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
- बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग, घटक आणि प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण, कृषी विद्यापीठ यांची वेळोवेळी मदत घेऊन शेतकऱ्यांचे याबाबत प्रबोधन करून पिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
जगभरातील भारतीयांचा देशवासीयांना अभिमान :
- ‘जगभरात अनेक देशांमध्ये स्थायिक झालेले भारतीय त्यांच्या कर्तृत्वामुळे भारताची मान उंचावत आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. भारत आणि रवांडा यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंधांमध्येही येथील भारतीय समुदायाच्या सकारात्मक प्रभावाचा मोठा वाटा आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
- आफ्रिकेमधील रवांडा देशाच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी येथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यानंतर ट्विटरद्वारे त्यांनी याबाबत माहिती दिली.
- “जगभरात भारतीय आपली ओळख निर्माण करत आहेत. रवांडामधील भारतीयांनीही असेच कर्तृत्ववान ओळख निर्माण केली असल्याचे येथील अध्यक्षांनी मला सांगितले. जगभरातील भारतीय हे आपल्या देशाचे राष्ट्रदूत आहेत,” असे मोदी यांनी सांगितले. या देशात भारतीय उच्चायुक्त स्थापन करण्याची येथील भारतीयांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचेही मोदी म्हणाले.
- तत्पूर्वी, मोदी यांनी रवांडाचे अध्यक्ष पॉल कागामे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर विविध आंतरराष्ट्रीय आणि द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. 1994 मध्ये रवांडामध्ये झालेल्या सामूहिक हत्याकांडात बळी गेलेल्या अडीच लाख जणांच्या स्मृतीनिमित्त बांधण्यात आलेल्या स्मारकालाही मोदी यांनी भेट दिली. यानंतर मोदी युगांडा देशाकडे रवाना झाले.
दिनविशेष :
- 25 जुलै 1880 हा दिवस समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते ‘गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका‘ यांचा स्मृतीदिन आहे.
- किकूने इकेदा यांनी सन 1908 मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.
- जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉय ब्राऊन यांचा 25 जुलै 1978 मध्ये इंग्लंड येथे जन्म झाला.
- 25 जुलै 1997 मध्ये के.आर. नारायणन भारताचे 10वे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.
- सन 2007 मध्ये श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा