16 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 एप्रिल 2019)
अनुभवाला प्राधान्य देत झाली भारतीय संघाची घोषणा:
- सळसळत्या युवा रक्ताऐवजी अनुभवाला प्राधान्य देताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने 30 मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.
- संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी याला पर्याय म्हणून बीसीसीआयने युवा रिषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला संधी दिली. तसेच, युवा अष्टपैलू विजय शंकर, लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांनीही 15 सदस्यांच्या भारतीय संघात स्थान मिळविण्यात यश मिळविले.
- विशेष म्हणजे, 2015 च्या विश्वचषक संघातील 7 खेळाडू यंदाच्या विश्वचषक स्पर्धेही खेळणार आहेत. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी भारतीय संघ जाहीर केला. 15 एप्रिल रोजी भारतीय संघाची घोषणा झाली आणि यासह विश्वचषक संबंधीच्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली.
देशाकडून क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी:
- ओदिशाच्या किनारपट्टीवर भारताने 15 एप्रिल रोज स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय‘ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. सबसोनिक निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी होती.
- 2013 साली पहिल्यांदा निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. निर्भय क्षेपणास्त्राच्या सुरुवातीच्या काही चाचण्या अपयशी ठरल्या होत्या.
- मिसाइलच्या फ्लाइट कंट्रोल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काही समस्या होत्या. त्यामध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) निर्भय क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. या क्षेपणास्त्राचा टप्पा 1 हजार किलोमीटरचा आहे.
- अमेरिकन नौदलाकडे असलेल्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्राच्या धर्तीवर निर्भयची निर्मिती करण्यात आली आहे. निर्भयच्या यशस्वी चाचणीमुळे शत्रूच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची भारताची क्षमता वाढणार आहे.
दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप गुप्ते:
- दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी मूळ सातारा शहराचे रहिवासी असलेल्या संदीप सुधाकर गुप्ते यांची निवड करण्यात आली आहे.
- दुबई, युएई येथे 47 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि मराठी मनांची अस्मिता मानल्या जाणार्या आपल्या पुढील पिढीसाठी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवणे, जोपासणे आणि वृध्दींगत करणे.
- मायबोली मराठीचा उज्वल आणि गौरवशाली वारसा जपणे. दुबई, युएई मधील मराठी माणसांना एकत्रित ठेवून आपली उज्वल संस्कृती आणि परंपरा परदेशातही टिकवून ठेवण्याचे कार्य दुबई महाराष्ट्र मंडळाकडून सातत्याने केले जात असते.
- तर याच मंडळाच्या अध्यक्षपदावर सातारा शहरातील मंगळवार पेठेतील संदीप गुप्ते यांची निवड झाली आहे. साताऱ्यात शिक्षण घेतलेले संदीप गुप्ते हे उच्चशिक्षणानंतर नोकरीनिमीत्त दुबईमध्ये स्थायिक झाले.
- दुबईतील एका कंपनीत ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे संदीप गुप्ते यांनी गेली 24 वर्ष विविध आखाती देशांमध्ये मराठी सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गो.मा. पवार यांचे निधन:
- ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गो.मा. पवार यांचे आज 16 एप्रिल रोजी निधन झाले. सोलापुरात वैद्यकीय उपचार सुरु असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षाचे होते.
- मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मिमांसा करणारे गो.मा. पवार हे पहिले समीक्षक ठरले असून पवार हे साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक होते. त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
- डॉ. पवार यांना काही दिवसांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले होते. गो.मा. पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्यलेखन केले आहे. पवार हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते.
- डॉ. पवार यांना साहित्य अकादमी पुरस्कार (नवी दिल्ली), भैरूरतन दमाणी पुरस्कार (सोलापूर), शिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार (कुर्डुवाडी), रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (वाई), पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार (प्रवरा नगर), महाराष्ट्र फाऊंडेशन मराठी साहित्य पुरस्कार (मुंबई), महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार, धोंडीराम माने साहित्य रत्न पुरस्कार, (औरंगाबाद), शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार (सोलापूर), मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, (औरंगाबाद) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर:
- मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे संगीत, नाटय़, कला आणि सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे मास्टर दीनानाथ पुरस्कार जाहीर करण्यात आले.
- प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांना या वर्षीचा संगीत आणि कला क्षेत्रातील मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात येणार असून मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना प्रदान करण्यात येणार आहे.
- प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून दरवर्षी दिले जाणारे हे पुरस्कार या वर्षी 24 एप्रिल रोजी मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात प्रदान करण्यात येतील.
- ‘सीआरपीएफ’चे महासंचालक विजयकुमार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या वर्षीच्या विजेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.
- भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
दिनविशेष:
- 16 एप्रिल हा दिवस ‘जागतिक ध्वनी दिन‘ आहे.
- सन 1853 मध्ये भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.
- विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार ‘चार्ली चॅपलीन‘ यांचा जन्म 16 एप्रिल 1889 मध्ये झाला होता.
- सन 1922 मध्ये मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
- राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना सन 1948 मध्ये झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा