Current Affairs of 19 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (19 जानेवारी 2018)

नदाफ एजाझला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर :

  • नांदेड जिल्हय़ाच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ एजाझ अब्दुल रौफ याला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला.
  • यंदा देशातील 18 बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नदाफ एजाझ अब्दुल रौफचा समावेश आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 जानेवारी 2018 रोजी या शूरवीर बालकांना गौरविले जाईल.
  • नांदेड जिल्हय़ातील पार्डी (मक्ता) येथील एजाझने धाडस दाखवून दोन मुलींना तलावात बुडण्यापासून वाचविले होते. त्याने दाखविलेल्या साहसाची नोंद घेत त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • तसेच प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला राजपथावर होणाऱ्या पथसंचलनातही तो सहभागी होणार आहे.

विराट कोहली ठरला क्रिकेटर ऑफ द इयर :

  • अंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती म्हणजेच आयसीसीच्या वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
  • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला असल्याने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार भारतीय खेळाडूला मिळणार आहे.
  • विराटला यंदाच्या वर्षीचे तीन महत्वाचे सन्मान मिळाले आहेत. यामध्ये ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’, ‘आयसीसी ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर’ या दोन पुरस्कारांबरोबरच आयसीसीच्या कसोटी तसेच एकदिवसीय संघाचे कर्णधारपदाचे स्थान मिळाले आहे.

आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्क्वॅशपटू यश फडतेचा सत्कार :

  • ‘दैनिक गोमंतक’ने माझी जगाला ओळख करुन दिली, असे भावपूर्ण उद्गार आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्क्वॅशपटू यश फडते यांनी काढले.
  • गोव्याचा यश फडते याने डिसेंबरमध्ये अमेरिकेत झालेल्या यू एस ओपन ज्युनिअर स्क्वॅश स्पर्धा जिंकून हा पराक्रम करणारा पहिला भारतीय स्क्वॅशपटू बनल्याबद्दल त्याचा सत्कार वास्को येथील चौगुले शिक्षण संस्थेच्या सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटच्या पालक शिक्षक संघटना आणि व्यवस्थापनाने रवींद्र भवन येथे आयोजित केला होता.
  • यश फडते याचा अर्जुन पुरस्कार विजेत्या देशाचे माजी आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू ब्रम्हानंद शंखवळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ कवी धामणस्करना कोमसापचा पुरस्कार जाहीर :

  • कोकण मराठी साहित्य परिषदेचा कविता राजधानी पुरस्कार जुन्या जमान्यातील ज्येष्ठ कवी द.बा. धामणस्कर यांना जाहीर झाला आहे.
  • सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 28 जानेवारीला कुडाळमध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.
  • पुरस्कार समितीचे निमंत्रक अरुण नेरूरकर यांनी 2016-17 सालच्या वाङ्‌मयेतर पुरस्कारांची घोषणा केली.
  • कुसुमाग्रजांनी मालगुंड केशवसुतनगरी ही कवितेची राजधानी आहे, असे म्हटले होते. त्यामुळेच कोमसापने आठ वर्षांपासून कविता राजधानी पुरस्कार देण्यास सुरवात केली. यापूर्वी सौमित्र, अरुण म्हात्रे अशा नामवंत कवींना हा पुरस्कार दिला आहे.

आण्विक क्षमतेच्या अग्नि-5 ची यशस्वी चाचणी :

  • अग्नि-5 या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या, आण्विक क्षमतेच्या क्षेपणास्त्राची ओडिशा येथे 18 जानेवारी रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • पाच हजार किमी पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची येथील अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी 9.53 वाजता चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
  • अग्नि हे भारताच्या महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामधील अत्यंत महत्त्वाचे क्षेपणास्त्र मानले जाते.

संगीत मैफलींना जीएसटीतून सवलत :

  • सध्याच्या वस्तू आणि सेवा करांच्या (जीएसटी) दरात आणखी कपात करण्याचा आणि काही स्तरांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय 18 जानेवारी रोजी जीएसटी परिषदेच्या 25व्या बैठकीत घेण्यात आला.
  • महाराष्ट्रातील नाटय़ आणि संगीत रसिकांसाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे, नाटके, शास्त्रीय व इतर प्रकारचे सांगीतिक कार्यक्रम, लोककला आविष्कार यांसाठी 500 रुपयांपर्यंतच्या तिकिटांना जीएसटीतून सवलत देण्यात आलेली आहे.
  • तसेच या बरोबर केंद्र सरकारने ग्राहक व खासगी उद्योगांनाही अर्थसंकल्पपूर्व दिलासा दिला. कृषी, इंधन, वाहन गटातील कर कमी करण्यासह सरकारने रोजगार, वस्त्र, मनोरंजन उद्यानाशी संबंधित सेवांवरील करभार कमी केला.
  • वस्तू व सेवा कर रचनेत येणाऱ्या विविध 29 वस्तू व 53 सेवा वस्तूंना दुसऱ्यांदा कमी कर टप्प्यात आणताना, जीएसटी परिषदेने झालेल्या बैठकीत या कररचनेत सध्या समाविष्ट नसलेल्या खनिज तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल, हवाई वाहतुकीसाठीचे इंधन तसेच स्थावर मालमत्तेला पुढील बैठकीत करकक्षेत आणण्याचे संकेतही दिले.

दिनविशेष :

  • ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने 1839 मध्ये 19 जानेवरी रोजी एडनचा ताबा घेतला.
  • सन 1949मध्ये पुणे नगरपालिका उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.
  • देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम 19 जानेवारी 1956मध्ये जाहीर झाला.
  • ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांना सन 1996मध्ये मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर झाला.
  • 19 जानेवारी 2007 रोजी सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.