20 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (20 ऑक्टोबर 2018)
सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उद्घाटनासाठी सज्ज:
- जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचे लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे.
- गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 182 मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
- सरदार सरोवर धरणापासून खालच्या बाजूला नर्मदा नदीपासून केवळ साडेतीन किलोमीटर अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे
- सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रस्तावित 182 मीटर उंचीचा पुतळा लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आला आहे.
- स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणापेक्षा दीडपट तर न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे.
- तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2013 मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता.
बजरंग पुनियाकडे भारताचे नेतृत्व:
- आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या बजरंग पुनिया याच्याकडे 20 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक अिजक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारताच्या 30 जणांच्या पथकाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
- 2013च्या जागतिक अिजक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या बजरंगला आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला. आता 65 किलो वजनी गटात त्याच्यावर भारताची भिस्त असेल. गेल्या महिन्यात त्याला प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी डावलण्यात आले होते. पण ते सर्व विसरून कठोर मेहनत घेऊन तो आता पदक मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.
- राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत त्याने ज्या सहजतेने सुवर्णपदक पटकावले, त्यामुळे या स्पर्धेतही तो पदकासाठी दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेत मानांकन मिळवलेला एकमेव खेळाडू असलेला बजरंग 21 ऑक्टोबर रोजी रिंगणात उतरेल.
चीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र:
- चीन या देशाचे नाव घेतल्यावर दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी त्यांनी लावलेले भन्नाट शोध. जगभरातील बाजारपेठांमध्ये ‘मेड इन चायना‘ टॅग असणाऱ्या एकाहून एक भन्नाट वस्तू हातोहात विकल्या जातात. मात्र सध्या जगभरात चर्चा सुरु आहे चीनच्या आणखीन एका भन्नाट कल्पनेची. ही कल्पना म्हणजे आकाशात तीन मानवनिर्मित चंद्र सोडण्याची तयारी चीनने सुरु केली आहे.
- चीनमधील चेंगडू शहरामधील रस्त्यांवरील दिव्यांच्या जागी या मानवनिर्मित चंद्राचा वापर करण्याच्या वैज्ञानिकांचा मानस आहे. हे तीन चंद्र नैसर्गिक चंद्रापेक्षा आठ पटींने अधिक तेजस्वी असतील अशी माहिती वू चुनफेंग यांनी दिली.
- वू चुनफेंग हे चीनमधील सिचुआन प्रांतातील ‘चेंगडू एरोस्पेस सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स सिस्टम रिसर्च इंस्टिट्यूट कॉर्पोरेशन’चे अध्यक्ष आहेत. ही संस्था आकाश संशोधन क्षेत्रात काम करते.
आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र:
- राज्यात आधी सहा प्रकारच्या दिव्यांगांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिले जायचे. आता मात्र, केंद्र व राज्य शासनाने यात बदल केले असून नव्या 15 व्याधीग्रस्तांनासुद्धा दिव्यांगत्वाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
- केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 संमत केले असून तशा मार्गदर्शक सूचनाही राज्यांना पाठवल्या आहेत. यानुसार आता सिकलसेल, थॅलेस्मिया, हिमोफेलिया व कुष्ठरुग्णही दिव्यांग श्रेणीत मोडणार आहेत.
- याकरिता दिव्यांगांना ओळखपत्र अतिशीघ्र मिळावे, यासाठी केंद्र शासनाचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यापूर्वी राज्यात सॉफ्टवेअर अॅसेसमेंट फॉर डिसॅबिलिटी या संगणकीय प्रणालीद्वारे दृष्टिदोष, दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुदिव्यांगता या सहा प्रकारात मोडणाऱ्या व्यक्तींनाच दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिले जात होते.
- आता केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती व हक्क अधिनियमानुसार नव्याने 15 आजारांचा दिव्यांग श्रेणीत समावेश केला आहे. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा शल्यचिकित्सक एन.बी. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 21 प्रकारच्या दिव्यांगांना याचा लाभ होणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने 50 दिव्यांगांना यूडीआयडी कार्ड दिले असून त्यांना याचा शासकीय नोकरीत तसेच अन्य ठिकाणी लाभ होणार आहे.
दिनविशेष:
- 20 ऑक्टोबर हा जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन तसेच जागतिक सांख्यिकी दिन म्हणून पाळला जातो.
- कृ.भा. बाबर यांनी सन 1950 मध्ये समाजशिक्षणमाला स्थापन केली.
- चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे सन 1962 मध्ये चीन-भारत युद्धास सुरवात.
- सन 1969 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना झाली.
- हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना सन 1970 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा